srilanka food crisis
नवी दिल्ली : भारताचे दक्षिणेकडील मित्रराष्ट्र श्रीलंका (Srilanka), स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक गंभीर आर्थिक परिस्थितीतून जात आहे. देशात महागाईचा दर (Inflation Rate) १७ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल खरेदी करण्यासाठी काही तासांच्या रांगेत (Economic Crisis In Srilanka) उभे राहावे लागत आहे. काही जणांचा मृत्यू या रांगेतच होतो आहे. भारतावरही या सगळ्याचा दबाव वाढतो आहे. सरकारच्या भ्रष्ट धोरणामुळे ही वेळ आल्याचे श्रीलंकन नागरिकांचे मत आहे. गेल्या दोन वर्षांत परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे नागरिक सांगत आहेत.
ज्यांच्या घरात एक दोन रोजगार होते, ते रोजगारही आता गेले आहेत. घरातील वयस्कर व्यक्तिंना औषधासाठीही पैसे उपलब्ध नाहीत. बाजारात औषधे उपलब्ध नाहीत, असली तर ती दुप्पट किमतीने विकत घ्यावी लागत आहेत. अनेक तरुण मुलांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बचत अपुरी पडते आहे, कारण वस्तुंचे भाव चौपच पाचपट झाले आहेत. अशा स्थितीत घर चालवायेच कसे, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.श्रीलंकेत सध्या अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार सध्या एक कप चहा पिणेही परवडेनासे झाले आहे.
[read_also content=”आयएएस टीना डाबी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार, १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या मराठी आयएएस अधिकाऱ्याशी करणार लग्न, गेल्या वर्षी झाला होता घटस्फोट https://www.navarashtra.com/india/ias-tina-dabi-to-tie-the-knot-for-second-time-to-marry-a-13-year-old-marathi-ias-officer-nrps-261274.html”]
इंधन नसल्याने वीज नाही
श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही विदेशात काम करणारे नोकरदार आणि पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना काळात हे दोन्हीही बंद असल्याने याचा मोठा परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. यात श्रीलंकेची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे.श्रीलंकेकडे परकीय भांडवल नसल्याने इंधन विकत घेणे अवघड झाले आहे. तसेच अन्नधान्य आणि औषधांबाबतही हीच बोंब आहे. मार्च २०२० पासून कोणत्याही वस्तूच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. इंधन नसल्याने सहा सहा तास वीज गायब आहे.
श्रीलंकेवर सध्या ५१ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. क्रेडिट एजन्सींच्या माहितीनुसार, हे कर्ज देश फेडूच शकणार नाही, अशी स्थिती आहे. श्रीलंकेने चीनकडूनही मोठे कर्ज घेतले आहे. आता या कर्जाची पुनर्बांधणी करण्याची मागणी करण्यात येते आहे.
श्रीलंकेत गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या भ्रष्टाचारामुळे ही स्थिती ओढवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही मोजक्या राजकीय घराण्यांच्या हातात सत्ता आणि आर्थव्यवस्था एकवटलेली आहे. भ्रष्टाचार, राजकीय घराणेशाही यामुळे देश गाळात रुतत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. भारतातील एका रुपयाचे मूल्य श्रीलंकेत ३.८१ इतके आहे. श्रीलंकेत सध्या अर्धा किलो दूध पावडर ८०० रुपयांना मिळते आहे. या सगळ्या काळात पैशांचे मूल्य कमी झआल्याने भाज्या, दूध, अन्नधान्य प्रचंड महागली आहेत. दररोजचे पोट भरण्याचेही अनेकांचे वांधे आहेत.
या सगळ्या काळात सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम श्रीलंकन सरकारतर्फे करण्यात येते आहे. वस्तुंचा तुटवडा निर्माण झाल्यासारखी स्थिती असल्याने नागरिकांचे अनेक तास हे रांगेत उभे राहण्यात खर्च पडत आहेत. सगळ्याच ठिकाणी रांगा असल्याने नागरिक वैतागले आहेत. अनेकांचे प्राण या रांगेत गेल्याचेही सांगण्यात येत आहे. हळूहळू सरकारविरोधातील राग वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी सरकारविरोधात आंदोलने होत आहेत.