‘ट्रीस्ट विथ डेस्टीनी’मध्ये आशिष यांच्या जोडीला सुहासिनी, विनीत कुमार सिंग, जयदीप अहलवात, कानी कुसृती, पालोमी घोष, व्हिक्टर बॅनर्जी, लिलेट दुबे, सहाना वासुदेवन, पूजा अगरवाल आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. याबद्दल आशिष म्हणाले की, ‘ट्रीस्ट विथ डेस्टीनी’ ही एक खूपच सुंदर कथा आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, ज्यावर कोणीही चर्चा करत नाही अशा कथा लिहिणं ही प्रशांतचं वैशिष्ट्य आहे. अशा घटना ज्यावर कोणी काहीही बोलायला तयार नसतं. ही कहाणी मी जेव्हा वाचली, स्क्रीप्ट वाचली, माझं कॅरेक्टर समजून घेतलं, तेव्हा मी म्हटलं की या कथेचा भाग आपल्याला बनायलाच हवं. त्यामुळं ‘ट्रीस्ट विथ डेस्टीनी’मध्ये काम करायला होकार दिला. सर्वांनी मिळून खूप छान काम केलं आहे. स्क्रीप्ट ऐकल्यावर सर्वजण लगेच कामाला लागलो. या महिन्याच्या सुरुवातीला सोनी लिव्हवर हा शो स्ट्रीम झाला असल्याचा आनंद आहे. तीन कथांचं मिश्रण या शोमध्ये आहे. याला आपण अँथॅालॅाजी म्हणतो. माझ्या कॅरेक्टरचं नाव दलावा आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी एक स्पीच दिली होती. त्यात त्यांनी विचारलं होती की, आपण खरोखर स्वतंत्र झालो आहोत… त्यांचा म्हणण्याचा उद्देश इतकाच होता की, काही विचार आपल्या मनात खोलवर रुजले गेले आहेत, ज्याचा त्याग आजही आपण करायला तयार नाहीत. त्यामुळं जीवनावर कसा परिणाम होतो ते सांगणाऱ्या अतिशय सुंदर कथा ‘ट्रीस्ट विथ डेस्टीनी’मध्ये आहेत. या तीन कथा मनाला भिडणाऱ्या आहेत. तीन कथा कशाप्रकारे एकमेकांशी निगडीत आहेत ते पाहाणंही प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं आहे. तीन कथांमधील विचार आणि भावना अतिशय सुरेखरीत्या पडद्यावर सादर करण्याचं काम करण्यात आल्यानं एका चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याचं समाधान लाभलं.
समस्यांवर मात करण्यात आनंद
सामाजिक विचारसरणीत आज खूप बदल झाला असल्याचं माझ्या निदर्शनास येत आहे. बदल सतत होत आहे. बदल होण्याची प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. आपण आणखी चांगले बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. आणखी चांगली प्रगती व्हावी, शिक्षण घेता यावं, रोजगार मिळावेत, आरोग्य सुधारावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं दोष देण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येक युगात समस्या असतातच. केवळ त्यांचं स्वरूप भिन्न असतं. प्रत्येक वेळी नवनवीन समस्या असतात. त्यावर मात करून पुढे जाण्यातच जीवनाचा खरा आनंद आहे. त्यामुळं हताश होऊन प्रयत्न सोडून द्यायचे नसतात. निरंतर वाटचाल करत रहाणं हाच यावरील एकमेव उपाय आहे. ‘ट्रीस्ट विथ डेस्टीनी’ हा चित्रपट हेच सांगतो की, आजच्या युगातही काही प्रश्न आहेत जे अद्याप सुटलेले नाहीत. यातून बरंच काही शिकायला मिळतं. या चित्रपटातील कहाणी अतिशय मनोरंजकरीत्या सांगण्यात आल्यानं ती प्रेक्षकांच्या मनाला भिडणार यात शंका नाही. लहान सहान गोष्टी आपल्या जीवनावर खूप प्रभाव टाकतात.
