आधार लिंक नाही, ई-केवायसी अपूर्ण; मावळमधील शेकडो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. मावळ तालुक्यातील शेकडो शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत.
maval farmers
Farmers newsmaval farmers
Published on: 
Updated on: 
  • पाच हजारांच्या मदतीपासून शेकडो शेतकरी वंचित

  • ई-केवायसी अन् फार्मर आयडीचा अडथळा

  • अनुदानासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे सुरू

मावळ :  दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. सरकारकडून मदतीचे वितरण सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी ई-केवायसीमधील त्रुटी, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे, फार्मर आयडी निष्क्रिय असणे तसेच महसूल विभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे मावळ तालुक्यातील शेकडो शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत.

सरकारच्या संबंधित अनुदान योजनेचा लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे, त्यांना अद्याप ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आधार, ई-केवायसी अन् फार्मर आयडी ठरताहेत अडथळा

अनेक शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे, नवीन फार्मर आयडी लवकर सक्रिय न होणे, तसेच ॲक्टिव्ह फार्मर आयडी नसणे अशा विविध अडचणी समोर येत आहेत. काही शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने अनुदानाची रक्कम खात्यावर जमा होण्यास विलंब होत आहे. सरकारी पातळीवरील तांत्रिक अडचणींमुळे तसेच अनुदानाची रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना संबंधित तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करावी लागत आहे.

ऑनलाइन प्रक्रियेबाबत माहितीचा अभाव

फार्मर आयडी किंवा पीएम-किसानसाठी ऑनलाइन प्रक्रिया, तसेच सीएससी सेंटरच्या माध्यमातून ई-केवायसी आणि माहितीतील दुरुस्ती करता येते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत आहेत.

निधी आला; मात्र खात्यात जमा नाही!

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अग्रिम मदतीचे पाच हजार रुपये अद्याप मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला असतानाही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित कागदपत्रांची पूर्तता करावी, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Q

शेतकऱ्यांना सरकारकडून किती रुपयांची आर्थिक मदत जाहीर झाली आहे?

A

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Q

शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात कोणत्या अडचणी येत आहेत?

A

ई-केवायसी अपूर्ण असणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे आणि फार्मर आयडी निष्क्रिय असणे या अडचणी येत आहेत.

Q

शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि कागदपत्रांतील दुरुस्ती कुठे करावी?

A

शेतकरी सीएससी सेंटरच्या माध्यमातून ई-केवायसी व माहितीतील दुरुस्ती करू शकतात. तसेच तहसील कार्यालयातही चौकशी करू शकतात.