‘सोंगाड्या’ (पुणे शहरात प्रदर्शित १२ मार्च १९७१)ची मुंबई, पुण्यापासून दूरदूरवरच्या खेड्यापाड्यात भारी क्रेझ, त्यातील काय गं सखू, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी या गाण्यांनी तर लग्नातील बॅण्डपासून बारशाच्या लाऊडस्पीकरपर्यंत आणि लहान मोठ्या ऑर्केस्ट्रापासून सहलीतील भेंड्यांपर्यंत सगळीकडेच धमाल उडवलेली. पिक्चरने अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल गर्दीत वाटचाल केली आणि या सगळ्यात हुकमाचा राजा ‘दादा कोंडके’. ढोपरापर्यंत ढगाळ पॅन्ट, लोंबणारी नाडी, अर्ध्या हाताचा मोठ्या आकाराचा कुर्ता, केसांचा जणू पैलवान कट, बारीक मिशी, वागण्यात भाबडेपण, वेंधळपण, ढोबळ ग्राम्य भाषेत नाॅनस्टाॅप बकबक. ‘दादा कोंडके यांचे हे रुपडं’ पब्लिकला आवडले आणि एकदा का अशी पसंती मिळाली की ती क्रेझ वर्षभरात नवीन चित्रपट पडद्यावर आणून कॅश करायला हवी. ही व्यावसायिक रणनीती.
याच वातावरणात ‘एकटा जीव सदाशिव’ (पुणे शहरात अलका टाॅकीजला प्रदर्शित ३१ मार्च १९७२) आला. योगायोगाने त्याच दिवशी पुण्यात चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ प्रभातला प्रदर्शित झाला. दोन्ही सुपर हिट. आजही दोन्हीची गाणी हिट. इजा, बिजानंतर तिजा हवाच. बळकटी देण्यासाठी. आता दादा कोंडके यांची ग्रामीण नायक आणि विनोदाची वेगळी शैली अशी इमेज तळागाळातील रसिकांच्या मनावर फिट्ट झाली होती. पहिल्या दोन्ही चित्रपटांची कथा पटकथा व संवाद वसंत सबनीस यांचे, तर दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचे होते. आता दादांनीच कथा लिहिली. पटकथा जगदीश खेबूडकर यांनी लिहिली. संवाद व दिग्दर्शन दिनेश यांचे. (प्रभाकर पेंढारकर यांचे टोपणनाव दिनेश) गीते जगदीश खेबूडकर व दादा कोंडके यांची आणि संगीत प्रभाकर जोग यांचे. पहिल्या दोन चित्रपटांना राम कदम यांचे संगीत होते.
दादा कोंडके यांनी असे बदल केले आणि चित्रपटाचे नाव ‘आंधळा मारतो डोळा’. नायिका म्हणून अंजना मुमताजची निवड. (उषा चव्हाणशी जोडी शोभून आणि जमूनही हा बदल का?) कारण, नायिका शहरी. त्यामुळेच तशी नायिका हवी. धुमाळ, जयशंकर दानवे, गुलाब मोकाशी, भालचंद्र कुलकर्णी, रजनी चव्हाण, सरस्वती बोडस, शांता तांबे, संपत निकम, दामोदर गायकवाड आणि पाहुणी कलाकार अरुणा इराणी.
पिक्चरची थीम काय? दादा कोंडके यांची धमाल दुहेरी भूमिका. शहरात कृष्णकुमार आणि गावात भीमा. पब्लिकला एकाच तिकीटावर दोन- दोन दादा कोंडके ही फुल्ल एंटरटेनमेंट पर्वणी. भीमाला पिक्चरचं वेडं असते. त्याला वाटतं आपण मुंबईला जावूया नशीब पालटेल. कृष्णकुमारला त्याचे काका (जयशंकर दानवे) छळत असतात. त्याला मावशी (सरस्वती बोडस) वाढवते तर त्याचं बहिणीवर (रजनी चव्हाण) प्रेम आहे. कृष्णकुमार नेमका भीमाच्या गावात जातो तेव्हा कृष्णकुमारचे सवंगडी (धुमाळ वगैरे) त्याला भीमा समजतात तर मुंबईत भीमाला कृष्णकुमार समजतात. कृष्णकुमारची प्रेयसीही (अंजना) फसते. यातून होणारी गंमत जंमत, गडबड गोंधळ, अफलातून धुमाकूळ म्हणजेच, ‘आंधळा मारतो डोळा’ (पुणे शहरात मिनर्व्हा थेटरात प्रदर्शित ३१ ऑगस्ट १९७३. म्हणजेच पन्नास वर्ष पूर्ण).
