(फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस यांनी भारतात नवीन वाहने विकसित करण्यासाठी निश्चित करार केला आहे. या करारानुसार, 50 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मार्केटसाठी नवीन वाहने तयार करण्याची योजना आखलेली आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (TPEM) या टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाचाही या सहकार्यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत तयार होणाऱ्या वाहनांचे प्रोडक्शन पुण्याजवळील रांजणगाव इथल्या संयुक्त प्रकल्पात केले जाणार आहे.
रांजणगाव प्लांटची भूमिका महत्त्वाची
रांजणगाव येथील फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड (FIAPL) हा टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस यांचा 50:50 संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पात सध्या टाटा नेक्सॉन, अल्ट्रॉझ आणि कर्व्ह यांसारख्या गाड्यांसह जीपची काही मॉडेल्स तयार केली जातात. जीप कंपास आणि मेरिडियनचे प्रोडक्शन इथे होते, तर ग्रँड चेरोकी आणि रँग्लरची CKD पद्धतीने असेंब्ली केली जाते. या कारखान्यात इंजिन, ट्रान्समिशन आणि इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेनशी संबंधित प्रोडक्शन सुविधाही आहेत.
भारतात येणार 3 नवीन लग्झरी कार ब्रँड्स! टाटाच्या अविन्यापासून जेनेसिसपर्यंत मोठी तयारी
टाटाची टेक्नोलॉजी, स्टेलँटिसचे ग्लोबल नेटवर्क
या करारानुसार, टाटा मोटर्स आपल्या वाहनांच्या आर्किटेक्चर आणि प्रोडक्ट टेक्नोलॉजीचा वापर करण्याची संधी स्टेलँटिसला देणार आहे. स्टेलँटिस भारतातील आपल्या इंजिनिअरिंग टीमच्या मदतीने नवीन वाहनांचा विकास करेल. त्यानंतर वेगवेगळ्या देशांतील नियम, रस्त्यांची परिस्थिती आणि लोकल कस्टमरच्या गरजांनुसार वाहनांमध्ये आवश्यक ते बदल केले जातील. त्यामुळे भारतातील वाहन विकास कौशल्याचा उपयोग ग्लोबल मार्केटसाठीही होऊ शकतो.
रांजणगाव प्लांटमधून याआधीच जपान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये वाहनांचा एक्स्पोर्ट केली जाते. नवीन करारामुळे या प्रोजेक्टमधून स्टेलँटिसच्या ग्लोबल मार्केटसाठी विकसित केलेल्या वाहनांचे प्रोडक्शन आणि निर्यात वाढवण्याची संधी निर्माण होऊ शकते. भारतातील ऑटो पार्ट्स पुरवठादार आणि सध्याच्या प्रोडक्शन मशिनरीचाही या उपक्रमाला फायदा होण्याची शक्यता आहे.
2 दशकांहून जुन्या सहकार्याला नवी दिशा
टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस यांच्यातील इंडस्ट्रीयल पार्टनरशिप 2 दशकांहून जुनी आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये दोन्ही कंपन्यांनी सहकार्याबाबत सामंजस्य करार केला होता. आता निश्चित करारामुळे वेईकल आर्किटेक्चर आणि टेक्नोलॉजीच्या सहकार्याला ठोस स्वरूप मिळाले आहे.
स्टेलँटिस समूहात जीप, सिट्रॉएन, फियाट, प्यूजो, ओपेल, मासेराती आणि अल्फा रोमियो यांसारखे ब्रँड्स आहेत. या भागीदारीमुळे भारतातील इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन सुविधांचा वापर करून आंतरराष्ट्रीय गरजांनुसार वाहने विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन मॉडेल्सची नावे, लाँचची वेळ आणि एक्स्पोर्टचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत.






