२७ सप्टेंबर..! जागतिक पर्यटन दिवस १९८० पासून याच दिवशी साजरा करण्यात येतो. कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झालेली होती. याच दिवशी संघटनेच्या कायद्याचा स्वीकार करण्यात आला. त्यामुळे पर्यटनाकरिता या दिवसाचे विशेष महत्व आहे. यावर्षीच्या म्हणजे २०२३ च्या पर्यटनाचे घोषवाक्य आहे 'पर्यटन आणि हरित निवेश'. सतत विकासाचे लक्ष्य साध्य करण्याकरिता अधिकाधिक निवेश करणे हा या घोष वाक्याचा उद्देश आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटनाच्या बाबतीत जागरुकता वाढविणे, जगभरात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मूल्यांवर होणार्या परिणामांचा अभ्यास करणे हा जागतिक पर्यटन दिनाचा मुख्य उद्देश आहे. अनेक देश या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम, निवास, सुविधा याचे नियोजन आणि असंख्य कार्यक्रम आयोजित करतात. दळणवळणाच्या सुविधा वाढल्याने मुक्त संचार करणे आता अत्यंत सोपे झालेले आहे. त्यामुळे देश- विदेशातल्या वार्या आता वाढु लागल्याने दरवर्षी पर्यटनात २० ते २५ टक्के वाढ होत आहे. जगभरच्या उलाढालीमध्ये पर्यटनाचा तिसरा क्रमांक लागतो. यामुळे रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि विमान कंपन्यांचा प्रचंड फायदा होत आहे. अनेक विद्यापीठात पर्यटनाचे व्यवस्थापन आणि नियोजन, ट्रॅवल अँड टुरिझम याचे पदविका, पदवी आणि पदव्युत्तर हे अभ्यासक्रम सुरू झालेले असून तो आता महाविद्यालयीन शिक्षणाचा एक भाग झालेला आहे. टुर ऑपरेटर, गाईड, ट्रॅवल एजन्सी, निवास, आतिथ्य, आरक्षण, विपणन, विक्री, गुंतवणुक, वाहतूक, अन्न, समारंभ, साहसी पर्यटन हे आज सेवा देणारे क्षेत्र झालेले आहे. यामुळे देश- विदेशात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत हे सत्य नाकारता येत नाही.
पर्यटन हे आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे आधुनिक अंग झालेले असल्याने आणि संस्कृतीचा भाग आहे. जंगल, समुद्र, आकाश कुठेही पर्यटन करता येते. हजारो ट्रॅव्हल्स कंपन्या, त्यांचे प्रचंड मार्केटिंग, आधुनिक सोयी सुविधांच्या वर्तमान पत्रातल्या पानपान भरच्या जाहिराती, लाखो रुपयांचे पॅकेजेस आणि तणावरहित प्रवासामुळे आज प्रवासात एक प्रकारची निश्चिंतता आलेली आहे. पैसे भरले, बॅग भरली आणि भरपूर वेळ काढला तर कुठलाही प्रवास हा सुखकर होतो. कारण पॅकेजच्या प्रवासात जेवण्या- खाण्याची आणि राहण्याची अजिबात चिंता नसते. त्यामुळे पर्यटनातल्या प्रवासाचा भरपूर आनंद घेता येतो आणि शरीर आणि मनाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. अनेक पर्यटक नुसते भटकण्याकरिता आणि मनाला वाटणार्या उभारीचा आनंद घेण्याकरिता जातात. मात्र यातले मोजकेच पर्यटक सखोल निरीक्षण करणारे असून चिकित्सक अभ्यास करणारे असतात.
आज पर्यटनाचे विश्व प्रचंड प्रमाणात वाढलेले असले तरी याचा प्राचीन इतिहासात पर्यटन हे कितीतरी कष्टदायक होते हे दिसून येते. पर्यटनाचा आजपर्यंतचा इतिहास खरोखरच मनोरंजक आहे. त्या असुविधेच्या काळात पर्यटन ही आवड नसून गरज होती असे दिसून येते. तेराव्या शतकात म्हणजे १२८८ ते १२९२ या दरम्यान इटलीच्या व्हेनिसचा यात्री आणि इटलीचा व्यापारी, संशोधक मार्को पोलोचे भारतात दोन वेळा आगमन झाले आणि त्याने दक्षिणेतल्या पांड्य साम्राज्याला भेट दिली. हा इतिहासातला सर्वात प्रसिद्ध पर्यटक आहे. पर्यटनाच्या संकल्पनेला चालना देण्याचे श्रेय रोमन साम्राज्याला दिले जाते. कारण जीवनात आनंद अनुभवण्या करिता समुद्र सफरीच्या पर्यटनाची ‘ग्रँड टुर’ ही कल्पना त्यांनी मांडली. त्यानंतर मोठ्या जहाजाचा कमांडर/ नावाडी असलेल्या ‘वास्को द गामा’ हा पहिला पोर्तुगीज खलाशी १७० व्यापार्यांना आणि यात्रेकरूंना घेऊन भारताचा शोध घेण्याकरिता चार जहाजातून ८ जुलै १४९७ लिस्बेनवरुन निघाला आणि २० मे १४९८ ला म्हणजे जवळपास एक वर्षांनंतर केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातल्या कालिकतच्या समुद्र तटावर दाखल झाला. समुद्रातून व्यापारी मार्ग शोधणारा हा पहिला युरोपियन होता. मसाल्याच्या व्यापारावर एकाधिकार स्थापित करण्याकरिता एकूण तीन वेळा वास्को द गामा हा भारतात आला आणि भारतातल्याच कोच्ची येथे २४ मे १५२४ ला त्याचा मृत्यू झाला. कोच्ची आणि लिस्बेन येथे वास्को- द गामची स्मारके आजही आहेत. या साहसी पर्यटनामुळे युरोपियन बाजार आणि पश्चिमी देशाकरिता भारताचे दरवाजे खुले झाले. त्यानंतर युरोपिय लोक भारताचे मुरीद झाले. प्राचीन भारतीय कला संस्कृती, खानपान, येथले नैसर्गिक सौंदर्य यांची चांगलीच भुरळ पडली.
