Swanand Kirkire in chumbak
समीक्षकांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजला गेलेला ‘चुंबक’ आता ओटीटीवर रिलीज होत असल्याबाबत स्वानंद म्हणाले की, मला खूपच बरं वाटतंय. कारण ‘चुंबक’सारखा चित्रपट सर्वदूर पोहोचावा असं मनापासून वाटत होतं. आता सोनी लिव्हसारख्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॅार्मच्या माध्यमातून समीक्षकांनी नावाजलेला, सिनेमहोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरलेला ‘चुंबक’ जगभरातील प्रेक्षकांना पहायला मिळणार असल्याचं एक वेगळंच समाधान आहे. मराठी सिनेमात खूप वेळा उत्कृष्ट काम होतं, पण बऱ्याचदा ते सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. सोनी लिव्हमुळं ते विश्वभरात पाहिलं जाईल. त्यामुळं मनात एक्साइटमेंट असून, खूप चांगली भावना आहे. कारण मराठी सिनेमा जगभर पोहोयला हवा असं मला वाटतं. ओटीटीद्वारे तो नक्कीच चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो असंही वाटतं. ‘चुंबक’ चित्रपटासाठी लोकांनी मला खूप म्हणजे खूप छान छान प्रतिक्रिया दिल्या. इंडस्ट्रीत खूप जण या सिनेमाच्या प्रेमात पडले. वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला फाईव्ह स्टार रिव्ह्यूज मिळाले. फार कमी सिनेमांना अशा प्रकारचे रिव्ह्यूज मिळतात. खूप कौतुक झालं. लोकं येऊन मला बिलगले. इतक्या वेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या. सर्वात मोठी प्रतिक्रिया म्हणजे या चित्रपटानं मला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हीदेखील माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. अक्षय कुमारनं हा चित्रपट प्रस्तुत करून आम्हाला पाठबळ दिल्यानं हे शक्य होऊ शकलं. युएसएमधील न्यूयॅार्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला बेस्ट स्क्रीनप्लेसाठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
… आणि मी उडालोच
खरं तर मला जेव्हा नरेन कुमार आणि दिग्दर्शक संदीप मोदी यांनी ‘चुंबक’ या चित्रपटाची ऑफर दिली, तेव्हा मी थोडा आश्चर्यचकीत झालो. फिल्ममेकर राम माधवानी माझे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांचा फोन आला होता. ते म्हणाले की, संदीप मोदी फोन करेल. त्याचं तुझ्याकडं काहीतरी काम आहे. त्यानंतर नरेन कुमार यांनी कॅाल केला. नरेन यांनी त्यापूर्वी एकदा मला ‘जॅाली एलएलबी’ या चित्रपटाची गाणी लिहिण्यासाठी कॅाल केला होता. त्यांनी सुभाष कपूर यांच्यासोबत पहिला ‘जॅाली एलएलबी’ बनवला होता. त्यामुळं मला वाटलं त्यांनी गाण्यासाठीच कॅाल केला असेल. कारण त्यावेळी मी गाणी लिहू शकलो नव्हतो. त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानं भेटायला गेलो. ते म्हणाले की, मी तुम्हाला एक मराठी स्क्रीप्ट ऐकवतो. त्यांनी स्क्रीप्ट ऐकवल्यावर मला कळेना की मी नेमकं काय करायचंय… त्यांनी थेट प्रसन्नचा रोल करण्याची ऑफर दिली. ते ऐकून मी अक्षरश: उडालोच. कारण एक चांगली संधी समोरून चालून आली होती. उत्कृष्ट सिनेमा, उत्तम स्क्रीप्ट, ग्रेट टीम आणि अशा चित्रपटात मेन रोल करायला कोण नकार देईल. मी तयार झालो आणि एक नवं चॅलेंज माझ्या आयुष्यात आलं.
