भाजपमध्ये आयारामांना संधी
जुन्या निष्ठावंतांची उपेक्षा
जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी
नांदेड : भाजपचा विस्तार आणि सत्तेपर्यंतचा प्रवास घडविण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आज पक्षातच उपेक्षित राहावे लागत असल्याची भावना संघविचाराशी जोडलेल्या जुन्या स्वयंसेवकांमधून व्यक्त होत आहे. दुसरीकडे, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन होत असताना मूळ कार्यकर्त्यांना मात्र संधी आणि सन्मानापासून दूर ठेवले जात असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
संघसंस्कारांतून घडलेल्या एका पिढीने राष्ट्राच्या पुनर्वैभवाचे स्वप्न उराशी बाळगून राजकीय क्षेत्रात संघविचाराचा प्रभाव निर्माण व्हावा, यासाठी आयुष्य वेचले. घरदार, संसार आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून अनेकांनी पक्षाची पालखी खांद्यावर घेतली. प्रतिकूल परिस्थितीत पक्षाचा विचार घराघरांत पोहोचविला. निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारला, अपमान सहन केला; मात्र विचारांशी आणि संघटनेशी असलेली निष्ठा सोडली नाही. त्यांच्या त्यागातूनच आजच्या भाजपची संघटनात्मक ताकद उभी राहिल्याचे जुने कार्यकर्ते सांगतात. मात्र, सत्ता प्राप्त झाल्यानंतर पक्षाच्या राजकारणात बदल घडत गेल्याचे चित्र आहे. पक्षविस्ताराच्या नावाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक प्रभावी नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
संघविचाराच्या स्वयंसेवकांमध्ये नाराजी
नांदेड जिल्ह्यात सूर्यकांता पाटील, भास्करराव पाटील खतगावकर, माधवराव पाटील किन्हाळकर यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशापर्यंत पोहोचला. या नेत्यांसोबत मोठा कार्यकर्ता वर्गही भाजपमध्ये आला. त्यातील अनेकांना संघटनेत आणि सत्तेत महत्त्वाच्या संधी मिळाल्या. नवीन नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेण्यास जुन्या कार्यकर्त्यांचा विरोध नाही. राजकीय विस्तारासाठी अशा तडजोडी आवश्यकही असतील. मात्र, या प्रक्रियेत पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणाऱ्या मूळ कार्यकर्त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नेत्यांसोबत आलेल्यांना पदे, प्रतिष्ठा आणि सत्तेतील वाटा मिळत असताना पक्षाचा पाया रचणारे कार्यकर्ते मात्र आजही त्याच ठिकाणी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
नेतृत्वाच्या आत्मपरीक्षणाची गरज
जिल्ह्यातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांना साधी मंत्र्यांची भेट मिळविण्यासाठीही प्रयत्न करावे लागत असल्याची खंत आहे. संघटनात्मक नेतृत्वाकडून आपली दखल घेतली जात नसल्याची भावना त्यांच्यात वाढत आहे. पक्षासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या कार्यकर्त्याला आपले म्हणणे मांडण्यासाठीही मध्यस्थांची गरज भासणे, ही संघटनात्मक पातळीवरील विसंगती असल्याचे मत व्यक्त होत आहे. अलीकडे जुन्या निष्ठावंतांना पुन्हा जवळ करण्याचे आणि त्यांचा सन्मान करण्याचे प्रयत्न होत असले, तरी ते केवळ सत्कार, छायाचित्रे आणि भाषणांपुरते मर्यादित राहू नयेत. जुन्या कार्यकर्त्यांना निर्णयप्रक्रियेत स्थान, संघटनेत जबाबदारी आणि सत्तेच्या व्यवस्थेत योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.
पाया रचणारेच दूर !
त्यांच्या अनुभवाचा उपयोग पक्षविस्तारासाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा संघविचाराशी संबंधित कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. सत्ता ही कायमस्वरूपी नसते; मात्र विचारांशी असलेली निष्ठा हीच कोणत्याही संघटनेची खरी ताकद असते. आज सत्तेच्या सावलीत असलेले अनेकजण राजकीय परिस्थितीनुसार आपली भूमिका बदलू शकतात; परंतु प्रतिकूल काळातही पक्षाची पालखी वाहणारा कार्यकर्ता संघटनेशी जोडलेला राहतो. अशा कार्यकर्त्यांच्या मनातच उपेक्षेची भावना निर्माण झाली, तर भविष्यात संघटनात्मक ताकदीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आयारामांचे स्वागत जरूर करा; मात्र घरातील निष्ठावंतांना बेदखल करून नव्यांना संधी देण्याचे राजकारण किती काळ चालणार? ज्यानी सत्तेचा पाया रचला, त्यांनाच सत्तेच्या दरबारात प्रवेश मिळत नसेल, तर भाजप नेतृत्वाने याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कारण पक्षाचा विस्तार होणे महत्त्वाचे असले, तरी तो विस्तार घडविणारा निष्ठावंत कार्यकर्ता हरवणे पक्षाला परवडणारे नाही, अशी भावना जुन्या संघ कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
भाजपसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षात पदे, संधी आणि सन्मान मिळत नसल्याची भावना आहे. दुसरीकडे, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे राजकीय पुनर्वसन होत असल्याने नाराजी वाढली आहे.
सूर्यकांता पाटील, भास्करराव पाटील खतगावकर, माधवराव पाटील किन्हाळकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांसारख्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
जुन्या कार्यकर्त्यांना केवळ सत्कार आणि सन्मानापुरते मर्यादित न ठेवता संघटनेत जबाबदारी, निर्णयप्रक्रियेत स्थान आणि सत्तेत योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांच्या योगदानाची दखल घेऊन आत्मपरीक्षण करावे, अशीही मागणी व्यक्त होत आहे.