Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; 'या' कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
कॅनडामध्ये घडलेल्या बहुचर्चित खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) हत्येप्रकरणी एक अत्यंत महत्त्वाचा आणि खळबळजनक खुलासा समोर आला आहे. हत्येच्या तीन वर्षांनंतर सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप लीक झाली असून, यामध्ये कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारने निज्जरच्या हत्येची थेट जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या सतिंदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रारने एका संभाषणादरम्यान स्पष्ट केले की, निज्जरच्या कृत्यांमुळेच त्याला आणि त्याच्या टीमला हे पाऊल उचलावे लागले.
लीक झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये गोल्डी ब्रार हा दुसरा खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पम्मा याच्याशी संभाषण करताना ऐकू येत आहे. या संभाषणात ब्रारने निज्जरवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ब्रारच्या मते, निज्जर अशा लोकांना संरक्षण आणि पाठबळ देत होता जे १६ ते १७ वर्षांच्या निष्पाप आणि अल्पवयीन मुलांना अमली पदार्थांच्या तस्करीत ढकलत होते. या मुलांना ड्रग्ज विकण्यासाठी आणि पोलिसांचे खबरे बनवण्यासाठी ब्लॅकमेल केले जात होते. निज्जर स्वतःच्या फायद्यासाठी आणि गरजेनुसार या नेटवर्कचा वापर करत असल्यामुळेच त्याला आपल्या कर्मानुसार शिक्षा देण्यात आली, असा दावा ब्रारने या ऑडिओमध्ये केला आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना गोल्डी ब्रार अत्यंत आक्रमक स्वरात म्हणाला, “ज्या लोकांनी तरुण मुलांना अमली पदार्थांच्या चक्रात अडकवले, मुलांचा वापर ड्रग्ज विकण्यासाठी केला आणि त्यांना ब्लॅकमेल केले, अशा लोकांना निज्जरची साथ होती. तो या लोकांच्या माध्यमातून आपली ताकद वाढवत होता. यामुळेच मला आणि माझ्या टीमला निज्जरचा काटा काढावा लागला. जगात प्रत्येकाला आपल्या चांगल्या-वाईट कर्माची फळे आणि तिची किंमत चुकवावीच लागते.” या विधानामुळे कॅनडामधील शीख समुदाय आणि आंतरराष्ट्रीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त
१८ जून २०२३ रोजी कॅनडातील सरे येथील गुरु नानक शीख गुरुद्वाराच्या पार्किंग लॉटमध्ये हरदीप सिंग निज्जरवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता. निज्जर आपल्या पिकअप ट्रकसह बाहेर पडत असताना एका पांढऱ्या सेडान कारने त्याचा रस्ता अडवला आणि दोन मुखवटाधारी हल्लेखोरांनी ५० हून अधिक गोळ्या झाडून त्याची घटनास्थळीच हत्या केली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते.
निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतीय सरकारी एजंट्सचा या हत्येत सहभाग असल्याचा थेट आरोप कॅनेडियन संसदेत केला होता. भारताने हे सर्व आरोप तात्काळ फेटाळून लावत ते “हास्यास्पद” आणि “राजकीय हेतूने प्रेरित” असल्याचे स्पष्ट केले होते. भारताने नेहमीच ठामपणे सांगितले होते की या हत्येमागे कॅनडामधील स्थानिक टोळीयुद्ध, ड्रग्ज तस्करांचे जाळे आणि संघटित गुन्हेगारी कारवाया कारणीभूत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा
आता गोल्डी ब्रारचा ऑडिओ पुरावा समोर आल्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या दाव्याला मोठा नैतिक आणि तांत्रिक विजय मिळाला आहे. कॅनडाने राजकीय स्वार्थापोटी भारतावर लावलेले आरोप कसे चुकीचे होते, हे या ऑडिओमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. निज्जरच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता, परंतु या नव्या खुलाशांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे.






