फोटो सौजन्य: Social Media
हल्ली अनेक जण बिंधासपणे ट्रॅफिक सिग्नल्स आणि नियम धाब्यावर बसवत असतात. कधी बाईक चालवताना कोणाच्या डोक्यावर हेल्मेट नसतं तर कोणी ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय कार किंवा बाईक चालवत असतात. अशा लोकांना धारेवर धरण्यासाठी दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे.
आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिल्ली पोलिस कडक कारवाई करण्यास तयार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून एक अॅक्शन प्लॅन सुद्धा तयार करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या या अॅक्शन प्लॅननुसार, योजनेत जनताही सहभागी होणार आहे. वाहतूक पोलिसांना योग्य माहिती देऊन दिल्लीतील जनता आता ५० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकू शकते.
हे देखील वाचा: नवीन कार घेण्याचा विचार करताय? September 2024 गाजवण्यासाठी तयार आहेत ‘या’ सहा कार्स
दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी ट्रॅफिक पोलिसांना ट्रॅफिक प्रहरी ॲप पुन्हा एकदा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे ॲप 1 सप्टेंबरपासून दिल्लीकरांसाठी सुरू होणार आहे. दिल्लीची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी उपराज्यपालांनी हे पाऊल उचलले आहे. यासोबतच या योजनेत लोकांचा सहभागही वाढणार आहे.
ट्रॅफिक प्रहारी ॲपच्या माध्यमातून दिल्लीकर वाहतूक नियमांच्या उल्लंघनाची माहिती दिल्ली ट्रॅफिक पोलिसांना देऊ शकतील. यासाठी योग्य माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलिसांकडून ५० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याची तरतूद केली आहे. दिल्ली पोलिसांच्या या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याच्या टॉप 4 मध्ये येणाऱ्या व्यक्तींना बक्षिसाची रक्कम दिली जाईल.
दिल्ली पोलिसांकडून दर महिन्याला 4 सर्वोत्तम तक्रारदारांची यादी तयार करण्यात येईल. यात पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या व्यक्तीला 50 हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या व्यक्तीला 25 हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या व्यक्तीला 15 हजार रुपये आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या व्यक्तीला 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
दिल्लीच्या उपराज्यपालांनी पुन्हा एकदा सुरू केलेली ही योजना म्हणजे ट्रॅफिक सेंटिनल योजना. या योजनेंतर्गत सर्वसामान्य जनता प्रहारी ॲपद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध रिपोर्ट पाठवू शकते. यापूर्वी या योजनेअंतर्गत दिल्ली पोलीस वार्षिक अहवालाच्या आधारे पुरस्कार देत असत. आता दर महिन्याला दिल्ली पोलीस चार जणांना पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहेत.
तुम्ही Google Play Store आणि IOS वरून ट्रॅफिक प्रहरी ॲप डाउनलोड करू शकता. या ॲपद्वारे रिपोर्ट दाखल करण्यासाठी तुम्हाला ॲपवर तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवावा लागेल.