विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाणची मुजोरी अन् विकृत समर्थनाचा प्रयत्न
बापट यांच्यावर हल्ला होताच अवघ्या काही तसातचं पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत हल्लेखोर संतोष चव्हाणला अटक केली. संतोष चव्हाण हा कोथरूड मधील राऊतवाडी परिसरातील रहिवासी आहे. तो स्थानिक ‘प्रियदर्शनी गणेश मंडळाचा’ माजी अध्यक्ष असल्याची माहिती आहे.
“गणेशोत्सवाविरोधात बोलणाऱ्याला कानाखाली मारणार”: आरोपीची मुजोरी
अटकेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोपी संतोष चव्हाणने त्याने केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही. तो म्हणाला, ” विद्यानंद बापट गणेशोत्सवावर टीका करतो, त्याला आणखी मारले पाहिजे.मी सोडणार नाही. पुणे शहरातील गणेशोत्सवाबद्दल जो कुणी बोलेल, त्याच्या अशाच कानाखाली मारणार.”
विद्यानंद बापटांचे सडेतोड प्रत्युत्तर
हल्ल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना विद्यानंद बापट म्हणाले, मी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एक वेडा आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलिस नाहीत हे पाहूनच त्याने माझ्यावर हल्ला केला. पोलिसांकडेही बंदुक नव्हती हे पाहूनच त्याने माझअयावर हल्ला केला. त्याला सरळ सांगून कळणार नाही, एका झोंबीसोबत युक्तीवाद करता येतो का. असा सवालही विद्यानंद बापट यांनी उपस्थित केला. पण सार्वजनिकरित्या सणउत्सव साजरे करत असताना ध्वनीप्रदुषण होणार नाही आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी आपणच घेतील पाहिजे, असं माझ म्हणणं आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करून शकता.
पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण आणि तपास
या प्रकरणावर बोलताना पोलीस परिमंडळ १ चे डीसीपी ऋषिकेश रावळे म्हणाले की, “घटना घडल्यानंतर तातडीने सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी करून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. बापट यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बापट यांना भविष्यात पोलीस संरक्षण देण्याबाबत पोलीस आढावा घेतील.”
गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यावर आणि न्यायालयात याचिकाकर्त्या असलेल्या व्यक्तीवर असा हल्ला झाल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






