cinema hall
हो कोणी, प्रेक्षक देईल का प्रेक्षक?
आजपासून प्रदर्शित होत असलेल्या हिंदी चित्रपटाला फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच प्रेक्षक हवेत,
नवीन चित्रपटाची ऑनलाईन तिकीटे बुक करण्यासाठी प्रेक्षक हवेत…
पहिल्याच दिवशी काही कोटीची कमाई झाल्याच्या ब्रेकिंग न्यूजसाठी प्रेक्षक हवेत…
पहिल्या तीन दिवसातच विक्रमी कमाई झाल्याची न्यूज स्टोरीसाठी प्रेक्षक हवेत…
‘चित्रपट पाहता पाहता’ सोशल मीडियात हिंदी चित्रपटाबाबत सकारात्मक पोस्ट करण्यासाठी प्रेक्षक हवेत…
सर्व वयोगटातील प्रेक्षक हवेत…
नवीन हिंदी चित्रपट जुन्या काळातील एकपडदा चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक हवेत हो प्रेक्षक…
मॉलमध्ये खरेदीला आला आहात किमान एक तरी चित्रपट पाहून जा…
असे आज ओरडून, कळवळून, टाहो फोडून प्रेक्षकांना विनवणी करण्याची वेळ हिंदी चित्रपटसृष्टीवर आली आहे.सगळे खान, कपूर, खन्ना, कुमार, बच्चन, मेहरा, भट्ट, आनंद, मुखर्जी, बॅनर्जी, श्रॉफ वगैरे वगैरे ‘प्रेक्षक गेले कुठे’ या विवंचनेत आहेत.कोणी म्हणतंय, बघण्यासारखा चित्रपट नसेलच तर कोण थिएटरमध्ये येईल?कोणी म्हणतंय, सोशल मीडियातील ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या ट्रेण्डचा हा सगळा परिणाम आहे.
कोणी म्हणतंय, मल्टीप्लेक्सच्या महागड्या तिकीटाचा हा सगळा परिणाम आहे.
कोणी म्हणतंय, ‘समशेरा’, ‘लालसिंग चढ्ढा’, ‘रक्षाबंधन’, शाब्बास मिटठ्ठ्यू, दोबारा, सम्राट पृथ्वीराज या चित्रपटात पाहण्यासारखे काहीच नाही तर कोण कशाला वेळ, पैसा, शक्ती खर्च करुन सिनेमाला जाईल.
कोणी म्हणतेय, महिनाभरातच नवीन चित्रपट एखाद्या उपग्रह वाहिनीवर अथवा ओटीटीवर येतोय तर मल्टीप्लेक्समध्ये कशाला रसिक जातील. पूर्वीचे ते कधी बरे नवीन चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतोय, अशी विलक्षण ओढ असलेले चित्रपट रसिक आजच्या काळात घडलेत.कोणी आणखीन काही काही बोलतेय, आणि बोलायला हवेच.खुद्द पिक्चरवालेही बोलताहेत.
मनोज वाजपेयी एका मुलाखतीत स्पष्ट म्हणाला, आता चित्रपटाच्या गुणवत्तेची चर्चा होत नाही. त्यापेक्षा त्याने किती कोटींची कमाई केली याची बातमी होते.फरहान अख्तर एका मुलाखतीत म्हणाला, आजच्या ग्लोबल युगातील चित्रपट रसिक जगभरातील उत्तमोत्तम कन्टेन पाहतोय, त्याला आता हिंदी चित्रपटाकडून तशीच अपेक्षा आहे.
आणखीनही कोणी काय काय बोलतच असते. आजूबाजूच्या घटनांबाबत व्यक्त होणे अगदी स्वाभाविक असतेच. कदाचित मते पटतील अथवा नाही. महत्त्वाचे आहे ते, सिनेमावाल्यांनी स्वप्नरंजनात न राहता, वस्तुनिष्ठ विचार करावा. आपली भूमिका मांडावी. रसिकांची पिढी, त्यांची आवड निवड, प्राथमिकता बदलली आहे याचे भान यायलाच हवे.
