Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
कुडुस गावाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीवर दहीहंडी बांधण्यात येते. विहिरीच्या काठावर उभे राहून गोविंदांना योग्य अंदाज घेत उंच उडी मारावी लागते. उडी घेतल्यानंतर हवेतच हंडी फोडण्याचे कौशल्य गोविंदांकडून दाखवले जाते. त्यामुळे पारंपरिक मानवी मनोऱ्यापेक्षा या दहीहंडीचा थरार वेगळाच अनुभवायला मिळतो.
यंदाही दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कुर्डसच्या देऊळ आळीत मोठी गर्दी झाली होती. विहिरीवर बांधण्यात आलेली हंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. गोविदांनी उत्साहात उंच उड्या घेत हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. हंडी फोडताना गोविंदांच्या कौशल्याबरोबरच त्यांच्या धाडसाचीही कसोटी लागली. या अनोख्या दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी कुर्द्धससह आजूबाजूच्या गावांमधूनही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावात काहीतरी वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी सुरू केलेली ही विहिरीवरची दहीहंडी आता कुर्डस गावाची वेगळी ओळख बनत आहे. पारंपरिक दहीहंडीच्या उत्साहाला आगळ्या पद्धतीची जोड मिळाल्याने या उत्सवाबाबत गोविंदा पथकांमध्येही उत्सुकता वाढत आहे. उत्सवाच्या शेवटी विजेत्या गोविंदाचा गदा आणि चषक देऊन गौरव करण्यात आला, ढोल-ताशांचा गजर आणि विहिरीवर उंच उडी घेत हंडी फोडण्याचा थरार यामुळे उत्साहाचे वातावरण असते.
दरम्यान, या आगळ्या-वेगळ्या दहीहंडीच्या माध्यमातून गावची परंपरा आणि उत्सवाची रंगत जपण्याचा प्रयत्न ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे कुर्डसची ‘विहिरीवरची दहीहंडी’ आता गोविंदांसाठीच नव्हे, तर परिसरातील नागरिकांसाठीही उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा विषय ठरत आहे.
‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
या परंपरेविषयी बोलताना स्थानिक ग्रामस्थ आणि नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई-नवी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या तरुणांनी आपला अभिमान व्यक्त केला. “आमच्या गावात जन्म घेतल्याचा आम्हाला मोठा अभिमान आहे. ही अनोखी परंपरा आज केवळ गावापुरती मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचली आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. दहीहंडीच्या निमित्ताने बाहेरगावी राहणारे चाकरमानी आवर्जून गावात एकत्र येतात. हा सोहळा पाहण्यासाठी नामांकित पत्रकार, यूट्यूबर्स आणि अनेक मान्यवर दरवर्षी आवर्जून हजेरी लावतात. या स्पर्धेसाठी आकर्षक चषक तसेच बक्षिसे देवली जातात.






