Male Fertility Problems
इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे शारीरिक संबंधांसाठी पुरेशी ताठरता मिळवण्यात किंवा ती टिकवून ठेवण्यात सातत्याने येणारी असमर्थता. इरेक्टाइल डिसफंक्शनमुळे संबंध ठेवण्यात अडथळा येतो, तेव्हा नैसर्गिक गर्भधारणेच्या संधी कमी होऊ शकतात.वीर्यस्खलनाशी संबंधित विकार वेगवेगळ्या प्रकारे प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात.
वीर्यस्खलनास उशीर होणे किंवा स्खलन न होणे, यामुळे वीर्य योनीमार्गात सोडले जाण्यास अडथळा येऊ शकतो. काही पुरुषांमध्ये रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन समस्येमुळे वीर्य लिंगातून बाहेर पडण्याऐवजी मागे मूत्राशयामध्ये जाते. परिणामी, शुक्राणू स्त्रीच्या पुनरुत्पादन मार्गापर्यंत पोहोचू शकत नाहीत, ज्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा कठीण होते.
ताठरता आणि वीर्यस्खलनातील समस्या अनेक वैद्यकीय तसेच मानसिक कारणांमुळे उद्भवू शकतात. मधुमेह, हार्मोनल असंतुलन, मज्जासंस्थेशी संबंधित विकार, रक्ताभिसरणावर परिणाम करणाऱ्या समस्या आणि काही विशिष्ट औषधे सामान्य लैंगिक कार्यामध्ये अडथळा आणू शकतात.
उदाहरणार्थ, नियंत्रणात नसलेल्या मधुमेहामुळे ताठरता आणि स्खलनाशी संबंधित मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. विशेषतः स्त्रीबीज निर्मितीच्या (ओव्ह्युलेशन) कालावधीनुसार शारीरिक संबंधांचे नियोजन केले जाते, तेव्हा निर्माण होणारा मानसिक ताण आणि परफॉर्मन्स अँझायटी (कामगिरीची चिंता) देखील यात भर घालू शकते.पण, सातत्याने जाणवणाऱ्या या अडचणी केवळ मानसिक कारणांमुळे आहेत असे परस्पर मानू नये, कारण यामागे एखाद्या सुप्त वैद्यकीय आजारावर लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते.
तपासणीची सुरुवात समस्येचे स्वरूप आणि समस्या किती काळापासून आहे हे समजून घेण्यासाठी सविस्तर वैद्यकीय व लैंगिक पार्श्वभूमी जाणून घेण्यापासून होते. या मूल्यांकनावर आधारित, डॉक्टर शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल आणि आकार तपासण्यासाठी सीमेन अॅनालिसिस करण्याचा सल्ला देऊ शकतात. उपचार समस्येच्या मूळ कारणावर अवलंबून असतात, ज्यामध्ये औषधोपचार, संबंधित आजारांचे नियंत्रण किंवा स्खलनाच्या विकारांवरील विशिष्ट वैद्यकीय उपायांचा समावेश असू शकतो.
हे उपाय करूनही नैसर्गिकरित्या गर्भधारणा न झाल्यास शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रजनन क्षमतेच्या इतर घटकांचा विचार करून गर्भाशयात वीर्य सोडणे (आययूआय) किंवा इंट्रासायटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शनसह (आयसीएसआय) आयव्हीएफ यांसारख्या सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञानाचा (एआरटी) विचार केला जाऊ शकतो. निवडक केसेसमध्ये शुक्राणू मिळवण्यासाठी विशेष प्रक्रियांचीही (स्पर्म रिट्रिव्हल) आवश्यकता भासू शकते.
गर्भधारणेचा प्रयत्न करताना सातत्याने ताठरता किंवा वीर्यस्खलनात अडचण येत असल्यास जोडप्यांनी तपासणीस उशीर न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा. समस्येचे मूळ कामजीवनात आहे, शुक्राणूंच्या गुणवत्तेत आहे की या दोन्हीमध्ये आहे, हे निश्चित केल्याने योग्य उपचार पद्धत ठरवण्यास आणि गर्भधारणेच्या शक्यता वाढवण्यास मदत होऊ शकते.
Health Tips: सतत थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? रोज खा ‘ही’ एक गोष्ट; शरीराला मिळतील अनेक फायदे






