Sonam Wangchuk (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आता रान पेटले आहे. आधी विरोधी पक्षांनी आंदोलन करून दिल्ली दणाणून सोडली. आता कॉकरोच जनता पार्टीनेसुद्धा आंदोलनाची हाक दिली. पण त्यापूर्वीच, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना दिल्ली विमानतळावर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. विरोधी पक्षांतील काही नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घडामोडींनंतर आता पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची मैदानात एंट्री झाली असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात असल्याने आंदोलनाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे करत असल्याचं सांगितलं जात आहे. काहीही झालं तरी आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे.
यावरून सोनम वांगचुक यांनी ताब्यात घेतलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी केली. उद्यापर्यंत सर्व नेत्यांची सुटका झाली नाही, तर आपल्याला उपोषण किंवा पदयात्रा सुरू करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
देशातील सर्वात मोठी लोकशाही सध्या अघोषित आणीबाणीच्या परिस्थितीत असल्याचा आरोप सोनम वांगचुक यांनी केला. आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी अनेक नेते पुढे आले होते, हे पाहून आपल्याला आनंद झाला होता. मात्र, या नेत्यांना अटक करण्यात आल्याने त्यांनी सरकार आणि पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी आणि सोनम वांगचुक यांनी एकत्र आंदोलन केल्याचा उल्लेख करण्यात येत आहे. त्या आंदोलनादरम्यान वांगचुक यांनी उपोषण केलं होतं. आता ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी पुन्हा हस्तक्षेप केला आहे.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या नेत्यांची सुटका होते का आणि सोनम वांगचुक प्रत्यक्षात उपोषण किंवा पदयात्रा सुरू करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. पुढील घडामोडींवर या आंदोलनाची दिशा अवलंबून राहणार आहे.






