

हिवाळ्यात विंडशील्डवर धुकं जमलंय?
या 5 ट्रिक्सने सेकंदात होईल काच स्वच्छ
कारमधील 'या' फीचर्सचा करा वापर
Windshield Fog Clear Tips: हिवाळ्यात सकाळी गाडी चालवणे सोपे नसते. जसजशी थंडी वाढते, तसतशी विंडशील्डवर धुकं जमा होऊ लागतं. कधीकधी, पुढचा रस्ता आणि इतर वाहने स्पष्ट दिसत नाहीत. अशा परिस्थितीत, गाडी चालवताना झालेला थोडासा निष्काळजीपणासुद्धा अपघाताला कारणीभूत ठरू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे, कापडाने काच वारंवार पुसणे हाच धुकं काढण्याचा एकमेव मार्ग नाही. गाडीतील काही फिचर्स आणि सोपे उपाय विंडशील्ड स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकतात हिवाळ्यात विंडशील्डवर जमा होणारे धुक्यांना कसे साफ करायचे , जाणून घ्या.
जर विंडशील्डवर धुकं जमा होऊ लागलं, तर कार हीटर चालू करा. त्यानंतर, एयरफ्लो विंडशील्डच्या दिशेने वळवा. यामुळे गरम हवा थेट काचेपर्यंत पोहोचेल आणि धुकं हळूहळू नाहीसं होईल. यामुळे पुढचा रस्ता पाहणं सोपं होईल.
कारमधील डीफ्रॉस्ट फीचर विंडशील्डवरील धुके दूर करण्यास देखील मदत करते. सक्रिय केल्यावर, ही सिस्टम गरम हवा बाहेरील हवेत मिसळते आणि ती विंडशील्डच्या दिशेने पाठवते. यामुळे काचेच्या आतील आणि बाहेरील तापमानातील फरक कमी होण्यास मदत होते आणि धुके साफ होतात. त्यामुळे, हिवाळ्यात गरज भासल्यास हे फीचर नक्की वापरा.
कधीकधी, गाडीतील आर्द्रतेमुळे विंडशील्डवर धुकं जमा होऊ शकतं. अशा परिस्थितीत, खिडक्या थोड्या उघड्या ठेवल्याने बाहेरची ताजी हवा गाडीत येते. यामुळे गाडीतील तापमान संतुलित राखण्यास आणि आर्द्रता कमी करण्यास मदत होते. जर तुमच्या गाडीच्या खिडक्यांवर वारंवार धुकं जमा होत असेल, तर तुम्ही ही पद्धत वापरून पाहू शकता.
गाडीच्या आत असलेला ओलावा हे विंडशील्डवर धुके जमा होण्याचे एक प्रमुख कारण आहे. यावर उपाय म्हणून, तुम्ही डॅशबोर्डवर सिलिका बॉल्स ठेवू शकता. हे बॉल्स हवेतील ओलावा शोषून घेण्यास मदत करतात. यामुळे गाडीतील आर्द्रता कमी होऊ शकते आणि विंडशील्डवर धुके जमा होत नाहीत.
काही प्रकरणांमध्ये, विंडशील्डवर धुकं जमा होण्यापासून रोखण्यासाठी शेविंग क्रीमचा वापर देखील केला जाऊ शकतो. काचेवर थोडीशी शेविंग क्रीम लावा आणि नंतर एका स्वच्छ कापडाने ती पूर्णपणे पुसून घ्या. यामुळे काचेवर एक पातळ थर तयार होतो, जो धुकं जमा होण्यापासून रोखण्यास मदत करू शकतो.