U19 Women's T20 World Cup : महिला संघाच्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान वेगवेगळ्या गटांत! सौजन्य : आयएएनएस
आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक 2027 (U19 Women’s T20 World Cup ) च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेश आणि नेपाळ येथे 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार असून, भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या गटात स्थान देण्यात आले आहे. गतविजेत्या भारतीय संघासमोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान असेल.
या स्पर्धेतील सामने बांगलादेशमधील चितगाव आणि सिलहट, तसेच नेपाळची राजधानी काठमांडू येथे खेळवले जाणार आहेत. एकूण 41 सामन्यांचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. सहभागी 16 संघांची प्रत्येकी 4 संघांच्या 4 गटांत विभागणी करण्यात आली आहे. गटातील सामने 26 जानेवारीपर्यंत खेळवले जातील. त्यानंतर पात्र संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील. या फेरीतील दोन गटांमधून प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
भारताचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला असून, या गटात आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि यजमान नेपाळ यांचाही समावेश आहे. भारतीय संघ 22 जानेवारीला काठमांडू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्याच दिवशी नेपाळचा संघ आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरेल.
‘ब’ गटात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि सामोआ यांचा समावेश आहे. ‘क’ गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे संघ आहेत. ‘ड’ गटात इंग्लंड, श्रीलंका, अमेरिका आणि स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे.
Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी, 21 जानेवारीला चार सामने खेळवले जाणार आहेत. सिलहट येथे यजमान बांगलादेशचा सामना यूएईशी होईल. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नायजेरिया यांच्यात लढत रंगेल. काठमांडू येथे श्रीलंका-स्कॉटलंड आणि इंग्लंड-अमेरिका यांच्यात सामने होतील.
चितगावमधील बीर श्रेष्ठ शहीद फ्लाइट लेफ्टनंट मतिउर रहमान क्रिकेट स्टेडियम, सिलहट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, काठमांडूतील त्रिभुवन इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि अपर मुलपानी इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड या चार मैदानांवर स्पर्धेतील सामने खेळवले जाणार आहेत.
स्पर्धेतील उपांत्य सामने 4 फेब्रुवारीला चितगाव येथील बीर श्रेष्ठ शहीद फ्लाइट लेफ्टनंट मतिउर रहमान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. 5 फेब्रुवारी हा राखीव दिवस असेल. अंतिम सामना 6 फेब्रुवारीला स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. अंतिम सामन्यासाठी 7 फेब्रुवारी हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी या स्पर्धेमुळे युवा महिला क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल, असे सांगितले. ही स्पर्धा क्रिकेटच्या भविष्याची झलक दाखवणारे व्यासपीठ असून, सहभागी युवा खेळाडू जगभरातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बांगलादेश आणि नेपाळ या सहयजमान देशांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता आणि युवा लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊन या देशांची निवड केल्याचेही त्यांनी नमूद केले.
Ans: ही स्पर्धा २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहे.
Ans: भारताचा पहिला सामना २२ जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे.
Ans: भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत का?






