अर्जेंटिनाच्या जनतेचा जल्लोष अखंड सुरू आहे. राजधानी ब्यूनर्स आयर्सला तसं उत्सवाचंच स्वरूप प्राप्त झालं आहे. आकाशी आणि पांढऱ्या पट्ट्यांची जर्सी परीधान करून देशवासीय राष्ट्रध्वजासह नाचत आहेत, गात आहेत. बहुतेकांकडे त्यांचा नायक लिओनेल मेसीचं छायाचित्रं, पोस्टर आहेत, तर काहींकडे विश्वचषकाची प्रतिकृती. रविवारी रात्री आशा-निराशेचे हिंदोळे अनुभवल्यानंतर अखेरीस शेवट एखाद्या परीकथेप्रमाणे गोड झाला. त्यामुळे या विजयानंदाची गोडी अधिक तीव्र. सोमवारी हा अश्वमेध देशात आला, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पुन्हा तोच गर्दीचा महापूर. राष्ट्रगीताचं सुरात गायन आणि मेसी नामाचा जयघोष हा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेला. याला कारणही तसंच होतं, तब्बल ३६ वर्षांनंतर देशातील सर्वात आवडत्या खेळातलं विश्वविजेतपद मिळालं होतं.
या विशाल आनंदलाटेत गहिरं दु:ख विसरण्याचं सामर्थ्य होतं. अर्जेंटिना आर्थिक मंदीच्या लाटेत होरपळत आहे. महागाईनं सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. गेल्या आठवड्यात उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्ष क्रिस्टिना फर्नांडीझ डी किर्चनर यांना एक अब्ज डॉलरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निर्णयानं राजकीय धुमश्चक्री अधिक वेगानं सुरू आहे. कोरोना कालखंडात ब्यूनस आयर्समध्येच सर्वात प्रदीर्घ कालावधीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. विश्वचषकाच्या अंतिम अंतिम लढतीप्रमाणेच अर्जेंटिनाच्या नागरिकांचा जगण्याशी संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच दुष्काळग्रस्त भागाला पावसानं दिलासा द्यावा, तसंच हे यश देशाच्या अस्थैर्यात संजीवनी देणारं ठरलं.
सौदी अरेबियाविरुद्धच्या सलामीच्या लढतीत अर्जेंटिनानं धक्कादायक पराभव पत्करला, तेव्हा आता फुटबॉलमधूनही काही अपेक्षा करता येणार नाही. हा संघ साखळीतच गारद होणार, अशी सर्वांचीच समजूत झाली होती. पण अर्जेंटिना आणि मेसीचा खेळ उत्तरोत्तर बहरत गेला आणि विश्वचषकाची प्रतीक्षा संपुष्टात आली. या वाटचालीत नेदरलँड्स, क्रोएशिया आणि फ्रान्सविरुद्धचे विजय संस्मरणीय होते. हे यश अर्जेंटिनाचा महानायक दिएगो मॅराडोनासारखंच मेसीच्या मोठेपणावर शिक्कामोर्तब करणारं. समकालिन ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नव्यानं उदयास आलेल्या किलियन एम्बापेपेक्षा श्रेष्ठत्व सिद्ध करणारं. याचप्रमाणे पेले, मॅराडोना या सार्वकालिक सर्वोत्तम फुटबॉलपटूंच्या (गोट : ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) यादीत स्थान मिळवून देणारं. १९८६च्या विश्वचषकाला मॅराडोनाच्या पराक्रमामुळे गाजला. तसंच ‘हँड ऑफ गॉड’ ही आख्यायिका झाली. पुढच्या विश्वचषकात जगज्जेतेपदाची पुनरावृत्ती करण्याची संधी अर्जेंटिनाकडे पुन्हा चालून आली. पण यावेळी पश्चिम जर्मनीनं मॅराडोनाच्या संघाला उपविजेतेपदापर्यंतच मर्यादित राखलं.
रशियातील २०१८च्या विश्वचषकात अर्जेंटिनाचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत गारद झाल्यानंतर लिओनेल स्कलोनी यांच्याकडे अर्जेंटिनाचं प्रशिक्षकपद आश्चर्यकारकरीत्या सोपवण्यात आलं. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय आणि क्लब स्तरावर कोणतंही मोठेपण न मिळवलेला हा स्कलोनी काय यश मिळवून देणार? अशा शब्दांत त्याची प्रतारणा केली जायची. त्यात २०१९च्या कोपा अमेरिका चषकाच्या उपांत्य फेरीत ब्राझीलकडून झालेला पराभव अर्जेंटिनासाठी धोक्याची घंटा ठरला. पण स्कलोनी यांच्यावर संघ व्यवस्थापनानं विश्वास ठेवला. राखेततून पुनर्जन्म घेणाऱ्या चातकाप्रमाणे अर्जेंटिनानं कात टाकली. गतवर्षी अर्जेंटिनानं कोपा अमेरिका चषक जिंकून दाखवला. त्यानंतर सलग ३६ सामन्यांत हा संघ अपराजित राहिला. स्कलोनी यांनी संघाला जिंकण्याचा मार्ग दाखवताना टिकाकारांना उत्तरही दिलं.
