जीप इंडियाच्या खास एसयूव्हीची चर्चा सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात हंगामा करत आहे. Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition ही स्पेशल एडिशन एसयूव्ही भारतात ऑफीशली लाँच होण्याआधीच सोल्ड आउट झाली आहे. कंपनीने भारतासाठी राखून ठेवलेल्या सर्व 25 युनिट्सची विक्री पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 73.55 लाख रुपये असून, डिलिव्हरी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे.
या स्पेशल एडिशनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिचा हिरवा आणि पांढरा रंगसंगतीतील लूक. ही एसयूव्ही खास Mojito Green रंगात सादर करण्यात आली आहे. त्यावर Bright White रंगाचे हार्डटॉप रूफ आणि 7-स्लॉट फ्रंट ग्रिल देण्यात आली आहे. बॉडीवरील खास ग्राफिक्स, बाजूला असलेले ‘1941’ डेकल्स आणि मागील बाजूवरील पांढऱ्या रंगातील ‘4 Wheel Drive’ ग्राफिकमुळे तिचा लूक नेहमीच्या रँग्लरपेक्षा वेगळा दिसतो.
या डिझाइनमागे जीपच्या जुन्या मॉडेलची प्रेरणा आहे. मूळ Jeep CJ-Universal मध्ये असलेल्या पांढऱ्या छताच्या डिझाइनची आठवण Whitecap Edition करून देते. जीपच्या 85 वर्षांच्या इतिहासाचा गौरव करण्यासाठी ही स्पेशल एडिशन तयार करण्यात आली आहे. जगभरात या एडिशनची केवळ 250 युनिट्सची मर्यादित संख्या असून, त्यातील 25 युनिट्स भारतासाठी राखीव होती.
इंजिनच्या बाबतीत या एसयूव्हीमध्ये नेहमीच्या Rubicon प्रमाणेच 2.0-लिटर, 4-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 270 hp पॉवर आणि 400 Nm टॉर्क निर्माण करते. त्याला 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची जोड मिळते. जीपची 4-व्हील-ड्राइव्ह सिस्टीम, Rock-Trac सिस्टीम आणि 4:1 लो-रेंज ट्रान्सफर केस यामुळे ही एसयूव्ही कठीण ऑफ-रोड मार्गांवरही दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. पुढील आणि मागील बाजूस इलेक्ट्रॉनिक लॉकिंग डिफरेंशियल्स तसेच इलेक्ट्रॉनिक फ्रंट स्टॅबिलायझर-बार डिस्कनेक्टसारखी ऑफ-रोड वैशिष्ट्येही मिळतात.
फीचर्समध्ये 12.3-इंच Uconnect 5 टचस्क्रीन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto यांचा समावेश आहे. पुढील सीट्सना 12-वे इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंटची सुविधाही मिळते. भारतातील या एडिशनला मिळालेल्या प्रतिसादानंतर भविष्यात आणखी युनिट्स आणण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे कंपनीने सूचित केले आहे. त्यामुळे ही मर्यादित एडिशन पुन्हा भारतात येणार का, याकडे जीपप्रेमींचे लक्ष लागले आहे.






