

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, आता व्हॉट्सअॅपमध्ये नॉइज कँसिलेशन (Noise Cancellation) फीचर जोडण्यात आले आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल दरम्यान बॅकग्राऊंडमधील आवाज कमी होणार आहे. सध्या कंपनीचे हे नवीन फीचर केवळ अँड्रॉईड बीटा यूजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. असं सांगितलं जात आहे की, लवकरच सर्व यूजर्सना या नवीन फीचरचा वापर करता येणार आहे.
व्हॉट्सअॅप नॉइज कँसलेशन फीचर कॉलदरम्यान आजूबाजूचा गोंधळ जसे ट्रॅफिक, हवा किंवा गर्दीचा आवाज फिल्टर करतो. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ही संपूर्ण प्रोसेस रियल-टाइममध्ये पूर्ण होते आणि कॉलवर बोलताना समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू जातो. कंपनीने संगितलं आहे की, या नवीन फीचर कॉलिंगची क्वालिटी सुधारणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, हे नवीन फीचर सध्या निवडक अँड्रॉईड बीटा यूजर्ससाठी सुरु करण्यात आले आहे. विशेषत: ज्या यूजर्सकडे व्हॉट्सअॅपचे बीटा वर्जन 2.26.14.1 आहे, त्या यूजर्सना या नवीन फीचरचा वापर करण्याची सुविधा मिळणार आहे. येणाऱ्या काळात हे फीचर सर्व यूजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्हॉट्सअॅप कॉलिंगदरम्यान नवं फीचर आपोआप अॅक्टिव्ह होते. त्यामुळे प्रत्येक कॉलिंगदरम्यान यूजर्सना हे फीचर सुरु करण्याची गरज भासत नाही. कॉलिंग स्क्रीनवर याचा पर्याय देण्यात आला आहे. आवश्यकता नसेल तर यूजर्स हे फीचर बंद करू शकणार आहेत. अधिक चांगला अनुभव पाहिजे असेल तर कॉलवर बोलणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी व्हॉट्सअॅप नॉइज कँसलेशन फीचरचा वापर करणं गरजेचं आहे. जर केवळ एकच यूजर या फीचरचा वापर करत असेल तर केवळ त्याचाच आवाज स्पष्टपणे ऐकू जाणार आहे. समोरील व्यक्तीच्या व्हॉईस क्वालिटीमध्ये कोणताही बदल होणार नाही.
हे फीचर अशा लोकांसाठी उपयोगी ठरणार आहे, जे लोक वारंवार प्रवास करतात किंवा गोंगाटाच्या ठिकाणी कॉल करतात. आता रस्ता, बाजार, गर्दीच्या ठिकाणी हे फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कंपनीचे हे नवीन फीचर सर्व यूजर्ससाठी कधी उपलब्ध केले जाईल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही.