Buldhana New EVM Machines for elections
नवीन एस-३ इव्हीएम मॉडेलचा वापर, त्याची कार्यपद्धती, चाचणी, हाताळणी तसेच मतदान प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर त्याचा प्रभावी वापर याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक आयोगाचे अवर सचिव शैलेंद्र वन्हाडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे अभियंते, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी, निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मतदान प्रक्रिया अधिक विश्वासार्ह, कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यावर निवडणूक आयोगाचा भर आहे. त्याच अनुषंगाने नवीन एस-३ ईव्हीएम मशीनची रचना, वैशिष्ट्ये, कार्यप्रणाली, तांत्रिक बाबी तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान मशीनचा वापर कशा पद्धतीने करावा, याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, नवीन ईव्हीएम मशीनमुळे मतदान केंद्रावरील प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासोबतच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. मशीनची योग्य हाताळणी आणि कार्यपद्धतीची माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व बाबींची पूर्वतयारी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. कार्यशाळेदरम्यान ईव्हीएमच्या तांत्रिक बाबी, मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे आणि मशीनच्या वापराबाबत सादरीकरण करण्यात आले.नवीन एस-३ ईव्हीएमचा वापर हा मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडणे आवश्यक आहे. नवीन ईव्हीएम यंत्रणेची कार्यपद्धती प्रत्यक्ष प्रशिक्षणातून आत्मसात करून निवडणुकीच्यावेळी तिचा योग्य व प्रभावी वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.






