(फोटो सौजन्य-AI एआय)
बजाज ऑटोने ऑगस्ट २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवत एकूण ५,३५,७६४ वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट २०२५ मध्ये कंपनीने ४,१७,६१६ वाहनांची विक्री केली होती. या तुलनेत यंदा कंपनीच्या एकूण विक्रीत २८ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील निर्यातीचा मोठा वाटा राहिला असून, कंपनीच्या निर्यातीत ५१ टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे.
कंपनीच्या दुचाकी व्यवसायाने नेहमीप्रमाणेच एकूण विक्रीत सर्वात मोठे योगदान दिले आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये बजाजने एकूण ४,४३,७४८ दुचाकींची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या ३,४१,८८७ युनिट्सच्या तुलनेत ३० टक्क्यांनी जास्त आहे. दुचाकींच्या निर्यातीमध्ये ५३ टक्क्यांची मोठी वाढ झाली असून ती २,४१,८५० युनिट्सवर पोहोचली आहे. तर देशांतर्गत दुचाकी विक्री १० टक्क्यांनी वाढून २,०१,८९८ युनिट्स झाली आहे. पल्सर मालिकेतील नवीन बदल जसे की नवीन जनरेशन पल्सर १५०, १२५ आणि पल्सर एन१६० एसएस, तसेच चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीतील वाढीमुळे दुचाकी विभागाला मोठा फायदा झाला आहे.
कमर्शियल व्हेइकल्स विभागातही कंपनीने दोन्ही देशांतर्गत आणि परदेशी बाजारात चांगली प्रगती केली आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये एकूण ९२,०१६ व्यावसायिक वाहनांची विक्री झाली असून यात २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. यातील देशांतर्गत विक्री ११ टक्क्यांनी वाढून ५३,८१० युनिट्सवर पोहोचली, तर निर्यातीत ३९ टक्क्यांची वाढ होऊन ती ३८,२०६ युनिट्स झाली आहे.
एकूण आकड्यांचा विचार केल्यास, कंपनीची देशांतर्गत एकूण २,५५,७०८ युनिट्सवर पोहोचली आहे, ज्यात १० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर एकूण निर्यात २,८०,०५६ युनिट्सवर पोहोचली आहे.
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीतही कंपनीने दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. या काळात बजाज ऑटोने एकूण २४,४८,६९२ वाहनांची विक्री केली असून, गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील १८,९४,८५३ युनिट्सच्या तुलनेत २९ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. पाच महिन्यांच्या या कालावधीत दुचाकींची विक्री २९ टक्क्यांनी वाढून २०,५५,०१९ युनिट्स झाली आहे, तर व्यावसायिक वाहनांची विक्री २८ टक्क्यांनी वाढून ३,९३,६७३ युनिट्स झाली आहे. तसेच एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान कंपनीची देशांतर्गत एकूण विक्री १३ टक्क्यांच्या वाढीसह ११,८१,९७८ युनिट्सवर पोहोचली आहे.






