ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Aanad Dighe) यांनी सुरु केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रोत्सव (Tembhi Naka Navratrotsav) सोहोळा संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे. शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर ठाण्यात टेंभी नाका नवरात्रोत्सवाचा मंडप पूजन सोहोळा पारपडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते हे मंडप पूजन पारपडले असून यावेळी ठाकरे समर्थक असलेले राजन विचारे आणि एकनाथ शिंदे एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शीत युद्ध पहायला मिळाले.
ठाण्याचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. आनंद दिघे यांना जाऊन २१ वर्ष उलटूनही त्यांनी ठाण्यात सुरु ठेवलेली नवरात्रोत्सवाची परंपरा आजतागायत ठाण्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते असलेले राजन विचारे आणि एकनाथ शिंदे जपत आले आहेत. यंदा टेंभी नाका नवरात्रोत्सवाचे ४२ वे वर्ष आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्यामुळे झालेल्या भूकंपानंतर विचारे आणि शिंदे यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिवसेने,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार पाडले.
शिवसेनेच्या तब्बल ५० आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भाजपशी हात मिळवणी करून भाजप आणि शिवसेनेचे नवीन सरकार स्थापन केले. मात्र शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणे पसंत केले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकदा ठाण्यात विविध कार्यक्रमांमध्ये आले, परंतु त्यावेळी ठाकरे गटात असेलेले राजन विचारे आणि समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्यापूर्वी संबंधित कार्यक्रमात उपस्थित रहायचे आणि शिंदे येण्यापूर्वी तेथून निघून जायचे, मात्र आज प्रथमच टेंभी नाका नवरात्रोत्सव मंडप पूजनावेळी शिंदे विचारे आमने सामने आले होते. यावेळी दोघांनी एकमेकांकडे पहाणं देखील टाळलं. यावेळी ठाकरे गटातील शिवसेनेचे जिल्ह्याध्यक्ष केदार दिघे देखील उपस्थित होते.






