Kabaddi Tournament : हनुमान उडीने गाजवले मैदान; विजय क्लब, नवोदितची दमदार आगेकूच!
दादर येथील भवानी माता क्रीडांगणावर शिवनेरी सेवा मंडळाच्या 58 व्या शिवनेरी कबड्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी खेळाडूंनी आक्रमक चढाया आणि भक्कम पकडींच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. कुमार गटात अमर क्रीडा मंडळ, श्रीराम विश्वस्त क्रीडा मंडळ, नवोदित संघ आणि विजय क्लब यांनी विजय मिळवला.
महिला गटात स्वामी समर्थ महिला संघ आणि जिजामाता संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. निखिल लॉजिस्टिक्सचे सुरेश भाई कदम यांनी या स्पर्धेला प्रायोजकत्व दिले आहे.
कुमार गटात अमर क्रीडा मंडळाने गोकुळ क्रीडा मंडळावर मोठ्या फरकाने विजय मिळवला. अमरच्या साहिल बनगरने चढायांमध्ये प्रभावी खेळ केला, तर शुभम भागवतने बचावात मोलाची भूमिका बजावली. गोकुळच्या श्रेयश थोरातने चढायांमधून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
श्रीराम विश्वस्त क्रीडा मंडळाने सिद्धी प्रभा फाउंडेशनवर पाच गुणांनी मात केली. श्रीरामच्या अमित सिंगने चढायांमध्ये गुणांची कमाई केली, तर हर्ष काळेने पकडींमध्ये प्रभावी कामगिरी केली. सिद्धी प्रभा फाउंडेशनच्या सिद्धेश भोसलेने चढायांतून आव्हान उभे केले, तर दिलीप साईलने बचावात झुंज दिली.
ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा
महिला गटात स्वामी समर्थ महिला संघाने आई महाकाली महिला संघावर २७ गुणांनी विजय मिळवला. स्वामी समर्थच्या प्रीती हांडेने चढायांमध्ये प्रभावी खेळ केला, तर आर्या रावळने पकडींमध्ये योगदान दिले. आई महाकालीच्या कीर्ती गोपाळेने चढायांमधून संघाला लढतीत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या सामन्यात जिजामाता संघाने गणेश स्पोर्ट्स क्लबचा ४१-१६ असा पराभव केला.
Asian Champions Trophy साठी भारतीय हॉकी संघ जाहीर; कृष्ण पाठकचे पुनरागमन
व्यावसायिक गटातील दोन्ही सामने अखेरच्या टप्प्यापर्यंत रंगतदार ठरले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गंधेकर इलेक्ट्रिकल यांच्यातील लढतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. विजयी संघाच्या शुभम खारगावकरने चढायांमध्ये, तर जितेंद्र यादवने पकडींमध्ये प्रभावी कामगिरी केली. गंधेकर इलेक्ट्रिकलच्या आदित्य घोडेरावने चढायांमधून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला, तर सौरभ दिवेकरने बचावात योगदान दिले. दुसऱ्या सामन्यात वेस्टजेन ॲकॅडमीने सिद्धी कन्स्ट्रक्शनवर एका गुणाने मात केली.






