फोटो सौजन्य- iStock
डिजीटल युगामध्ये वाहतुक क्षेत्रामध्ये मोठे आणि नाविन्यपूर्ण बदल होत आहे, ग्राहकांचा प्राध्यान्यक्रम बदलत आहे. वाहनामंध्ये नवनवीन बदल होत आहे. ज्यामुळे ग्राहकांना अनेक सोई सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या बदलांमुळे डिजीटल भारतालाही चालना मिळत आहे. या संबंधीचा आढावा टाटा मोटर्स पॅसेंजर्स अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे सीटीओ स्वेन पतुश्का यांनी या लेखात घेतला आहे.
गेल्या दहा वर्षांत वाहन (ओटोमोटिव्ह) उद्योगक्षेत्रात वेगाने प्रगती झाली आहे, पारंपरिक बटनांद्वारे चालवल्या जाणाऱ्या वाहनांचे रूपांतर स्मार्ट, इंटेलिजंट, नेटवर्क्ड घटकांमध्ये झाल्यामुळे या क्षेत्राचा कायापालट झाला आहे. या वाहनांसाठी ‘सॉफ्टवेअर ऑन व्हील्स’ संज्ञा खूपच चपखल बसते. भौतिक शास्त्रे आणि यांत्रिक इंजिनीअरिंगचे महत्त्व अद्याप कायम असले तरी इलेक्ट्रॉनिक्स व सॉफ्टवेअर हे घटक वाहतूक उद्योगातील वापरकर्त्याचा अनुभव (यूएक्स) पुढे नेण्यात केंद्रस्थानी आहेत. यूजर एक्स्पिरिअन्स अर्थात यूएक्स अधिक चांगला करण्यासाठी वाहनामधील प्रत्येक स्पर्शबिंदूचा शक्य तेवढा चांगला उपयोग केला जातो. यात इंट्युइटिव्ह (अंत:प्रेरणेवर आधारित) इंटरफेसेसपासून अखंडित एकात्मीकरणापर्यंत सगळ्याचा तसेच ग्राहकांच्या भविष्यातील गरजा व अपेक्षा यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने समायोजनशीलता पुरवण्याचाही समावेश होतो. याचे अंतिम ध्येय वापरकर्त्याला सातत्याने आनंद देत राहणे, त्यांच्या खरेदीच्या पसंतीवर प्रभाव टाकणे आणि भविष्यकाळातील वाहतूक क्षेत्राला आकार देणे हेच आहे.
ग्राहकांच्या प्राधान्यक्रमांमध्ये बदल
भारतातील कार ग्राहकांच्या, विशेषत: तरुण कार ग्राहक समूहाच्या, प्राधान्यक्रमांमध्ये दखलपात्र बदल दिसून येत आहे. इंधन कार्यक्षमता व खर्च यांसारख्या पारंपरिकरित्या विचारात घेतल्या जाणाऱ्या बाबींहून अधिक महत्त्व कनेक्टिविटी व सुरक्षितता यांच्याशी निगडित घटकांना दिले जात असल्याचे एका जागतिक सर्वेक्षणात आढळले आहे. भारताच्या लोकसंख्येत जेनझेड समूहाचा वाटा लक्षणीय म्हणजेच २५ टक्के आहे. ही पिढी त्यांच्या तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलींना सुसंगत अशा वाहनांना पसंती देते. कनेक्टेड कार इकोसिस्टम, इन-कार एण्टरटेन्मेंट सिस्टम्स, ईव्ही तंत्रज्ञान आणि प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स यांसारख्या आधुनिक सुविधा अधिकाधिक महत्त्वपूर्ण होत आहेत.
डिटिजल भारताला चालना
देशातील व्यापक डिजिटल रूपांतरणाचे प्रतिबिंब भारताच्या वाहतूक क्षेत्रातही दिसते. सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाशी हे सुसंगत आहे. भारतात नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञाने स्वीकारली जात असतानाच, ग्राहकांच्या बदलत्या प्राधान्यक्रमांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने वाहतूक उद्योग उत्क्रांत होत आहे. कार हे आता केवळ वाहतुकीचे साधन उरलेले नाही; ते इंटेलिजंट, कनेक्टेड होत आहे आणि जीवनशैलीची निवड त्यातून दिसून येते. सेन्सर डेटा व एआय अल्गोरिदम्सचा लाभ घेऊन वाहने अधिक सुरक्षित, अधिक कार्यक्षम, अधिक आरामदायी होत आहेत, अधिक प्रगत वाहतुकीचे पर्याय देत आहेत.