फार पूर्वी मात्र नवीन चित्रपटाची घोषणा झाली रे झाली की अनेक चित्रपट शौकिनांचा माईंड जणू सेट व्हायचा की, काय असेल बरे या चित्रपटात? अहो, इतकेच नव्हे तर भव्य मुहूर्त होऊनही दुर्दैवाने बंद पडलेल्या अनेक चित्रपटांबाबतही रसिक हळहळलेत. कमाल अमरोही दिग्दर्शित आणि राजेश खन्ना निर्मित व अभिनित ‘मजनून’ हा चित्रपटही अगदी तसाच. राखी या चित्रपटात नायिका होती. मेहबूब स्टुडिओत अतिशय भव्य आणि देखण्या अशा मेणबत्तीच्या सेटवर या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त रंगला. अर्धा अधिक दिवसाचा सोहळा होता. मीडिया, चित्रपटसृष्टी आणि चाहते यांच्यात बरेच दिवस याच ‘मजनून’ची अतिशय उत्स्फूर्त चर्चा. लक्षात घ्या, नवीन चित्रपटाच्या मुहूर्तावर भरभरुन मनापासून बोलणारे/ ऐकणारे/ सांगणारे चित्रपट रसिक जेथे आहेत तेथे आज पहिल्याच शोपासून मल्टीप्लेक्सवर शुकशुकाट? नेमके काय कमी पडतेय? पूर्वप्रसिध्दीच्या कल्पना आणि प्रभाव कमी पडतोय का? अक्षरश: वारेमाप फिल्मी मुलाखती देऊनही रसिकांपर्यंत चित्रपट पोहचत नाही?
काय होते दिवस होते, चित्रपट संस्कृती चौफेर रुजत होती. प्रेक्षक संस्कृतीची मनसोक्त साथ होती. अगदी पिक्चर आवडला नाही तरी गाणी आवडत. उदाहरणार्थ, शक्ती सामंता दिग्दर्शित ‘मेहबूबा’ ( १९७६). चित्रपट रिलीजची तारीख ठरण्याच्या खूपच अगोदर त्याच्या गाण्याची तबकडी विक्रीला येई. लाऊडस्पीकरवरुन, इराण्याच्या हॉटेलमधील ज्यूक्स बॉक्समध्ये चार आण्याचे नाणे टाकून ती गाणी ऐकायला मिळत, रेडिओ सिलोनवर सकाळी आठ वाजता तसेच बुधवारी रात्री बिनाका गीतमालात ही गाणी ऐकावयास मिळत आणि या नवीन चित्रपटाच्या आगमनाकडे लक्ष वाढे. त्या काळात विभागवार चित्रपट प्रदर्शित होत. म्हणजे, या शुक्रवारी मुंबईत प्रदर्शित झालेला चित्रपट पुढील शुक्रवारी दिल्ली, पंजाब, बिहार येथे, त्यानंतरच्या शुक्रवारी बंगाल, राजस्थान, गुजरात येथे, त्यानंतरच्या शुक्रवारी मध्य प्रदेश, हैदराबाद अशा पध्दतीने चित्रपट प्रदर्शित होत होत तो यथावकाश ग्रामीण भागात पोहचत असे. चित्रपट संस्कृती ही अशीच असते, चित्रपट व प्रेक्षक हे दोघेही एकमेकांसाठी आहेत अशा भावना आणि भूमिकेतून हे माध्यम व व्यवसाय आपल्या देशात खोलवर रुजला. हे सगळे ‘निर्मिती व यशाचे कोटीचे भले मोठ्ठे’ आकडे येण्यापूर्वीचे दिवस आहेत. पूर्वी नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाचा पहिला दिवस म्हणजे जणू मोठा सण असे. मग तो पिक्चर कितीही लहान मोठा कसा का ना असो. खरं तर पहिल्या दिवशीचा पब्लिक कौल ठरवतो, हा चित्रपट लहान आहे की मोठा? प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (१९७३) रिलीज झाल्यावर मोठा चित्रपट झाला आणि मुकुल आनंद दिग्दर्शित ‘त्रिमूर्ती’ (१९९६) पडद्यावर पोहचल्यावर छोटा चित्रपट झाला. चित्रपटाचे पंचांग पब्लिक ठरवत असतो आणि तोच आज हिंदी चित्रपटापासून दूरावलाय. अन्यथा नवीन चित्रपटाचा पहिला शो म्हणजे, थिएटरमधील प्रोजेक्शन रुमपासून ब्लॅकमार्केटपर्यंत व्हाया पडद्यासमोरचा चित्रपट रसिक कुतूहल, पिक्चर कैसी होगी?
