(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत अनेक पुरुष कलाकारांनी स्त्री-भूमिका साकारल्या आहेत.‘अशी ही बनवाबनवी’ मध्ये सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.तसेच, ‘बालगंधर्व’ चित्रपटात सुबोध भावे आणि अभिजित केळकर यांनी केलेल्या स्त्री-भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या.अशातच आता प्रसिद्ध विनोदी शो ‘चला हवा येऊ द्या’ मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता सागर कारंडे अनेक वेळा स्त्री भूमिका साकारल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्याने स्त्री भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे.
”पुरुष कलाकारानं स्त्री व्यक्तिरेखा साकारताना कोणत्याही प्रकारे त्यांचा अपमान होणार नाही, हे डोक्यात आणि मनात फिट बसवलं पाहिजे. कसंही नाचणं, उड्या मारणं, वाकडेतिकडे हातवारे करणं, विचित्र हावभाव करणं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा साकारणं असं नसतं’ ‘ती व्यक्तिरेखा साकारताना त्या कलाकाराला भारी वाटलं पाहिजे, साडी सांभाळणं हे माझ्यासमोर मोठं आव्हान होतं, साडी नेसल्यावर नीटनेटकं वावरणं आवश्यक असतं. कुठे पदर सरकला आहे, पोट दिसतंय, हे होता कामा नये. दुसऱ्या बाईली ती व्यक्तिरेखा पाहताना छान वाटलं पाहिजे, हे माझं ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमासाठी ध्येय असायचं. वावरण्यात महिलांप्रमाणे सहजता यावी म्हणून मी आई आणि पत्नीचं निरीक्षण करायचो, कारण मी साकारलेली स्त्री माझी मुलगी पाहणार होती. तिच्यापर्यंत ते सन्मानपूर्वकच पोहोचलं पाहिजे, असा माझा विचार होता.” असं सागरने पुढे सांगितलं.
सागर कारंडे हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि विनोदी कलाकार आहे. त्याला विशेषतः लोकप्रिय विनोदी शो ‘चला हवा येऊ द्या’ मधील त्याच्या धमाल पात्रांमुळे ओळखलं जातं. तो आपल्या हसवणाऱ्या शैली, विविध व्यक्तिरेखा सादरीकरण आणि स्त्री पात्रातील सहज अभिनय यासाठी प्रसिद्ध आहे. सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके या अभिनेत्यांनी स्त्री भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांना या भूमिका देखील प्रचंड आवडल्या आहेत, यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असते.