वाहनकेंद्री ते वापरकर्ताकेंद्री डिझाइन
वाहतूक उद्योगामध्ये वाहनकेंद्री दृष्टिकोनापासून वापरकर्त्याला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या डिझाइन तत्त्वापर्यंत स्थित्यंतर वेगाने घडत आहे. यूजर-सेंटर्ड डिझाइनसारख्या (यूसीडी) एथ्नोग्राफिक संशोधन व वापरक्षमतेच्या चाचण्या घेणाऱ्या तंत्रांच्या माध्यमातून वापरकर्त्याचे वर्तन व पसंती यांबद्दल मोलाची माहिती प्राप्त होत आहे. ग्राहकांच्या आयुष्यांमध्ये सहजगत्या एकरूप होणारी उत्पादने तयार करणे यामुळे शक्य होत आहे.
सरकारी धोरणांमुळे वाहन क्षेत्रातील नवोन्मेषाला आकार
नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लान २०२० सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रात ग्राहकांच्या अनुभवाला प्राधान्य देण्यात भारत सरकार सक्रिय भूमिका निभावत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, इंधन सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि ग्राहकाच्या गरजांची पूर्तता करणारे परवडण्याजोगे, पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय पुरवण्यासाठी तंत्रज्ञानात्मक नवोन्मेष स्वीकारण्यावर ही योजना लक्ष केंद्रित करते.प्रोत्साहन, अनुदान व पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक यांच्या माध्यमातून सरकार पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने चाललेल्या स्थित्यंतराला पाठबळ देत आहे, परिणामी कार्यक्षम, शाश्वत व किफायतशीर वाहतूक उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगला अनुभव दिला जात आहे. या धोरणी दृष्टीकोनामुळे ग्राहकांच्या बदलत्या मागण्यांनुसार अधिक चतुर वाहतूक परिसंस्था निर्माण करणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारत अग्रेसर आहे.
याशिवाय, २०१९ मध्ये मोटर वाहन कायद्यामध्ये झालेल्या नियामक बदलांमुळे ऑटोनॉमस व्हेइकल्स (एव्हीज) आणि अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स (एडीएएस) यांच्या चाचण्या व स्थापना यांमध्ये मदत होत आहे.
थोडक्यात, जसजशी वाहने अधिक स्मार्ट, कनेक्टेड घटकांमध्ये उत्क्रांत होतील, वापरकर्त्याला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या रचनांना प्राधान्य दिले जाऊ लागेल आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या (एआय) प्रगत तंत्रज्ञानांचा जोपासना होत राहील, तसतसा वाहन वापरणाऱ्याचा अनुभव सुधारत जाईल. सॉफ्टवेअर डिफाइन्ड व्हेइकल्सच्या (एसडीव्ही) पुढील पिढीतील वाहनांना या दृष्टीकोनाचा लाभ होईल. वापरकर्त्याचा अनुभव सुधारणे आणि त्याचवेळी सुरक्षितता, संरक्षण व शाश्वततेच्या निकषांचे काटेकोर पालन करणे यांसाठी ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चुअरर्स (ओईएम्स), सरकारी यंत्रणा आणि नियामक संस्था यांच्यातील समन्वयात्मक प्रयत्न अत्यावश्यक आहेत. पायाभूत सुविधांसाठी निधी, बॅटरी स्वॅपिंगसारख्या नवोन्मेष्कारी पद्धती आणि शहर नियोजनात इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) संरचनेचे अखंडित एकात्मीकरण यांसारख्या धोरणात्मक उपायांमुळे वापरकर्त्यांचा वाहतूक अनुभव अपवादात्मकरित्या उत्तम करण्याचा मार्ग मोकळा होईल.