maria morera worlds oldest woman
नवी दिल्ली: मारिया ब्रानयास मोरेरा (Maria Branyas Morera) आता 115 वर्षांच्या झाल्या आहेत. त्या जगातील सगळ्यात वयोवृद्ध महिला(World’s Oldest Woman) आहेत. सगळ्यात जास्त काळ जिवंत असलेली व्यक्ती म्हणून सध्या त्यांचं नाव घेतलं जातं. याआधी फ्रान्सच्या ल्यूसाइल रँडन यांच्या (Lucile Randon) नावे हा रेकॉर्ड होता. पण रँडन यांचं वयाच्या 118 व्या वर्षी निधन झालं. मारिया यांचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 4 मार्च 1907 ला झाला. त्यांचे पालक स्पेनवरून सॅन फ्रान्सिस्कोला आले होते. पण 8 वर्षांनंतर त्यांनी परत स्पेनला जाण्याचा निर्णय घेतला. ते कॅटेलोनियोमध्ये राहू लागले. या वयातही मोरेरा एकदम ठणठणीत आहेत. अनेकदा त्या मुलीच्या मदतीने ट्विटरवर आपली मतं व्यक्त करत असतात.
दिर्घायुष्याचं रहस्य
आपल्या दिर्घायुष्यासाठी अनेक गोष्टी उपयुक्त ठरल्याचं मारिया सांगतात. यात शांती, कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत चांगले संबंध, नैसर्गिक गोष्टींची साथ, भावनात्मक स्थिरता, चिंतामुक्त जीवन, पश्चात्ताप न करणं, सकारात्मकता टिकवणं आणि नकारात्मक लोकांपासून लांब राहणं या गोष्टींमुळे त्यांचं आयुष्य वाढल्याचं त्या सांगतात. याशिवाय नशीबाची साथही महत्त्वाची असल्याचं त्या सांगतात.
पहिल्या विश्वयुद्धात स्पेनमध्ये होतं कुटुंब
पहिल्या विश्व युद्धाच्या वेळी मारिया आणि त्यांचं कुटुंब अमेरिकेवरून स्पेनला पोहोचलं होतं. परत जाताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. भावांसोबत खेळताना मारिया शिपवर पडल्याने त्यांना एका कानाने थोडं कमी ऐकू येतं. 1915 मध्ये ते सगळे बार्सिलोनाला पोहोचले. त्यांनी स्पॅनिश सिव्हिल वॉरसुद्धा बघितली आहे. हे स्पॅनिश युद्ध 1936 मध्ये झालं होतं. मारिया त्यावेळी फक्त 29 वर्षांच्या होत्या.
दोन विश्व युद्ध, स्पॅनिश सिव्हिल वॉर आणि स्पेनची फ्लू महामारी बघितलेल्या मारियांनी 2020 मध्ये कोरोनालाही मात दिली आहे. मारिया यांनी 113 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर काही आठवड्यानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाला. मात्र त्या त्यातूनही बऱ्या झाल्या.
3 मुलं, 11 नातवंडं आणि 13 पतवंड
मारिया यांना 3 अपत्य, 11 नातवंडं आणि 13 पतवंडे आहेत. त्यांचे पती जोन मोरेट डॉक्टर होते.मारिया ट्विटरवर व्हाईस टेक्स्ट वापरून आपली मतं व्यक्त करतात. या पद्धतीने त्या सगळ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.