विराट कोहली नवा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत (फोटो- ians)
आजपासून सुरू होणार आयपीएलचे पर्व
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना
विराट कोहली नवा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत
Tata IPL 2026/ RCB vs SRH: आजपासून आयपीएलचा महाउत्सव सुरू होत आहे. बंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना होणार आहे. दोन्ही संघ आज मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान रनमशीन म्हणून ओळख असलेला विराट कोहली नवा रेकॉर्ड रचण्याच्या तयारीत आहे. तो रेकॉर्ड नेमका काय असणार आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.
विराट कोहलीने सर्व क्रिकेटमध्ये आपला क्लास दाखवला आहे. अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. हैदराबादच्या संघाविरुद्ध विराटचा फॉर्म चांगला राहिल्याचे दिसून आले आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 8,661 धावा केल्या आहेत. त्याने अजून 339 धावा या हंगामात पूर्ण केल्या तर 9 हजार धावा आयपीएलमध्ये करणार विराट कोहली हा पहिला खेळाडू असणार आहे.
विराट कोहलीने आरसीबीसाठी आतापर्यंत 9,085 धावा केल्या आहेत, यंदाच्या हंगामात त्याने अजून 915 धावा केल्यास, विराट एकाच संघासाठी 10 हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. विराट कोहली आयपीएल सुरू झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडूनच खेळत आहे. मागील वर्षी कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वात बंगलोरच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे.
9 षटकार मारताच होणार नवा रेकॉर्ड
विराट कोहलीने जर या हंगामात 9 सिक्स मारले तर तो एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे. एकाच संघासाठी 300 षटकार मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर होणार आहे. विराट कोहलीचा क्लास बघता 9 षटकार मारणे त्याच्यासाठी काहीच अवघड दिसून येत नाहीये. असे झाल्यास विराट कोहलीसुद्धा रोहित शर्मा, क्रिस गेल यांच्या यादीत सामील होणार आहे.
IPL 2026: विराटचा 973 धावांचा विक्रम कोण मोडणार? RCB च्या ‘या’ स्टार खेळाडूने केले मोठे भाकित
जितेश शर्माला असे वाटते की, विराट कोहली या हंगामात स्वतःचाच 973 धावांचा विक्रम मोडू शकतो. 2016 च्या आयपीएलमध्ये, कोहलीने 16 सामन्यांत मिळून 973 धावा केल्या होत्या ही धावसंख्या आजही कोणत्याही फलंदाजाने एकाच हंगामात केलेल्या सर्वाधिक धावा म्हणून कायम आहे. युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया याला दिलेल्या एका अलीकडील मुलाखतीत, जितेशने असे नमूद केले की, कोहली ज्या प्रकारे नेट्समध्ये (सराव सत्रात) फलंदाजी करत आहे, ते खरोखरच अप्रतिम आहे. त्याने असे निरीक्षण नोंदवले की, बॅटचा चेंडूशी संपर्क झाल्यावर येणारा आवाज तो विशिष्ट असा ‘थडथडणारा’ आवाज हे स्पष्टपणे दर्शवतो की कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.