ही गोष्ट खूप युनिक आहे
‘ट्रीस्ट विथ डेस्टीनी’च्या कथानकाला ज्या प्रकारे अप्रोच करण्यात आलं आहे तेच खूप युनिक आहे. अतिशय बारीक सारीक पैलूंवर अत्यंत बारकाईनं आणि विचारपूर्वक काम करण्यात आलं आहे. याची जाणीव हा चित्रपट पाहताना प्रत्येकाला नक्कीच होईल. या सर्व गोष्टी अत्यंत सुरेख पद्धतीनं लिहीण्यात आल्या आहेत. हे सादर करण्यासाठी दिग्गज कलाकारांना एकत्र करण्यात आलं आहे. त्यामुळं एक वेगळीच मजा आली. ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळालं यातच ‘ट्रीस्ट विथ डेस्टीनी’चं वेगळेपण सिद्ध होतं. हा अतिशय मानाचा समजल्या जाणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेला पुरस्कार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे.
वेगवेगळे लेअर्स असलेला दलावा
खरं सांगायचं तर आजवर मी अशा प्रकारची व्यक्तिरेखा कधीही साकारलेली नाही. वेगवेगळ्या लेअर्स असलेलं हे कॅरेक्टर साकारण्यात एक वेगळीच गंमत होती आणि काही आव्हानंही होती. यातील बारीकसारीक गोष्टी सादर करताना खूप मजा आली. प्रेक्षकही जेव्हा हे पाहतील, तेव्हा त्यांनाही ते नक्कीच जाणवेल. नॅार्मली मला एखादं खलनायकी कॅरेक्टर दिलं जातं, पण यात बऱ्याच लेअर्स पाहायला मिळतील. या कॅरेक्टरचा स्वभाव खूप चांगला आहे, पण कित्येकदा तो नाराजही असतो. कारण त्याला स्वत:मध्ये काही कमतरता जाणवतात. प्रशांत खूप उत्तम लेखक आहेत. कथा सादर करण्याची त्यांची शैली इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. आपल्या कथांमध्ये लहान सहान गोष्टीही अधोरेखित करत त्यांना महत्त्व देण्याची त्यांची पद्धत मनाला भावते. परफॅार्मंससाठी त्यांची खूप मदत होते. त्यांच्यासोबत काम करताना बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या.
मराठीतच हे पाहायला मिळतं
मराठी सिनेसृष्टीत जबरदस्त चित्रपट बनत आहेत. मध्यंतरीच्या काळात मी राजेश म्हापूसकरांसोबत काम केलं. त्यांनी ‘व्हेंटीलेटर’ चित्रपट बनवला होता. कथानकाची समज, अंडरस्टँडींग आणि सेन्सिटीव्हीटी मराठीत पहायला मिळते. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार माझे मित्र आहेत. सयाजी शिंदे आणि संदीप कुलकर्णीसारखे मराठी सिनेसृष्टीत माझे काही खूप चांगले मित्र आहेत. मी १९९२मध्ये मुंबईत आल्यापासून संदीप आणि माझी मैत्री आहे. मराठी कलाकार खूप सुंदर असल्यानं तशाच प्रकारच्या भूमिकांची निवडही करतात. सयाजीसोबत बऱ्याच वर्षांपासून एकत्र काम करत असल्यानं त्यांच्याबद्दल खूप माहित आहे. मराठी कलाकार खूप खोलवर जाऊन आपल्या व्यक्तिरेखांचा अभ्यास करून त्या सादर करतात म्हणूनच त्या मनाला भिडतात. अशा कलाकारांसोबत काम केल्याचा मला अभिमान वाटतो.
सांभाळणं विसरून चालणार नाही
सांभाळून खेळा, पण खेळा… सांभाळून धावा, पण धावा… सांभाळून उड्या मारा, पण उड्या मारा… सांभाळणं विसरून चालणार नाही, पण कोरोना आणि लॅाकडाऊनच्या या कठीण काळात आपल्याला धावायचंही आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकमेकांना साथ द्यायची आहे. प्रेक्षकांची साथ लाभली, तर आपण सर्व नक्कीच यशस्वी होऊ. कलाकार, लेखक, दिग्दर्शक, फिल्ममेकरपासून स्पॅाटबॅायर्पंत कितीतरी लोकांचं जीवन आमच्याशी निगडीत आहे. आता सगळ्यांना मेहनत करायची आहे. आता थांबून चालणार नाही.