तरी बरे, आज हिंदी चित्रपट रिकाम्या सीट्सना दाखवायची दुर्दैवाने वेळ आली असता मराठी चित्रपट आणि दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाची हिंदी आवृत्ती उत्तम प्रतिसाद मिळतोय. टकाटक-२, दगडी चाळ-२च्या यशाने मराठी माणूस मराठी चित्रपट आवर्जून पाहतोय असा एक निष्कर्ष काढला गेला आहे. अर्थात, कोणत्याही भाषेतील सर्वच्या सर्व चित्रपट पाहण्यासारखे नसतात, म्हणूनच अनेक चित्रपटाना रसिक नाकारतात आणि काही चित्रपटांना रसिक स्वीकारतात. ही जगभरातील प्रेक्षक संस्कृती आहे. तर ‘बाहुबली’ने रुजवले ते चांगल्या पध्दतीने उगवतेय. पुष्पा, आरआरआर, केजीएफ-२, रॉक्रेट्री, कार्तिकेय-२ अशा मूळ तेलगू अथवा तमिळ चित्रपटाची हिंदी डब आवृत्तीस उत्तम प्रतिसाद मिळतोय. असे चित्रपट हुकमी क्राऊड पुलर होताहेत. हिंदी चित्रपटसृष्टीने याचा धक्का घेतलाय म्हणे. हे सगळे कमी की काय तर मराठी चित्रपट रसिकांसमोर आता डिजिटल युगात जगभरातील उत्तमोत्तम कन्टेट आहेच, पण त्यांनी द ग्रेट इंडियन किचन, जोजी, कुंभलंगी नाईट्स अशा मल्याळम चित्रपटांनाही पसंती दिली. कोरोना प्रतिबंधक काळात आपण सगळेच घरी बसलो त्यातून लॅपटॉपवर चित्रपट पहायची लागलेली सवय आता अंगवळणी ठरलीय. आणि अशातच डार्लिंग (आलिया भट्ट निर्मित व अभिनित), कठपुतली (अक्षय कुमारला हिट चित्रपट हवाय) हे चित्रपटगृहात प्रदर्शित न करता थेट ओटीटीवर आले ही व्यावसायिक पावले सकारात्मक आहेत. तात्पर्य, ओटीटीवर आपला चित्रपट प्रदर्शित करायचा आहे, असाच दृष्टिकोन ठेवून थीम आणि बजेटचा विचार करायला हवा. आश्चर्य म्हणजे, अनेक हिंदी चित्रपट जगभरातील जवळपास नव्वद देशात प्रदर्शित होत असूनही यशाने फारकत घेतलीय.
एकूणच बदलत्या परिस्थितीतून हिंदी चित्रपटसृष्टी कसा मार्ग काढणार, याचे उत्तर एखादा चित्रपट सुपर हिट ठरल्यावरच मिळेल. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘काश्मीर फाईल’ यात यशस्वी ठरलाय. असाच एखाद्या चित्रपटाने सध्याची ‘फ्लॉपची हंडी अथवा कोंडी’ फुटेल.
कधी काळी प्रेक्षक नवीन चित्रपटाची अनेक मार्गाने वाट पाहत असत, आता खुद्द सिनेमावाले प्रेक्षकांची आतुरतेने वाट पाहताहेत. हेही दिवस जातील या आशेवर पुढचा शो सुरु राहील… ती आशाच माणसाला आधार देते तशीच ती बहुस्तरीय असा माणसांचा समूह असलेल्या चित्रपटसृष्टीलाही आधार देतेय. चित्रपटसृष्टी म्हणजे काही स्टार, बरेचसे लहान मोठे कलाकार, चरित्र कलाकार, गीतकार, वादक, संगीतकार, वादक,अनेक प्रकारचे तंत्रज्ञ, वितरण, प्रदर्शक, प्रसिद्धी अशा अनेक घटकांचा मिळून व्यवसाय आहे. त्याचा समतोल साधण्यास यशाची बेरीज हवी तशीच ती गुणवत्तेचीही हवीच. प्रेक्षक आपोआप येतीलच…
– दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com