पुणे : कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघातातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर केले जात असतानाच काहींनी त्याच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला.
पोर्शे कारने जोरदार धडक दिल्यानंतर दोन तरुण-तरुणीचा जागेवर मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला एक दिवसाच्या आतच जामीन मिळाला होता. त्यामुळे याचीच चर्चा संपूर्ण राज्यभर सुरु होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतले.
दरम्यान, विशाल अगरवाल याला आज पुण्यातील न्यायालयात हजर केले जात असतानाच त्याच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाला. याचदरम्यान त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या शाईफेकीचा प्रयत्न वंदे मातरम् या संघटनेकडून करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. तसेच त्यांच्याकडून विरोधात घोषणाबाजीही केली गेली.






