

मुंबई : महाराष्ट्रातल्या (Maharashtra) प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांविषयीची माहिती माहितीच्या अधिकारामधून बाहेर आली आहे. राज्य सरकारमधील विविध विभाग आणि जिल्हा परिषदअंतर्गत २.४४ लाखांपेक्षा (More Than 2 Lakh Posts Vacant In Maharashtra Government) अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे.
शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली. एकूण २९ शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या १० लाख ७० हजार ८४० इतकी आहे. यापैकी ८ लाख २६ हजार ४३५ ही पदे भरलेली आहेत. तर २ लाख ४४ हजार ४०५ इतकी पदे रिक्त आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने रिक्त पदांची माहिती उपलब्ध दिली आहे. अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे ११ मे २०२२ रोजी अर्ज सादर करत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती देताना मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांस गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट अ, ब, क आणि ड मधील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली.
एकूण २९ शासकीय विभाग आणि जिल्हापरिषद यात मंजूर पदांची संख्या १०, ७०, ८४० इतकी आहे. ज्यापैकी ८,२६,४३५ ही पदे भरलेली आहेत. तर २,४४,४०५ ही पदे रिक्त आहेत. यात शासकीय कर्मचाऱ्यांची १,९२,४२५ तर जिल्हापरिषदेच्या ५१, ९८० अशी एकूण २,४४,४०५ पदे रिक्त आहेत. गृह विभागाची एकूण मंजूर पदे २,९२,८२० असून त्यापैकी ४६,८५१ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाची एकूण मंजूर पदे ६२,३५८ असून त्यापैकी २३,११२ पदे रिक्त आहेत.
अनिल गलगली यांच्या मते रिक्त पदामुळे सेवेत दिरंगाई होते आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागात रिक्त पदांची संख्या अधिक आहे. सरासरी २३ टक्के पदे रिक्त असली तरी काही विभागात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत पदे रिक्त असल्याची खंत अनिल गलगली यांनी व्यक्त करत केली आहे की शासनाने तत्काळ ही रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये नोकरभरती केलेली नाही. पुढची मेगाभरती केव्हा होईल याची खात्री नाही. परंतु दोन लाख पदे रिक्त असल्याची माहिती समोर आल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवर अतिरिक्त पदांचा किती ताण पडतोय हे समोर आले आहे. सरकारला नोकरभरतीचा मुहूर्त कधी सापडेल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.