महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना चांगलाच रंगताना दिसून येत आहे. महापालिकेत भाजप नगरसेवक आज पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शुक्रवारी स्थायी समितीच्या ऑनलाईन बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बोलू न दिल्यानं भाजप सदस्यांनी दालनाबाहेरच आंदोलन सुरु केलं. त्याचवेळी शिवसेनेच्या सदस्यांनीही भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला मिळालं.
या घोषणाबाजीतच अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपण मागील १० ते १५ सभेत भाजपच्या सदस्यांनाच अधिक बोलायला दिले असे सांगत केवळ याचे राजकारण करू नका, असे सांगत त्यांची मनधरणी केली. परंतु भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मागच्या बैठकांचे सोडा, या बैठकीतील विषय क्रमांक ५१ वर का बोलू दिले नाही याचे उत्तर द्या, असे सांगत त्यांनी आता माघार नाहीच, असे सांगत रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन करत सत्ताधारी पक्षाला घाम आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, महापालिकेतील वातावरण चिघळू नये यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मध्यस्ती करत भाजप नगरसेवकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्ष आम्हाला बोलूच देत नसल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक आंदोलनावर ठाम राहिले. महापालिकेत भाजप सदस्यांचं 6 तासांपेक्षा अधिक काळ आंदोलन सुरु होतं.