< काही दशकांनंतर अर्जेंटिनावासीयांचा दुसरा महानायक मेसीनं आपल्या जादुई खेळानं फुटबॉलजगताला मंत्रमुग्ध केलं. काहींना त्याच्यात मॅराडोनाचीच झलक दिसत होती.
< २०१४ मध्ये मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनानं अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्यावेळी जर्मनीच्याच अडथळ्यानं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. तेव्हा अतिरिक्त वेळेत जर्मनीनं बाजी मारली.
< परंतु तरीही मेसीचा निर्धार पक्का होता. पुन्हा नेतृत्व मेसीकडेच होतं. जर्मनीनं साखळीतच गाशा गुंडाळल्यानं तीही भीती नव्हती. अर्जेंटिनानं फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये नामोहरम केलं आणि तिसऱ्यांदा जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली.
< ‘फिफा’कडून दिला जाणारा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार मेसीनं पटकावला, तसा २०१४मध्येही त्यानं तो मिळवला होता.
< पण यावेळी विश्वविजेतेपदानं तो आनंद द्विगुणित झाला. विक्रमी सात बलून डीओर पुरस्कार, विक्रमी सहा युरोपियन गोल्डन शूज पुरस्कार, २०२०मध्ये बलून डीओर स्वप्नवत संघ पुरस्कार यामुळे मेसीची कारकीर्द झळाळणारी आणि समृद्ध होती.
< २०२१पर्यंत मेसीची संपूर्ण व्यावसायिक कारकीर्द ही बार्सिलोनाकडून गाजली. क्लबच्या विक्रमी ३५ जेतेपदांमध्ये मेसीचं योगदान महत्त्वाचं. यात १० ला लीगा, सात कोपा डेल रे आणि चार चॅम्पियन्स लीग विजेतेपदांचा समावेश.
< आंतरराष्ट्रीय आणि क्लब स्तरावर मेसीच्या खात्यावर ७५०हून अधिक गोल जमा आहेत. यापैकी अर्जेंटिनासाठी सर्वाधिक १७२ सामन्यांत सर्वाधिक ९८ गोल त्यानं नोंदवले आहेत. पण विश्वविजेतेपदाचं अधुरेपण मेसीनं संपुष्टात आणलं.
उद्योगजगतात एकत्रित लक्ष्य हे कंपनीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावते. तसंच खेळाडूंमधील मजबूत बंध हे अर्जेंटिनाच्या यशाचं प्रमुख सूत्र होतं. सौदी अरेबियानं पहिल्याच लढतीत अस्मान दाखवल्यामुळे वास्तवाची जाणीव झालेल्या अर्जेंटिनाचा मार्ग सोपा मुळीच नव्हता. साखळी, बाद फेरी आणि नंतर अंतिम सामना या मार्गातील असंख्य आव्हानं झुगारताना एकीचं बळ प्रकर्षानं दिसून आलं. त्यांच्या सांघिकतेचं लक्ष्य एकच होतं, ते म्हणजे तीन तपांनंतर विश्वविजेतेपद पुन्हा जिंकणं.
देशाच्या विविध भागातील आणि लीग व्यासपीठावरही विविध क्लबचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी या एकलक्ष्यासाठी आपल्यातील क्षमता आणि अहंकार हे सर्वप्रथम बाजूला ठेवले. देशासाठी खेळतानाचा अभिमान आणि देशवासियांना विश्वविजेतेपदाचा आनंद मिळवून देण्याचा निर्धार यामुळे अर्जेंटिनाच्या मैदानावरील वावरात मेसी नव्हे, तर संघच अधोरेखित होत होता. अर्जेंटिनाच्या मैदानावरील एकजुटीला देशातील नागरिकांचंही मोठं पाठबळ मिळू लागलं. प्रत्येक सामन्यांना चौकाचौकात, रस्त्यारस्त्यांवर गर्दी होऊ लागली. विश्वविजेतेपद जिंकायचंच हा नारा बुलंद होऊ लागला. मेसी अमुचा नायक ही आशा अधिक तीव्र होत गेली.
प्रशांत केणी
prashantkeni@gmail.com