सतरावे शतक संपता संपता युरोपमध्ये वार्षिक सुट्टी देण्याची परंपरा सुरू झाली. या सुट्ट्यांच्यादरम्यान प्रवासाकरिता मोठ्या प्रमाणावर लोक घरबाहेर पडु लागले आणि येथुनच पर्यटनाच्या व्यवसायाला सुरवात झाली आणि हे शतक ‘प्रवासाचे शतक’ मानले गेले. जवळपास एकोणविसावे शतक पूर्ण बघितलेल्या इंग्लंडचा संशोधक थॉमस कुक याने ‘थॉमस कुक अँड सन’ ही पहिली प्रवासी कंपनी स्थापन केली आणि ‘पॅकेज टुर’चा जगात उदय झाला. २२ नोव्हेंबर १८०८ ला इंग्लंड येथील डर्बशायर येथे जन्म झालेल्या थॉमस कुकने व्यावसायिक पर्यटनात अभुतपूर्व क्रांती करून १८ जुलै १८९२ ला म्हणजे वयाच्या ८३ व्यावर्षी जगाचा निरोप घेतला. १८४१ ला एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला थॉमस कुक याने ‘लिसेस्टर ते लॉगबॅरो’ हा पहिली जागतिक लक्ष वेधून घेणारा पहिला व्यावसायिक प्रवास केला. या प्रवासात एकूण ५७० पर्यटक होते आणि खुल्या रेल्वे गाडीतून प्रत्येकाकडून एक शिलिंग हे जाण्यायेण्याचे प्रवासी भाडे घेतले गेले. या प्रवासाच्या मार्गात लागलेल्या शिखराच्या बोगद्यातून गाडीच प्रवेश होण्यापुर्वी पर्यटकांच्या मनोरंजाकरिता संगीत आणि गाण्याची मेजवानीसुद्धा आयोजित करण्यात आलेली होती. थोडक्यात थॉमस कुकला त्या काळात व्यावसायिक पर्यटनाकरिता जे काही करता येणे शक्य होते ते सर्व केले आणि येथुनच पर्यटनाच्या व्यावसायिकतेला जगात प्रारंभ झाला. यानंतर थॉमसने नवी संकल्पनेसह अनेक प्रवासी पर्यटन आयोजित केले. यात प्रवास, निवास आणि आवडीचे ठिकाण याचा समावेश होता. व्यवसायासोबतच थॉमस कुकने पर्यटकांना मनोरंजन आणि विरंगुळासुद्धा दिला. नवीन संस्कृती, नवीन लोक, नवीन ज्ञान आणि साहस कण्याची संधी सर्वप्रथम लोकांना मिळाली. आजही भारतासह जगामध्ये ‘थॉमस कुक’ ही प्रसिद्ध ट्रॅवल कंपनी आहे. आकर्षण, सुलभता, निवास, सुविधा आणि उपक्रम यांचा समावेश असलेल्या ‘थॉमस कुक’ यांना आधुनिक पर्यटनाचे जनक म्हटले जाते.
भारताबाबत विचार करायचा झाल्यास प्रवास आणि पर्यटना करिता आजही भारताची फार मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. दरवर्षी करोडो पर्यटक भारताच्या विविध ठिकाणी भेटी देतात. ऐतिहासिक स्थळे,राष्ट्रीय महापुरुषांची निवासस्थाने, अतिप्राचीन मंदिरे, प्राचीन किल्ले, समुद्रतट, आकर्षक महाल आणि हवेल्या, महाराष्ट्र आणि राजस्थान येथील किल्ले , फतेहपूर सिक्री , ताजमहाल, चारमिनार, हम्पी , दिल्ली आणि आग्र्याचा लाल किल्ला अशी शेकडो स्थळे बघण्याकरिता जगभरातुन पर्यटक आणि अभ्यासक भारतात येत असतात आणि समृद्धीचा खजिना आपल्या देशात घेऊन जातात. समुद्र पर्यटन, व्यवसाय पर्यटन, सामान्य पर्यटन, क्रीडा पर्यटन, साहस पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, इको आणि जंगल पर्यटन, या सोबतच धार्मिक आणि कृषी पर्यटन यासह अनेक पर्यटन प्रकारच्या व्याख्या प्रस्थापित आणि लोकप्रिय होत आहेत. देशात आणि परदेशात पर्यटकां करिता ‘आध्यात्मिक पर्यटन’ ही सुद्धा भारताची ओळख आहे.
ही ओळख पटविण्याकरिता आता ‘हॉलिडे पॅकेजेस’च्या संकल्पनेने चांगलाच जोर धरला आहे. रिसॉर्ट, हॉटेल, शिकारा, विमान बुकिंग, टुर मॅनेजर, ट्रॅवल एजंट, गाईड हे देश-विदेशात एकाच पॅकेजमध्ये मिळू लागले आहे. या पर्यटनाच्या बळावर शेकडो कोटींची उलाढाल होत आहे आणि देशाच्या सकल उत्पन्नात पर्यटन वाढीचा भरपूर वाटा आहे असे दिसून येते.
– श्रीकांत पवनीकर
Web Title: Ancient and modern history of world tourism