Kaushal Inamdar
शेमारू मराठीबाणा वाहिनीवर गुरुवार ४ नोव्हेंबर रोजी मराठी साजश्रृंगार ल्यालेला ‘बाहुबली’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बाहुबली’सारखा मोठा सिनेमा मराठीमध्ये रिक्रिएट करताना त्याला सुरेल संगीताची किनार जोडत शेमारूनं खऱ्या अर्थानं मराठीबाणा जपला आहे. मूळ ‘बाहुबली’ला संगीतसाज चढवणारे एमएम क्रीम आणि मराठी ‘बाहुबली’ला स्वरसाज चढवणाऱ्या संगीतकार कौशल इनामदार यांची साक्षात भेट झाली आहे. याबाबत कौशल म्हणाले की, एमएम क्रीम आणि माझी ओळख खूप जुनी आहे. माझं एक गाणं ऐकून त्यांनी १४ वर्षांपूर्वी मला कॅाल केला होता. त्यानंतर आम्ही केवळ फोनवर बोलायचो. सहा-सात महिन्यांमधून एकदा आमचं बोलणं व्हायचं, पण भेटीचा योग कधी आला नव्हता. एमएम क्रीम यांचा मी फार पूर्वीपासून फॅन आहे. ‘क्रिमिनल’ हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा आल्यापासून मी त्यांच्या संगीताचा चाहता आहे. त्यानंतर ‘इस रात की सुबह नहीं’, ‘सूर’, ‘जिस्म’, ‘पहेली’या सर्व चित्रपटांचं संगीत मला खूप आवडलं. दर वेळी मी त्यांना फोनवरून प्रतिक्रीया कळवायचो. ‘बाहुबली’नंतरही मी त्यांना कळवलं होतं. एक गंमत सांगायची तर ‘बाहुबली’ला सुरुवात करण्यापूर्वीही एमएम क्रीम यांचा मला फोन आला होता. त्यांनी ‘बाहुबली’साठी वरच्या पट्टीतील आवाजाचा गायक सुचवायला सांगितलं होतं. मी आदर्श शिंदेचं नाव सुचवलं होतं. आदर्शनं त्यावेळी नुकतंच माझ्यासाठी ‘रंगा पतंगा’चं गाणं गायलं होतं. त्यांनी आदर्शशी संपर्कही साधला होता, पण ते जुळून आलं नव्हतं असं मला नंतर समजलं.
…तो आवाज क्रीम यांचा होता
मराठी बाहुबलीचं संगीत करण्याची फार मोठी जबाबदारी माझ्याकडे आल्यावर गायकांची निवड सुरू झाली. हिंदी ‘बाहुबली’मध्ये दलेर मेहेंदीसोबत माझा मित्र गायक संजीव चिम्मलगीनं गाणं गायलं होतं. फार उत्तम शास्त्रीय गायक आहे. एमएम क्रीमसोबत त्यानं पूर्वीपासून काम केलं आहे. त्यामुळं हिंदीत जो संजीवनं भाग गायला आहे, तो मी त्याला मराठीत गायला सांगितला. मूळ चित्रपटात गायलेलाच भाग त्यानं मराठीतही गायलेला असल्यानं एक वेगळं वैशिष्ट्यही ठरलं आहे. ठाण्यात आम्ही रेकॅार्डिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी संजीवचा मला कॉल आला आणि म्हणाला, जरा इकडे बोल. त्यावेळी फोनवर दुसऱ्या बाजूला एमएम क्रीम होते. ते म्हणाले की, तुम्ही मराठी बाहुबली करताय याचा आनंद आहे. त्या संभाषणानंतर मी काही कामानिमित्त हैदराबादला गेलो होतो, तेव्हा १४ वर्षांनी एमएम क्रीम यांच्याशी माझी भेट झाली.
बाबूजींच्या पेटीला नमस्कार
पहिल्या भेटीत आम्ही जवळपास दोन तास गप्पा मारल्या. मराठी संगीताविषयी ते भरभरून बोलले. ते खूप मराठी संगीत ऐकतात. गीत रामायणातील ‘चारूते लीनते…’, ‘याचका…’, ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती…’ या गाण्यांसोबत ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी…’, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ ही गाणीही ऐकवली. त्यांचं मराठी गाण्यांवर, संगीतावर खूप प्रेम आहे. ते म्हणाले की, मला भाषा कळत नाही, पण संगीत फार आवडतं. मागच्या वेळी मुंबईत गेलो, तेव्हा श्रीधर फडकेंना भेटलो आणि सुधीर फडकेंच्या पेटीला नमस्कार करून आलो. त्यांच्या ठायी असलेली ही विनम्रता मनाला खूप भावली. एवढा मोठा संगीतकार आजही इतका लीन असल्याचं पाहून खूप आनंद झाला. त्यावेळी त्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. त्यांनी स्वत:च्या मोबाईलमध्ये माझ्यासोबत सेल्फी काढला. मी देखील तो ठेवा मोबाईलमध्ये साठवून ठेवला.
