Navratri 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
एका मातीच्या भांड्यात आधी थोडी माती टाकतात, मग त्यावर धान्य टाकतात आणि परत वरून माती टाकून झाकतात. रोज सकाळ-संध्याकाळ थोडे पाणी मारतात. 2-3 दिवसातच त्याला छोटे कोंब फुटायला लागतात. 9 दिवसात ते चांगले वाढते. याला उत्तर भारतात जवारा म्हणतात.
पहिले कारण धार्मिक आहे. देवी दुर्गा ही जन्म देणारी, सृष्टी निर्माण करणारी देवी आहे. बी मधून कोंब येणे म्हणजे नवीन जन्म होणे. त्यासाठी घटामध्ये धान्य पेरणे त्याच अर्थ देवीच्या सृजन शक्तीची पूजा आहे. ते कोंब म्हणजे समृद्धी, भरभराट आणि चांगल्या दिवसांचे लक्षण समजले जाते.
दुसरे कारण शेतीशी जोडलेले आहे. आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. पूर्वीच्या काळी लोक शेतीवरच जगायचे. नवरात्रीचा काळ हा शेतीसाठी महत्वाचा असतो. त्यामुळे मातीत धान्य पेरून त्याची वाढ बघणे म्हणजे शेतकरी आपल्या शेतीची आठवण करतो. निसर्गाने आपल्याला अन्न दिले त्याबद्दल आभार मानण्याचा हा प्रकार आहे.
याचा काही एकच नियम नाही, प्रत्येक भागात वेगळी पद्धत आहे.सगळ्यात जास्त लोक जव पेरतात. जवाचे कोंब लवकर येतात आणि एकदम हिरवेगार दिसतात. ते शुभ मानले जाते.गहू पण भरपूर लोक पेरतात. गहू म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहे.काही घरांमध्ये तांदूळ पेरतात. तांदूळ तर पूजेत लागतोच.काही ठिकाणी मूग, हरभरा, तीळ असे कडधान्य पण पेरले जाते. तसेच काहीजण यामध्ये सात प्रकारचे धान्य पेरतात. त्याला सप्तधान्य असे म्हणतात. त्यात गहू, जव, तांदूळ, हरभरा, मूग, बाजरी आणि तीळ असे काहीही घेऊ शकता. तुमच्या घरात जे सहज मिळेल ते पेरा.
9 दिवसात कोंब किती वाढले यावरून लोक अंदाज लावतात. जर कोंब हिरवेगार आणि सरळ वाढले तर घरात सुख-शांती राहणार, पीक चांगले येणार अशी श्रद्धा आहे. अर्थात हे शास्त्रीय नाही, माती चांगली असेल, पाणी योग्य असेल तर कोंब चांगले वाढणारच.
दसऱ्याला किंवा नवरात्री संपल्यावर हे कोंब उपटून देवीला वाहतात. काही ठिकाणी लोक हे कोंब एकमेकांना देतात आणि शुभेच्छा देतात. काही लोक याचे विसर्जन करतात. तुमच्या घरात जशी पद्धत असेल तसे करा.एक गोष्ट नक्की, ही परंपरा फक्त धार्मिक नाही तर आपल्याला निसर्गाशी जोडणारी आहे.






