राज्यभरात मोठ्या प्रशासकीय फेरबदलांचे वारे; 489 वरिष्ठ पोलिस निरीक्षक ACP पदाच्या पदोन्नती प्रक्रियेत (संग्रहित फोटो)
नवी मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात सुरू असलेल्या महत्त्वाच्या पदोन्नती प्रक्रियेअंतर्गत संपूर्ण राज्यात लवकरच एक मोठा प्रशासकीय फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्यभरातील तब्बल ४८९ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा ‘पोलिस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त’ (एसीपी) पदाच्या निवडसूचीमध्ये (पात्रता यादीत) समावेश करण्यात आला आहे. या पदोन्नतीसाठी राज्यातील विविध पोलीस आयुक्तालय आणि जिल्ह्यांमध्ये इच्छुक अधिकारी शर्यतीत आहेत. या बदल्या झाल्यावर महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांचा कारभार नव्या चेहऱ्यांकडे जाण्याची शक्यता आहे.
पदोन्नतीची अंतिम निवडसूची जाहीर करण्यापूर्वी नियमावलीनुसार संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे सेवापुस्तक गोपनीय, अहवाल, प्रलंबित विभागीय चौकशी तसेच इतर कायदेशीर बाबींची सखोल तपासणी सध्या सुरू आहे. ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र अधिकाऱ्यांची अंतिम पदोन्नती यादी व त्यानंतरच्या बदल्यांचे आदेश जारी केले जाणार आहेत.
नव्या चेहऱ्यांकडे धुरा सोपवण्याचे आव्हान
बदल्या आणि पदोन्नतीची ही संपूर्ण प्रक्रिया पुढील काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या मोक्याच्या आणि महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांची धुरा विविध शहरात व ग्रामीण भागात विविध ठिकाणी नेमक्या कोणत्या नव्या आणि तडफदार अधिकाऱ्यांच्या हाती सोपवणार, याकडे संपूर्ण पोलीस दल व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
…तर ‘साईड ब्रँच’चा रस्ता?
पदोन्नतीची निवडसूची जाहीर झाली असली, तरी वैयक्तिक किंवा तांत्रिक कारणांमुळे काही अधिकारी प्रमोशन स्वीकारण्यास असमर्थता दर्शवून ते नाकारण्याची शक्यता पोलीस वर्तुळात वर्तवली जात आहे. यामागे तांत्रिक किंवा फायदा-तोट्याची कारणे असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, नियमांनुसार जे अधिकारी पदोन्नती नाकारतील, त्यांना भविष्यात ‘साईड ब्रँच’सारख्या कमी महत्त्वाच्या शाखांमध्ये जबाबदाऱ्यांवर सामावून घेतले जाण्याची शक्यता असल्याने पदोन्नती टाळणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश
या पात्रता यादीमध्ये महाराष्ट्रभरातून ४८९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात राज्यातील महत्वाची शहरे असलेली मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महत्वाच्या जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. अनेक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व साईड ब्रँच आणि वाहतूक शाखेत कार्यरत असणारे राज्यभरातील इतर अधिकाऱ्यांची नावेही या यादीत झळकणार असल्याने उत्सुकता वाढली आहे.






