तांदळाची निर्यात आता लवकरच थांबणार; किरकोळ किमतीत 10 टक्क्यांची वाढ (iStock Photo)
जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक आहे. परिणामी, देशाच्या उत्पादन आणि निर्यातीतील घटीचा आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम होऊ शकतो. यूएसडीएच्या मते, तीव्र एल निनो परिस्थितीमुळे मान्सूनवर लक्षणीय परिणाम झाला आहे, जो पुढेही चालू राहू शकतो. यामुळे २०२६-२७ च्या पीक वर्षात भारताच्या तांदळाच्या उत्पादनात ४.५ टक्क्यांची घट होऊन ते १४७ दशलक्ष टनांपर्यंत येऊ शकते. राईस व्हिलाचे सह संस्थापक आणि सीईओ, सूरज अग्रवाल यांनी सांगितले की, कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किमती वाढू शकतात.
चालू खरीप हंगामात, मागील हंगामाच्या तुलनेत भात लागवडीखालील क्षेत्र ३.७% ने कमी होऊन ४२.९२ दशलक्ष हेक्टरवर आले आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये भात लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय घट दिसून आली. आकडेवारीनुसार, कर्नाटकात ४.६ लाख हेक्टर, तेलंगणात ४.३ लाख हेक्टर, आंध्र प्रदेशात १.८ लाख हेक्टर आणि तामिळनाडूमध्ये १.५ लाख हेक्टरने भात लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. भात लागवडीखालील क्षेत्रातील घट आणि पावसाच्या कमतरतेमुळे भविष्यातील उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
२०१५-१६ नंतर प्रथमच भारताच्या तांदूळ उत्पादनात घट?
२०१५-१६ नंतर प्रथमच भारताच्या तांदूळ उत्पादनात घट होऊ शकते. २०२५-२६ च्या पीक वर्षात, भारताने अंदाजे १५४ दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन करून जगातील सर्वांत मोठा तांदूळ उत्पादक देश बनला होता. यूएसडीएने २०२७ साठीचा आपला जागतिक तांदूळ व्यापाराचा अंदाज १.३ दशलक्ष टनांनी कमी केला आहे. जागतिक निर्यातीत भारताचा ४०-४५% वाटा पाहता, पुरवठ्यातील या कपातीचा आंतरराष्ट्रीय बाजारातील उपलब्धता, किमतींवर परिणाम होऊ शकतो.






