(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. टायगर श्रॉफ हा आरोपींचे सुरुवातीचे लक्ष्य नव्हते, असे तपासात समोर आले आहे. त्याआधी आरोपींनी अमिताभ बच्चन, आमीर खान आणि अक्षय कुमार या बॉलिवूडमधील तीन बड्या कलाकारांची रेकी केली होती. मात्र, कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदणे शक्य नसल्याने आरोपींनी टायगर श्रॉफला लक्ष्य केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला असून, टायगरवरील हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल आणि गोळ्या मुंबईत पोहोचवण्यासाठी ‘डेड लेटर बॉक्स’ पद्धतीचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांना आढळले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने अमृतसरमध्ये शस्त्र ठेवले होते. अनिल पंडित याने या शस्त्राचे लोकेशन कुणाल आणि सुमित यांना पाठवले. त्यानंतर सुमारे दोन आठवड्यांपूर्वी कुणाल आणि सुमित अमृतसरला गेले आणि त्यांनी पिस्तूल ताब्यात घेतले. शस्त्र मुंबईत पोहोचवण्यासाठी आरोपींनी दोन तरुणींची मदत घेतली. राधा आणि बबिता यांना दिल्लीहून मुंबईला रेल्वेने पाठवण्यात आले. यावेळी पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आले होते. अशा प्रकारे पोलिसांच्या नजरेत न येता शस्त्र मुंबईत आणण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
कुणाल नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. हरसाना गावातील एका मित्रामार्फत त्याची अनिल पंडितशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये एन्क्रिप्टेड ॲपवरून संपर्क सुरू होता. अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणालने अमृतसरमधून एक पिस्तूल आणि २० राऊंड घेतले. यावेळी सुमितही त्याच्यासोबत अमृतसरला गेला होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी ओळख झाली होती. त्याने राधाला आपल्या कारवायांची माहिती दिली होती. त्यानंतर तिला शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यास तयार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.
१५ ऑक्टोबर रोजी कुणाल राधा आणि बबिताला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घेऊन गेला. पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आले. रेल्वे प्रवासादरम्यान कुणाल एन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून अनिल पंडितच्या संपर्कात होता आणि त्याच्या सूचनांनुसार पुढील हालचाली करत होता. शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी अनिल पंडितकडून सुमारे ७० ते ८० हजार रुपये देण्यात आल्याचेही पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. त्यातील १० ते १२ हजार रुपये राधा आणि बबिताला देण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
१८ ऑक्टोबर रोजी एका पार्कबाहेर टायगर श्रॉफच्या गाडीवर दोघांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात टायगर सुदैवाने बचावला. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. टायगरवरील हल्ल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचे नेटवर्क, शस्त्रांचा पुरवठा, हल्ल्याचा कट आणि यामागील सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. या तपासातून बॉलिवूडमधील इतर कलाकारांची रेकी का करण्यात आली होती आणि टायगरला अंतिम लक्ष्य कसे बनवण्यात आले, याचाही उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Ans: अमिताभ बच्चन, आमीर खान आणि अक्षय कुमार यांची रेकी झाल्याचे तपासात समोर आले आहे.
Ans: अमृतसरमधून पिस्तूल मिळवल्यानंतर ते दिल्लीहून रेल्वेने मुंबईत आणण्यात आले. यासाठी दोन तरुणींची मदत घेतल्याचे समोर आले आहे.
Ans: इतर बड्या कलाकारांची कडेकोट सुरक्षा भेदणे कठीण असल्याने टायगरला लक्ष्य केल्याचा पोलिसांचा तपास आहे.






