फोटो सौजन्य: Freepik
कार घेताना ज्याप्रमाणे कार कंपनीज आपल्या ग्राहकांसाठी तत्पर असतात तसे ते कार घेतल्यानंतर सुद्धा तत्पर असतात का? या प्रश्नाचे उत्तर काही वेळेस होय असू शकते तर नाही सुद्धा असू शकते. कार घेणे हे प्रत्येक मध्यम वर्गीय माणसाचे स्वप्न असते. आणि जेव्हा हे स्वप्न पूर्ण होते तेव्हा त्यांना नियमितपणे आपली कार सांभाळावी लागते.
कार घेण्यापेक्षा तिला सांभाळणे कठीण असते असे नेहमी आपण ऐकत असतो. कार जुनी असो की नवीन चांगल्या परफॉर्मन्ससाठी तिची नियमितपणे सर्व्हिसिंग करणे फार महत्वाचे असते. परंतु कार कंपनीज कार सर्व्हिसिंगच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल केल्याची अनेक प्रकरणे आज आपण न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर पाहत असतो. जर तुम्ही सुद्धा नुकतीच नवीन कार खरेदी केली असेल, तर तुमच्यासाठी या पुढील गोष्टी लक्षात ठेवणे फायदेशीर ठरू शकते.
काही सर्व्हिस सेंटर्स अनेकदा ग्राहकांना अतिरिक्त सेवा देण्यासाठी किंवा प्रत्यक्षात आवश्यक नसलेले भाग बदलण्याचा सल्ला देतात. हे कंपन्यांसाठी अतिरिक्त नफ्याचे स्त्रोत असू शकते. त्यामुळेच, कार मॅन्युअल नेहमी वाचा आणि त्यात दिलेल्या वेळेनुसार कारची सर्व्हिसिंग करा. तसेच मेकॅनिकडून कारमधील कोणताही भाग बदलण्याची शिफारस केली असल्यास, त्याच्या सद्य स्थितीबद्दल चौकशी करा.
अनेक वेळा सर्व्हिसिंग दरम्यान किरकोळ दुरुस्ती किंवा साफसफाईच्या नावाखाली तुमच्याकडून जास्तीचे शुल्क आकारले जाते किंवा सेवेनंतर तुम्हाला छुपे शुल्क सांगितले जाते. त्यामुळेच, सेवा शुल्क आणि इतर शुल्क आधीच जाणून घ्या. एकूण बिल प्राप्त करण्यापूर्वी, त्यात समाविष्ट असलेल्या शुल्कांची संपूर्ण यादी संबंधित व्यक्तींना विचारा.
काही सर्व्हिस सेंटर्स, विशेषतः जर ते अधिकृत डीलर नसतील, तर ते बनावट किंवा कमी दर्जाचे पार्टस वापरू शकतात. कारमध्ये बसवलेले भाग नेहमी तपासा आणि ते ओरिजिनल असल्याची खात्री करा.
अनेकदा सर्व्हिस सेंटर्स तुमच्यावर दीर्घकालीन योजना किंवा सदस्यत्व खरेदी करण्यासाठी विनंती करू शकतात. या प्लॅन्स किंवा मेंबरशिप महाग असतात आणि सर्व ग्राहकांसाठी त्या आवश्यक नसतात.
कारची वेळेवर सर्व्हिसिंग न केल्यास वाहनाच्या वॉरंटीवर परिणाम होऊ शकतो. वॉरंटी दावे न भरण्याचे कारण म्हणून काही कंपन्या विलंबित सर्व्हिसिंगचा उल्लेख करू शकतात.