नावाप्रमाणंच प्रसन्न कॅरेक्टर
प्रसन्न हे अत्यंत प्रसन्न कॅरेक्टर आहे. नावाप्रमाणंच तो प्रसन्न माणूस आहे. हे ऑटिस्टिक स्पेक्ट्रममधलं एक कॅरेक्टर आहे. खूपच निरागस आहे. मनात कोणताही भेदभाव नाही. एक मोठा माणूस जो लहान आहे आणि एक लहान मुलगा जो मोठा होऊ पाहतोय अशा दोघांची ही कथा आहे. यापूर्वी बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांनी अशा प्रकारच्या कॅरेक्टर्सना योग्य न्याय दिला आहे. संदीप आणि आम्ही सर्व जण या कॅरेक्टरबाबत चर्चा करायचो. यासाठी मी ऑटिस्टिक स्पेक्ट्रममध्ये जाऊन लोकांना, डॅाक्टर्सना भेटलो, बराच अभ्यास केला. संदीप यांच्या जवळच्या नातेवाईकावर आधारलेलं हे कॅरेक्टर आहे. त्यांनाही जाऊन भेटलो. त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की, आपण कधीही एका अशा कॅरेक्टरच्या आयुष्याबद्दल बोलत नाही. त्यामुळं आम्ही हे प्रामाणिकपणं करायचं ठरवलं. त्यात काहीही खोटं वाटता कामा नये. कोणतीही गोष्ट उगाच किंवा लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी करतोय असं वाटता कामा नये. त्याप्रकारे ते झाल्यानं मला वाटतं ते थेट पोहोचलं.
निरागसता सादर करण्याचं आव्हान
प्रसन्नमधली निरागसता सादर करण्याचं फार मोठं आव्हान होतं. हेच काम संदीप मोदींसोबत लेखक, एडिटर या सर्वांनी मिळून केलं आहे. या कॅरेक्टरला जितकं निरागस ठेवता येईल तितकं ठेवायचं होतं. मला त्या कॅरेक्टरबद्दल इतकंच वाटतं की, त्याच्या आयुष्यात खोटं काही नाही. एखाद्यानं आपल्याला खूप छान दिसतोयस असं म्हटलं की, आपण लगेच त्याच्या हेतूवर संशय घेतो. त्यानं आपल्याला कॅाम्प्लिमेंट का दिली यामागचा हेतू आपण शोधायला लागतो. प्रसन्न मुळीच तसा नाही. हा माणूस हेतू शोधतच नाही. तो जे वाक्य ऐकतो, त्याचा खराखुरा अर्थ घेतो. तो मुलगा म्हणतो, मी तुला पैसे देईन. हा म्हणतो, पैसे दे. इतकं सोपं आहे हे. आपण प्रत्येक गोष्टीचे दोन अर्थ काढतो, पण प्रसन्न काढत नाही.
यासाठी मराठीतच बनवण्याचा अट्टाहास
‘चुंबक’ हा चित्रपट मराठीतच का बनवायचा? हा प्रश्न मी देखील संदीप मोदींना विचारला होता. तू गुजराती व हिंदी भाषिक असताना तुला हा चित्रपट मराठीत का बनवायचा आहे… तो म्हणाला की, काही स्क्रीप्ट अशा असतात ज्यांचा आत्मा त्याच भाषेत असतो. मलाही ती गोष्ट पटली. मी जर ही गोष्ट हिंदीत करायला घेतली, तर तो आत्मा यात येणार नाही असं तो म्हणाला. या ‘चुंबक’चा आत्मा मराठीत आहे असं त्याला वाटलं. कारण त्यानं ती स्क्रीप्ट मराठीतच ऐकली होती. मोदी आणि सौरभ भावे यांनी सुरुवातीला ही स्क्रीप्ट मराठीतच कनसिव्ह केली होती.
आयुष्य सुंदर तऱ्हेनं जगावं
या सिनेमातून प्रेक्षकांना निखळ एन्टरटेन्मेंट मिळेलच, पण एक बोध असाही मिळेल की आयुष्य सुंदर आहे. जगण्याची तऱ्हा सुरेख आहेत. त्यामुळं आपण सुंदर तऱ्हेनं आयुष्य जगू शकतो इतकंच हा चित्रपट सांगेल. मध्यंतरी मी ‘रुद्रकाल’ या वेब सिरीजमध्ये साकारलेल्या पुढाऱ्याचंही लोकांनी खूप कौतुक केलं. सध्या दिग्दर्शक-कॅमेरामन अविनाश अरुणचा हिंदी चित्रपट करतोय. त्या जोडीला मी ‘शाब्बास मिठू’ आणि ‘गुड बाय’ या आगामी हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन केलं आहे. बालाजीच्या ‘कोड एम’ या शोमध्येही अभिनय केला आहे. लवकरच दिग्दर्शनातही परणार असल्यानं भविष्यात बऱ्याच गोष्टी हातून घडणार आहेत.