

होंडा अल्फा इलेक्ट्रिक SUV चे जागतिक पदार्पण 2 डिसेंबरला होणार.
65 kWh आणि 75 kWh बॅटरीचे ऑप्शन मिळण्याची शक्यता.
2027 मध्ये विक्री सुरू होण्याचा आणि 16 लाख किंमतीचा अंदाज.
होंडा इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या भारतात तयार होणाऱ्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV Honda Alpha चे डिझाइन स्केच सादर केले आहेत. 2 डिसेंबर 2026 रोजी भारतात या SUV चे जागतिक पदार्पण होणार आहे. होंडाच्या जपानमधील डिझाइन सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या या स्केचमध्ये कारचे बाह्य डिझाइन आणि इंटिरियरची झलक पाहायला मिळते. ही SUV 2027 मध्ये विक्रीसाठी आणली जाण्याची शक्यता आहे.
होंडा अल्फाचे डिझाइन कसे असेल?
कंपनीने सादर केलेल्या स्केचमध्ये अल्फाचा फ्रंट थ्री-क्वार्टर व्ह्यू आणि केबिनची रचना दाखवण्यात आली आहे. साइड प्रोफाइल पाहता ही SUV MPV आणि ट्रेडीशनल SUV यांचे मिक्स्चर असल्यासारखी दिसते. कारची विंडस्क्रीन तिरक्या कोनात असून मागच्या बाजूला छताची उंची कायम ठेवण्यात आली आहे. मागचे पिलर्स जाड असून डोअरवर विंडो लाइनच्या खाली ORVM दिले आहेत. व्हील आर्च आणि साइड सिल्सभोवती काळ्या रंगाचे क्लॅडिंग मिळते.
समोरच्या बाजूला नवीन H लोगो दोन हेडलॅम्पच्या मधोमध असलेल्या काळ्या पॅनेलमध्ये बसवण्यात आला आहे. 5-स्पोक अलॉय व्हील्सना त्रिकोणी सिल्व्हर इन्सर्ट देण्यात आले आहेत. बंपरच्या खालच्या भागात स्वतंत्र एअर इनटेक दिसतो. या डिझाइनमध्ये 2025 मध्ये टोकियो मोटर शोमध्ये दाखवलेल्या होंडा 0 अल्फा प्रोटोटाइपची झलक कायम ठेवण्यात आली आहे.
केबिनमध्ये मिळणार 5-सीटर व्यवस्था
होंडा अल्फाच्या इंटिरियरमध्ये उंच सेंटर कन्सोल, स्वतंत्र डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मध्यभागी टचस्क्रीन देण्यात आली आहे. टचस्क्रीनच्या खाली फिजिकल कंट्रोल्सची रांग ठेवण्यात आली आहे. डॅशबोर्डखाली छोट्या वस्तू ठेवण्यासाठी सेपरेट जागा आहे.
मागच्या सीटवर 3 स्वतंत्र हेडरेस्ट आणि फोल्ड होणारे सेंटर आर्मरेस्ट मिळते. हलक्या रंगाचे अपहोल्स्ट्री, सपाट केबिन फ्लोअर आणि पुढच्या सीटच्या बॅकरेस्टची बारीक रचना यामुळे प्रवाशांना आरामदायी जागा मिळण्याची अपेक्षा आहे. डॅशबोर्ड आणि दरवाजांवर जांभळ्या रंगाची अॅम्बियंट लाइटिंगही दाखवण्यात आली आहे.
65 kWh आणि 75 kWh बॅटरीचे ऑप्शन?
होंडाने मार्च 2026 मध्ये राजस्थानमधील टपुकडा प्लांटमधून अल्फाची देशव्यापी रोड टेस्ट सुरू केली होती. जूनमध्ये या SUV चे टेस्टिंग मनालीपर्यंत पोहोचले. विविध रस्ते, हवामान आणि चार्जिंग सुविधांचा विचार करून ही चाचणी केली जात आहे.
या इलेक्ट्रिक SUV मध्ये 65 kWh आणि 75 kWh क्षमतेचे LFP बॅटरी पॅक मिळण्याची चर्चा आहे. पण कंपनीने या आकड्यांची कन्फर्मेशन केलेली नाही. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 16 लाख रुपये असू शकते. भारतात तयार होणारी ही SUV देशांतर्गत विक्रीसोबत परदेशातही पाठवली जाणार आहे. मार्केटमध्ये तिची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक, महिंद्रा BE 6, टाटा सिएरा EV आणि मारुती सुझुकी ई व्हिटारा यांच्याशी होईल.