

लॅम्बोर्गिनी टेमेरारियो स्पायडरसाठी ब्रिजस्टोन एक्सक्लुझिव्ह टायर सप्लायर बनली आहे.
पोटेन्झा स्पोर्ट, पोटेन्झा रेस आणि ब्लिझॅक 6 टायर मिळणार आहेत.
3 इलेक्ट्रिक मोटर्ससह ही सुपरकार 920 CV पॉवर देते.
जगप्रसिद्ध सुपरकार उत्पादक कंपनी लॅम्बोर्गिनी आणि टायर निर्माते ब्रिजस्टोन यांच्यातील पार्टनरशिप आणखी एका नव्या मॉडेलपर्यंत पोहोचली आहे. ब्रिजस्टोनला लॅम्बोर्गिनी टेमेरारियो स्पायडरसाठी एक्सक्लुझिव्ह टायर सप्लायर म्हणून निवडण्यात आले आहे. या भागीदारीमुळे ओपन-टॉप सुपरकारसाठी रस्ते, रेस ट्रॅक आणि हिवाळ्यातील प्रवास लक्षात घेऊन खास टायर सेटअप देण्यात येणार आहे.
टेमेरारियो स्पायडरसाठी ब्रिजस्टोनने टेमेरारियो कूपेसाठी विकसित केलेली टायर लिस्ट कायम ठेवली आहे. यामध्ये पोटेन्झा स्पोर्ट, पोटेन्झा रेस आणि ब्लिझॅक 6 या 3 टायरचा समावेश आहे. हे टायर युरोपमध्ये विकसित आणि तयार करण्यात आले आहेत. एकूण 8 वेगवेगळ्या आकारांमध्ये 20 इंच आणि 21 इंच अलॉय व्हीलसाठी ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे ड्रायव्हिंगच्या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये कारला योग्य ग्रिप आणि स्थिरता मिळण्यास मदत होईल.
रस्त्यावरील रोजच्या वापरासाठी टेमेरारियो स्पायडरमध्ये पोटेन्झा स्पोर्ट टायर देण्यात आले आहेत. यासोबत रन-फ्लॅट टेक्नोलॉजी असलेली ऑप्शनल आवृत्तीही मिळते. टायरमधील हवा कमी झाली किंवा प्रेशर संपले तरी या टायरच्या मदतीने 80 किमी प्रतितास वेगाने 80 किमीपर्यंत प्रवास करता येतो. ट्रॅकवर वेगवान ड्रायव्हिंगसाठी पोटेन्झा रेस टायर देण्यात आले आहेत. तर थंड हवामान आणि हिवाळ्यातील रस्त्यांसाठी ब्लिझॅक 6 टायरचा समावेश करण्यात आला आहे.
टेमेरारियो स्पायडरच्या इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरची रचना देखील तितकीच खास आहे. या कारमध्ये 4.0 लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन दिले आहे. हे इंजिन 10,000 RPM पर्यंत फिरू शकते. लॉन्च कंट्रोल मोडमध्ये ही मर्यादा 10,250 RPM पर्यंत जाते. इंजिनसोबत 3 इलेक्ट्रिक मोटर्स जोडण्यात आल्या असून, संपूर्ण सिस्टम 920 CV म्हणजेच 677 kW पॉवर तयार करते.
वेगाच्या बाबतीत ही सुपरकार 0 ते 100 किमी प्रतितास वेग फक्त 2.8 सेकंदांत गाठते. तर 0 ते 200 किमी प्रतितास वेगासाठी 7.3 सेकंद लागतात. या कारचा टॉप स्पीड 343 किमी प्रतितास आहे. अशा वेगवान कारसाठी टायरची ग्रिप, ब्रेकिंग आणि स्थिरता महत्त्वाची ठरते. त्यामुळे ब्रिजस्टोनची ही भागीदारी टेमेरारियो स्पायडरच्या ड्रायव्हिंग अनुभवात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.