

हार्ले-डेव्हिडसनने भारतात 17 वर्षे पूर्ण करत नवा उपक्रम जाहीर केला
X350T आणि Sprint 440 या 2 नवीन मोटारसायकल्स लवकरच लाँच होणार
रायपूर आणि इंदूरमधील डीलरशिपमुळे नेटवर्कची संख्या 23 पर्यंत पोहोचणार.
अमेरिकेची सुप्रसिद्ध प्रीमियम मोटारसायकल कंपनी हार्ले-डेव्हिडसनने भारतीय मार्केटमध्ये 17 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या निमित्ताने कंपनीने भारतातील व्यवसाय विस्तारासाठी ‘मिशन: द बिग राइड’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. या माध्यमातून कस्टमर अनुभव सुधारण्यासोबतच डीलर नेटवर्क वाढवणे, नवीन मोटारसायकल्स सादर करणे आणि रायडर्सच्या कम्युनिटीशी नाते मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. हार्ले-डेव्हिडसन आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या भागीदारीतून X350T आणि Sprint 440 ही 2 नवीन मॉडेल्स भारतात लवकरच लाँच होणार आहेत.
हार्ले-डेव्हिडसनचे ग्लोबल प्रेसिडेंट आणि सीईओ आर्टी स्टार्स तसेच हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पवन मुंजाल यांनी या उपक्रमाची माहिती दिली. भारतातील प्रीमियम मोटारसायकल मार्केटमध्ये वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी X रेंजमधील नवीन मॉडेल्स आणत राहणार आहे. या रेंजमधील मोटारसायकल्सची निर्मिती हार्ले-डेव्हिडसन आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या सहकार्याने केली जाते.
कंपनीच्या माहितीनुसार, 2010 मध्ये भारतात विक्री सुरू केल्यापासून हार्ले-डेव्हिडसनने देशात 80,000 पेक्षा जास्त मोटारसायकल्स विकल्या आहेत. 2023 मध्ये सादर झालेल्या X रेंजनेही 50,000 युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे. या भागीदारीतून रायपूर आणि इंदूर येथे 2 नवीन फुल-लाइन डीलरशिप सुरू होणार आहेत. त्यामुळे देशातील कंपनीच्या डीलरशिपची संख्या 23 होईल.
रायडर्ससाठी विविध उपक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे. मार्च 2027 मध्ये नॉर्दर्न आणि ईस्टर्न H.O.G. राइड्स आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच 4 आणि 5 डिसेंबर 2026 रोजी महाराष्ट्रातील पाचगणी येथे होणाऱ्या इंडिया बाइक वीक 2026 मध्ये हार्ले-डेव्हिडसन सहभागी होणार आहे. भारतातील हार्ले ओनर्स ग्रुपमध्ये 3,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत. आशियातील उदयोन्मुख मार्केटमधील हे सर्वात मोठे H.O.G. नेटवर्क असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
27 आणि 28 नोव्हेंबर 2026 रोजी थायलंडमध्ये होणाऱ्या एशिया हार्ले डेजमध्ये भारतातील 100 पेक्षा जास्त रायडर्स सहभागी होणार आहेत. हिरो मोटोकॉर्पचे उत्पादन, अभियांत्रिकी आणि देशभरातील विक्री नेटवर्क, तसेच हार्ले-डेव्हिडसनची जागतिक ओळख यांचा फायदा या भागीदारीला होत आहे. नवीन मॉडेल्स आणि वाढत्या डीलर नेटवर्कमुळे भारतीय प्रीमियम बाइक मार्केटमध्ये कंपनीची उपस्थिती आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.