

औरंगजेबचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्याने साेलापूर जिल्ह्यातील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा समाज माध्यमातून प्रचार सुरु असल्याचा दावा हिंदुत्त्ववादी संघटना करु लागल्या आहेत. त्यातून बहुतांश ठिकाणी वादावादी हाेत आहे.
औरंगजेबाचे उदात्तीकरण व धार्मिक भावना दुखावणारे स्टेट्स मोबाइलवर ठेवल्याप्रकरणी कुंभारी विडी घरकुल येथील एकास वळसंग पोलिसांनी अटक केली आहे. शोएब मुश्ताक मंगळुरकर (रा. कुंभारी, दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी शोएब मंगळूरकर याने त्याच्या मोबाइलवर ८ जून रोजी स्टेट्स ठेवले होते. त्यावर इंग्रजीत हजरत औरंगजेब आलमगीर (आरए) असे एडिटिंग करून त्याखाली हिंदीतून मजकूर लिहिला होता. अनिरुद्ध जगदीश फलमारी (रा. नवीन विडी घरकुल) यांनी यासंदर्भात वळसंग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शोएब याने ठेवलेल्या स्टेट्समुळे धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, हा प्रकार समजल्यानंतर वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सनगले यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी विडी घरकुल भागास भेट देऊन पाहणी केली. या भागात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. तपास वळसंग पोलिस करीत आहेत.