मराठीकरण करताना…
बाहुबलीचं मराठीकरण करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, तपशीलांकडे अत्यंत बारकाईनं लक्ष देऊन केलेलं संगीत आहे. जे एस. एस. राजामौलींनी चित्रात उतरवलं आहे, ते एमएम क्रीम यांनी संगीतात उतरवलं असल्यानं ते दोघेही भाऊ-भाऊ शोभतात. ते कझीन्स आहेत. ‘बाहुबली’चं मराठीकरण करताना पहिलं चॅलेंज होतं ते गाणी कोणी लिहायची ? मी या चित्रपटाची हिंदी आणि मूळ तेलुगू गाणीही ऐकली. माझा मुलगा ‘बाहुबली’च्या गाण्यांचा फॅन आहे. त्यानं सांगितलं की, बाबा तू मूळ तेलुगू गाणी ऐक. त्यामुळं मी तेलुगू गाणी ऐकली. माझ्या असं लक्षात आलं की, एखादा चित्रपट दुसऱ्या भाषेत करताना कधी कधी अर्थाशी तडजोड होते. कारण लिप्सींग मॅच करायचं असतं. हिंदीत मनोज मुंतशीर यांनी फार उत्तम काम केलंय, पण बारकाईनं अभ्यास करताना हिंदीतही बऱ्याच गोष्टी राहून गेल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं गाणी मराठीत येतील, तेव्हा ती मराठीच वाटली पाहिजेत हा विचार होता. ‘बाहुबली’च्या संगीताच्या गुहेची किल्ली ही गीतकाराच्या हाती असल्याचं ध्यानात आलं. त्यामुळं वैभव जोशी, मिलिंद जोशी आणि अस्मिता पांडे यांची निवड केली.
सृजनशील मुकादम
प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांनी ठरवलं होतं की, मराठीकरण करताना उर्दू किंवा फारसीतून आलेले शब्द वापरायचे नाहीत. खूप फारसी शब्द मराठीत आले आहेत. गाणं छंदात लिहायचं असल्यानं डायलॅाग्ज लिहिण्यापेक्षा ते कठीण असतं. शब्द लिप्सिंगलाही मॅच व्हावे लागतात. वैभव जोशीनं ‘मनोहारी…’हे गाणं लिहिताना काही उर्दू शब्द वापरले होते, पण ते बदलून त्या गाण्याचं पुर्नलेखन केलं. अस्मिता मराठीची शिक्षीका आहे. त्यामुळं तिला कुठल्या पद्धतीचं मराठी वापरावं हे माहित होतं. हिंदीमध्ये ‘पर्वत रोके चिरे घाटी…’ मराठीत जास्त काव्यात्मक करता आलं. मराठीमध्ये ‘गिरी अडवे दरी चिरते तरी…’ असं काव्य करताना मराठी भाषेतील सौंदर्याचा पुरेपूर वापर करता आला. मिलिंद जोशींनी दुसऱ्या भागातलं ‘कान्हा सो जा जरा…’ या हिंदी गाण्यावर ‘कान्हा तू नीज ना…’असे शब्द लिहीले आहेत. त्या ‘ना’ मध्ये एक आर्जव आहे. ‘नीज ना’ या शब्दात चित्रपटातील सिच्युएशनही आली, लिप्सिंगसुद्धा आलं आणि ‘जरा’ या शब्दाचा फॅाल्टही गेला. त्यामुळं हे तिघे मराठी ‘बाहुबली’च्या संगीताचे नायक आहे. मी केवळ सृजनशील मुकादम आहे.
गुणगुणायला लावणारं क्रीम संगीत
हल्ली हिंदी संगीत प्रचंड मोनो कल्चरल झालं आहे. तीन-चार हिंदीतील संगीतकारांची गाणी एका मागोमाग एक ऐकली, तर संगीतकारांची वेगळी शैली जाणवणार नाही. हिंदी वगळता इतर प्रादेषिक भाषांमध्ये आजही ही शैली जिवंत आहे. एमएम क्रीम यांची एक खास स्टाईल आहे. ते अत्यंत गुंतागुंतीची स्वरवाक्यं करतात, पण त्यांचं गाणं परिपूर्ण वाटतं. असं वाटतं की ते गुणगुणत रहावं. आपण पूर्वी खूप गाणी गुणगुणायचो. आता स्वरवाक्यं लहान व्हायला लागली आहेत. ए. आर. रेहमान यांचं संगीत उत्तम असतं. ते अत्यंत प्रतिभावंत संगीतकार आहेत, पण त्यांची स्वरवाक्यं खूप छोटी असतात. त्यामुळं गुणगुणायला लावणारी गाणी त्यांच्याकडून येत नाहीत. याउलट एमएम क्रीम यांची गाणी तुम्ही गुणगुणू शकता. ‘कान्हा तू नीज ना…’ हे गाणं सहज गुणगुणण्याजोगं आहे. संगीत साधं आणि सोपं असावं.
मराठमोळी टीम
अभिनेते–दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठमोळया ‘बाहुबली’ चित्रपटाचं लेखन पत्नी स्नेहल तरडे यांच्या साथीनं केलं आहे. खासदार-अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, मेघना एरंडे, संस्कृती बालगुडे आदी कलाकारांनी या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखांना आवाज दिला आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.