संग्रहित फोटो
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली मार्गावरील छत्रपती संभाजीनगर परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कल्पना योगेश ढवळे (वय अंदाजे 35 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती योगेश ढवळे याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सातच्या सुमारास कल्पना आणि योगेश यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर शाब्दिक भांडणात झाले. त्यानंतर रागाच्या भरात योगेशने कल्पना यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात कल्पना गंभीर जखमी झाल्या.
हेही वाचा: सोशल मीडियावर ओळख, एकतर्फी प्रेमाचा संशय; कॉलेजमधून घरी परतताना तरुणीची हत्या
हल्ल्यानंतर जखमी कल्पना यांना तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकाराने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर आरोपी योगेश ढवळे फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास रिसोड पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश ढवळे हा मूळचा वाशिम येथील काळेफैल परिसरातील रहिवासी आहे. तो मागील काही वर्षांपासून परभणी येथे स्थायिक झाला होता आणि एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. सुमारे पंधरा दिवसांपूर्वीच तो रिसोड शहरातील छत्रपती संभाजीनगर परिसरात भाड्याने राहायला आला होता. त्यानंतर काही दिवसांतच ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी रिसोड पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनेमागील नेमकी कारणे तपासातून स्पष्ट होणार आहेत.
Ans: वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील हिंगोली मार्गावरील छत्रपती संभाजीनगर परिसरात ही घटना घडली.
Ans: कल्पना योगेश ढवळे (वय अंदाजे 35 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर फरार झालेल्या योगेश ढवळे याला पोलिसांनी अटक केली आहे.






