रामेश्वर या तामिळनाडूतील एका छोट्या गावात सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अब्दुल नावाच्या मुलाने आपल्या कर्तृत्वाने ‘भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम’ या अद्वितीय लिजंड म्हटले जाईल या पदापर्यंत कशी वाटचाल केली ते या पुस्तकातून माधुरी शानबाग यांनी सांगितले आहे. डॉक्टर कलाम यांचा आपल्याला परिचय आहे. भारताचे राष्ट्रपती म्हणून. आपल्या जाज्वल्य देशभक्तीने देशाला संरक्षण सिद्धता मिळवून देण्यात अजोड कामगिरी केली हे सर्वांना परिचित आहे.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या पुस्तकात त्यांच्या कर्तृत्वाचा संशोधक वृत्तीचा बुद्धी श्रम त्यांच्या कर्तृत्वाचा देश प्रेमाचा आणि आणि बुद्धी आणि श्रमाचा परिचय करून दिला आहे. लहान-मोठ्या सर्वांनाच लहान मोठ्या सर्वांनाच अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक आहे. बालपण आणि विद्यार्थी दशा, संशोधक होण्याची पूर्वतयारी, संरक्षण खात्यातील महत्त्वाचे संशोधन, राष्ट्रपतीपदावर आणि नंतर, कलाम नावाचा माणूस, कलाम यांची लेखन संपदा, विचार धन अशा प्रकरणातून अफाट कार्य कर्तृत्वाचा परिचय माधुरी शानभाग यांनी करून दिला आहे.
विद्यार्थी, समाजसेवक आणि वाचनाची आवड असणाऱ्या सर्वांनाच अत्यंत उपयोगी असे हे पुस्तक आहे. विज्ञानात मन व बुध्दी भारून टाकण्याची शक्ती असून विज्ञानाचा अभ्यास बुध्दीचा विकास करतो, अध्यात्मिक उंची वाढवतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. लहानपणी पक्षी आकाशात विहरत असताना आणि विमान डोक्यावरून उडत असताना आपणही एक दिवस विमान चालवायचे ही जिद्द चिकाटी त्यांनी पूर्णत्वास नेली. कॉलेजची फी भरण्यासाठी करावी लागणारी तडजोड, शिष्यवृत्ती मिळवून बहिणीचे दागिने सोडवण्यासाठी त्यांनी घेतलेला ध्यास वगैरे माहिती अत्यंत प्रेरणादायी आहे.
कानपूरमध्ये नंदी हॉवरक्राफ्ट बनवण्यासाठी तीन वर्षे घेतलेले परिश्रम, तत्कालीन सरकारकडून झालेला विरोध, टीआयएफआरचे प्रमुख एम.जी.के.मेनन यांच्याशी झालेली मुलाखत, विक्रम साराभाई यांनी रॉकेट इंजिनिअर पदासाठी घेतलेली मुलाखत वगैरे माहिती आणि त्यातून त्यांच्या संशोधक होण्याच्या पूर्वतयारीचा अभ्यास माहितीपूर्ण आहे. ‘नाईके अपाची’ या पहिल्या अंतराळ यानाचे प्रकल्प प्रमुख डॉ.अब्दुल कलाम होते. त्यांच्या या कार्यक्षमतेची दखल विक्रम साराभाई यांनी घेऊन रोहिणी या भारतीय बनावटीच्या साऊंडिंग रॉकेट फौजेत सामिल करून घेतले.
डॉ.कलाम साराभाईंना आपले गुरू मानत. विक्रम साराभाईंच्या प्रत्येक प्रकल्पाचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. या आणि अशा अनेक प्रकल्पांची उद्बोधक माहिती संशोधन खात्यातील महत्वाचे कार्य या प्रकरणात आली आहे. अग्नी या अवकाश यानाने आकाशी घेतलेली झेप आणि त्याप्रसंगाचे आलेले वर्णन कलामांच्या देशभकीने ओतप्रोत भरलेले आहे. आदर्श भारतीय कसा असावा हे शिकवणारे कलामांचे व्यक्तीमत्व. भारतमातेच्या या सुपूत्राचे तरुणाईसाठी लिहिलेले गीत लेखिकेने शेवटी दिले आहे. हे गीत असे…
मी आज या देशाचा तरुण नागरिक
तंत्रज्ञान, विद्या या शस्त्रांनी सज्ज
अन् देश प्रेमाने प्रेरित आहे.
छोटे ध्येय हा गुन्हा आहे,
हे मी जाणतो.
विशाल दृष्टी ठेवून मी माझा घाम गाळेन,
हा देश प्रगत करायचे ध्येय माझ्या दृष्टी समोर आहे.
फक्त दूरदृष्टीमुळे हे कोटी कोटी आत्मे प्रेरित होतील,
हे आता मला समजलेले आहे.
पृथ्वी पाताळ आणि आकाशातील कोणत्याही ऊर्जेपेक्षा
प्रेरित झालेला आत्मा अधिक शक्तिशाली असतो
हा ज्ञानदीप मी तेवत ठेवीन
अन् विकसित भारताचे स्वप्न साकार करेन…
प्रा. रघुनाथ शेटकर
raghunathshetkar0@gmail.com
…………………………..
भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
लेखिका : माधुरी शानभाग
मुखपृष्ठ : चेतना विकास फडके
नवचैतन्य प्रकाशन, बोरिवली
पृष्ठे : ४६, मूल्य : रु. ९०/-