Osteoporosis Day: फॅक्चर झाल्यानंतरच कळते हाडांचे आरोग्य! सरकारी रुग्णालयांत वर्षभरात साडेतीन हजार तपासण्या
World Osteoporosis Day: हाडे ठिसूळ होण्याचा आजार म्हणजेच ‘ऑस्टिओपोरोसिस’ अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता वाढत राहतो. रुग्णाला या आजाराची जाणीव होईपर्यंत हाडाला फ्रैक्चर झालेले असते. त्यामुळे फॅक्चर होण्याची वाट न पाहता हाडांतील घनता तपासणे आणि वेळेत उपचार सुरू करणे महत्त्वाचे आहे. आजच्या जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनानिमित्त हाडांच्या आरोग्याचा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारी रुग्णालयातील उपलब्ध सुविधेत गेल्या वर्षभरात सुमारे साडेतीन हजार तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे ७० टक्के महिला, तर ३० टक्के पुरुषांचा समावेश आहे.(फोटो सौजन्य – istock)
ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडांतील घनता कमी झाल्याने हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. त्यामुळे किरकोळ पडणे किंवा साध्या हालचालींमुळेही फॅक्चर होण्याचा धोका वाढतो. या आजाराचे निदान करण्यासाठी डेक्सा स्कॅनिंग मशीनद्वारे हाडांतील घनता तपासली जाते. मुंबईत केईएम, नायर या दोन पालिका रुग्णालयांत ही सुविधा आहे. खासगी रुग्णालयांत डेक्सा स्कॅनिंगसाठी साधारण चार ते पाच हजार रुपये खर्च येतो.
नायर रुग्णालयाच्या एंडोक्राइनोलॉजी विभाग प्रमुख डॉ. निखिल भागवत यांनी सांगितले की, ‘एका ५८ वर्षीय पुरुष रुग्णाच्या तपासणीत हा धोका स्पष्ट झाला. त्याचा एक्स-रे जवळपास सामान्य दिसत होता. हाडातील घनतेची तपासणीही फारशी खराब नव्हती. मात्र, मणक्यांतील फॅक्चर तपासण्यासाठी व्हर्टेब्रल फॅक्चर असेसमेंट केल्यानंतर मणक्यामध्ये २५ ते ३० टक्के कॉम्प्रेशन फ्रैक्चर आढळले. त्यानंतर औषधोपचार, व्यायाम आणि फिजिओथेरपी सुरू केली. वर्षभरानंतर केलेल्या स्कॅनमध्ये सुधारणा आढळली. त्यामुळे केवळ हाडांतील घनतेचा अहवाल पाहणे पुरेसे नसून, मणक्यांतील लपलेली फॅक्चर्स तपासणेही महत्त्वाचे ठरते.’
वाढते आयुर्मान आणि बदलती जीवनशैली यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या असंसर्गजन्य आजारांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विशेषतः महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हाडांतील घनता कमी होण्याचा धोका वाढतो. मात्र, नागरिकांमध्ये या आजाराबाबत अद्याप पुरेशी जागरूकता नाही. अनेकदा डॉक्टरांनी तपासणी सुचवल्यानंतरच रुग्ण तपासणी करून घेतात.
तज्ज्ञांच्या मते, रजोनिवृत्तीनंतरच्या महिला तसेच हाडे ठिसूळ होण्याचा धोका असलेल्या पुरुषांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हाडांतील घनतेची तपासणी करून घ्यावी. निदान झाल्यास रुग्णाच्या स्थितीनुसार औषधे, इंजेक्शन, व्यायाम आणि फिजिओथेरपीद्वारे उपचार करता येतात. वेळेत निदान आणि उपचार केल्यास धोका कमी करण्यास मदत होते. कारण फॅक्चर झाल्यानंतर हालचालींवर मर्यादा येऊन गंभीर परिणाम होऊ शकतो.
ऑस्टिओपोरोसिस हा अनेकदा लक्षणे न दाखवता वाढणारा आजार आहे. विशेषतः महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हाडे ठिसूळ होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वेळेत हाडांतील घनतेची तपासणी करणे आवश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास फॅक्चरचा धोका कमी करून रुग्णाचे जीवनमान टिकवता येऊ शकते. – डॉ. निखिल भागवत, प्रमुख, एंडोक्राइनोलॉजी विभाग, नायर रुग्णालय.
Ans: दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन साजरा केला जातो. हाडांचे आरोग्य, ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे आणि प्रतिबंध याबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
Ans: ऑस्टिओपोरोसिस हा हाडांचा घनपणा आणि मजबुती कमी करणारा आजार आहे. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन किरकोळ पडणे किंवा धक्का लागल्यानेही फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.
Ans: सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. हाडे सहज फ्रॅक्चर होणे, उंची कमी होणे, पाठ वाकणे किंवा सतत पाठदुखी होणे ही काही संभाव्य चिन्हे असू शकतात.






