फोटो सौजन्य: YouTube
भारतात नेहमीपासूनच लक्झरी आणि हाय परफॉर्मन्सची क्रेज पाहायला मिळते. सध्या भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपनीज आहेत. पण आजही जी क्रेज मर्सिडीज कारची आहे ती दुसऱ्या कोणत्याही कारची नाही. अनेक सेलिब्रेटीज तसेच राजकीय नेत्यांकडे आपल्याला मर्सिडीज कार्स पाहायला मिळतात. त्यामुळेच प्रत्येक कार प्रेमीला एकदा तरी मर्सिडीज कर चालवावी असे सतत वाटत असते. आपल्याकडे मर्सिडीज कारला एका स्टेटस सिम्बॉल सारखे सुद्धा पाहिले जाते.
पण जसे प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला एक कारण असते. तसेच मर्सिडीज कारसोबत आहे. आपल्याला मर्सिडीज कार कंपनी तर नक्कीच माहिती आहे. पण हे नाव कॅम्पपनीला मिळालं कसं आणि त्यामागची रंजक कथा काय आहे, याबाबत तुम्हाला माहित आहे का? चला, ‘मर्सिडीज’ या नावामागची भन्नाट कथा आपण आज जाऊन घेऊया.
मर्सिडीज-बेंझ कंपनीचे जे मूळ आहे, ते दोन स्वतंत्र कंपन्यांसोबत जोडले गेले आहे.
(Daimler-Motoren-Gesellschaft): ही कंपनी 1890 मध्ये गॉटलीब डेमलर आणि विल्हेल्म मेबॅक यांनी स्थापन केली होती. इंटरनल कम्बश्चन इंजनच्या विकासात आणि मोटार वाहनांच्या निर्मितीमध्ये ते अग्रणी होते.
Benz & Cie.: दुसरी कंपनी 1883 मध्ये कार्ल बेन्झ यांनी स्थापन केली होती, ज्यांनी पेट्रोलवर चालणारी पहिली कार डिझाइन केली होती.
एमिल जेलिनेक (Emil Jellinek) हा एक ऑस्ट्रियन-हंगेरियन व्यापारी होता, ज्यांना कारमध्ये खूप रस होता. 1890 च्या उत्तरार्धात त्यांनी डेमलर कारमध्ये गुंतवणूक केली आणि त्या रेसिंगसाठी विकत घेतल्या. जेलीनेकने लवकरच पाहिले की रेसिंगमधील कारची लोकप्रियता झपाट्याने वाढल्याने त्यांची विक्री देखील पुढे वाढू शकते. तो केवळ एक ग्राहक नव्हता, तर एक व्यावसायिक सुद्धा होता, त्याने डेमलरच्या कारचा प्रचार आणि सुधारणा करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
एमिल जेलिनेकच्या मुलीचे नाव मर्सिडीज जेलिनेक (Mercedes Jellinek) होते. मर्सिडीज हे नाव स्पॅनिशमध्ये ‘कृपा’ किंवा ‘आशीर्वाद’ या अर्थासाठी वापरले जाते. जेलिनेकचे आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम होते. म्हणूनच त्याने तिच्या नावाने रेसिंग कार्स सुरु केले.
1900 मध्ये, जेलीनेकने डेमलर कंपनीला नवीन रेसिंग कार डिझाईन करण्यास सांगितले. त्यांनी या कारचे नाव त्यांच्या मुलीच्या नावावर ठेवले – Mercedes 35 HP. ही कार त्यावेळच्या इतर कारपेक्षा खूपच वेगळी होती. त्याचे डिझाईन आणि इंजिन अतिशय आधुनिक आणि शक्तिशाली होते, ज्यामुळे ही कार रेसिंग आणि मार्केटमध्ये खूप यशस्वी ठरली.
“मर्सिडीज 35 एचपी” च्या प्रचंड रेसिंग यशानंतर “मर्सिडीज” हे नाव इतके लोकप्रिय झाले की डेमलरने मर्सिडीज नावाने आपल्या सर्व कार विकण्यास सुरुवात केली.
1926 मध्ये, डेमलर आणि बेंझ कंपन्यांचे विलीनीकरण झाले आणि नवीन कंपनीचे नाव डेमलर-बेंझ एजी होते. या नवीन कंपनीच्या कार्स मर्सिडीज-बेंझ या ब्रँड नावाने विकल्या जाऊ लागल्या, ज्या आज जगभरात लक्झरी आणि आकर्षित कार्स बनल्या आहेत.