मुंबई : मराठी सिनेमा, रंगभूमी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं मुंबईत निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाले आहे. अंबानी रुग्णालयात त्यांना आज सकाळी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. गुरुवारी दुपारी अडीच वाजता पारसी वाडा, विलेपार्ले पूर्व येथे रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
रमेश देव यांचे सुहासिनी, अपराध, आनंद असे माईलस्टोन सिनेमे ठरले. तसंच लग्नाची बेडी, तुझं आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा ही त्यांची नाटक खूपच चालली. तसंच भावबंधन, उसना नवरा, गहिरे रंग, गुलाम, पैसे झाडाला लागतात, अकुलिना, लालबंगली या नाटकातील भूमिकांचंदेखिल कौतुक झालं. राजा गोसावी, आत्माराम भेंडे यांच्यासह त्यांची अनेक नाटकातून जोडी जुळली. रमेश देव यांचा खलनायक जितका रसिकांना भावला तितकाच भावला आनंद सिनेमामधला डॉ. प्रकाश कुलकर्णी.
तर पडछाया, सोनियाची पावले, देवघर, माझे घर माझी माणसं, ते माझे घर, अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली.
रमेश देव यांनी मराठी सिनेमांमध्ये अनेक अभिनेत्रींसह काम केलं…मात्र त्यांची अप्रतिम जोडी जमली ती सीमा देव यांच्याशी. या दोघांनी अनेक सिनेमांमधून काम केलं.