फोटो सौजन्य- pinterest
शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झालेली आहे. सर्वत्र भक्तीभावाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. यादरम्यान देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या पाहायला मिळतात. असेच जागृत आणि स्वयंभू असलेले पालघर जिल्ह्यातील धानो तालुक्यातील चारोटी गावाजवळ महालक्ष्मी आणि संतोषी माता देवीचे मंदिर आहे. या मंदिराला धार्मिक महत्त्व आणि इतिहास आहे. या मंदिरामध्ये नवरात्रोत्सवात गर्दी असते. जाणून घेऊया प्रसिद्ध मंदिराविषयी.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी देवी आणि संतोषी माता यांची प्रसिद्ध मंदिर आहेत. हे मंदिर भाविकांसाठी महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. दोन्ही मंदिरांना भेट दिल्यास देवीचे दर्शन, स्थानिक आदिवासी संस्कृती आणि निसर्गरम्य परिसर यांचा अनुभव घेता येतो.
डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे असलेले हे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची स्थापना इ.स. १३०६ मध्ये जव्हारचे राजे महाराजा जयबाजीराव मुकणे यांनी केली होती.
देवीला धन, समृद्धी, सुख आणि कल्याणाची अधिष्ठात्री मानले जाते. या देवीला आदिवासी बांधव ‘कोळवणची महालक्ष्मी’ किंवा ‘आदिमाता’ असे मानले जाते. येथील पुजारी पारंपरिक आदिवासी समाजातील (वाघमारे/सातवी कुटुंब) असतात. या देवीच्या मंदिरात उत्सवादरम्यान वारली आणि इतर स्थानिक आदिवासी समाजाचा सहभाग असतो. तारपा नृत्य हे या भागातील सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे.
दरवर्षी हनुमान जयंतीपासून महालक्ष्मी देवीच्या यात्रेला सुरुवात होते हा उत्सव १५ दिवसांचा असून खूप प्रसिद्ध आहे. या काळात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. यात्रेच्या काळात गर्दी जास्त असते. तसेच शारदीय आणि चैत्र नवरात्र काळात देखील या मंदिरात खूप गर्दी असते.
असे सांगितले जाते की, कोल्हापूरची महालक्ष्मी माता गुजरातकडे जात असताना या भागात विसावली होती. येथे देवीची दोन मंदिरे आहेत: एक डोंगरावर (महालक्ष्मी गड) आणि दुसरे डोंगराच्या पायथ्याशी. गडावर जाण्यासाठी अंदाजे ९०० ते १००० पायऱ्या आहेत. गरोदर आणि वृद्ध भाविकांना वर चढणे शक्य व्हावे म्हणून माता स्वतः पायथ्याशी प्रकट झाली, ज्यामुळे पायथ्याचे मंदिर मुख्य मानले जाते.
डहाणू परिसरातील आशागड येथील संतोषी माता मंदिर हे निसर्गरम्य वातावरणातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे नवीन मंदिराबरोबरच जुने मंदिर आणि दगडांच्या कपारीतील गुहेसारखे स्थान असल्याची माहिती मिळते. स्थानिक पौराणिक कथेनुसार तेथे संतोषी मातेचे स्वयंभू स्थान आहे. त्यामुळे याला जागृत देवस्थान म्हटले जाते. या गुहेमध्ये जाताना खाली वाकून जावे लागते. एकावेळी एक व्यक्ती आत जाऊन देवीचे दर्शन घेऊन त्याच पाउली मागे यावे लागते.
संतोषी मातेला समाधान, सुख, शांती आणि कौटुंबिक कल्याण देणारी देवी मानले जाते. भाविक देवीचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. संतोषी माता ही महालक्ष्मीचे रूप आणि गणपतीची कन्या असल्याची पौराणिक मान्यता काही परंपरांमध्ये सांगितली जाते.
१९६० मध्ये ‘जेठ्या बाळा करमोडा’ यांना एका पिंपरीच्या झाडाखाली देवीचा दृष्टांत झाला होता. त्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवात अष्टमीच्या दिवशी गुहेत स्वयंभू मूर्तीची स्थापना केली.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