दादा कोंडके यांनी यशाची हॅटट्रिक साधली हे महत्वाचे. दादांचा पिक्चर रिलीज होतो ते पंचवीस आठवडे मुक्काम करण्यासाठीच. त्या काळात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत. पुण्यानंतर काही आठवड्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा वगैरे करत मुंबईत दाखल. गिरगावातील सेन्ट्रल आणि दादरचे कोहिनूर थेटरात प्रदर्शित. त्या काळात एकाच वेळेस अनेक मराठी व हिंदी चित्रपट सुपर हिट, म्हणून नवीन चित्रपट कायमच थिएटरसाठी वेटींग लिस्टवर. ते पथ्यावरही पडे. तोपर्यंत गाणी लोकप्रिय. ‘आंधळा मारतो डोळा’ची गाणी आजही हिट. दादा कोंडके गीतलेखनातही विशिष्ट शैली होती. प्रसंगाचा मूड त्यात ते पकडत आणि त्याच गाण्याच्या पडद्यावरच्या सादरीकरणाचे भान त्यांना असे. चल रं शिरपा देवाची किरपा, ऐशी वर्षाची असून म्हातारी सांगतीया वय सोळा खोटं काय म्हणता आंधळा मारतो डोळा, हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पालीला टिला (या गाण्यात दादा कोंडके आणि अरुणा इराणीने धमाल उडवली), पोरं मी लहान बालिका अजान, नाना पुरे करा हा फाजिलपणा आता लय झालं ही या चित्रपटातील दादा कोंडके यांनी लिहीलीत. तर जगदीश खेबूडकर यांची जीव भोळा खुळा कसा लावू लळा, अजून रंगाची हळद ही गाणी आहेत. दादा कोंडके यांना लोकसंगीताचा कान फारच चांगला. म्हणून तर नेहमीच ते गाण्यात भारी ठरत आणि गाणी हिट तर पिक्चरला रिपिट रन हमखास. ही गाणी आशा भोसले, उषा मंगेशकर व जयवंत कुलकर्णी यांनी गायलीत. चित्रपटाचे छायाचित्रणकार त्यागराज पेंढारकर आणि संकलन दादांचे हुकमी एन. एस. वैद्य. दादा कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत शूटिंगचा डेरा टाकत. हाही चित्रपट तेथेच चित्रीत झाला. हिल हिल पोरी हिलाचे शूटिंग चेंबूरच्या आशा स्टुडिओत झाले तर चित्रपटातील काही प्रसंग गॅन्ट्र रोडच्या ज्योती स्टुडिओत चित्रीत झाली.
दादांनी ओळीने तीनही चित्रपट हिटची साधलेली हॅटट्रिक त्यानंतर ते चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत ‘पांडू हवालदार’ (१९७५) पासून पुढे कायम राहीली. ती इतकी की दादांचे हेच हिट पिक्चर कालांतराने एक आठवड्यासाठी पुन्हा पुन्हा प्रदर्शित होत गर्दी खेचत राहिले आणि आता तर झी टाॅकीजवर त्यांच्या रामराम गंगाराम, सासरचं धोतरं इत्यादी धमाल पिक्चर दाखवताना पुन्हा दादा कोंडके फ्लॅशबॅक जोरात. दादा कोंडके यांनी आपले गुरु भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘तांबडी माती’ (१९६९) पासून चित्रपट माध्यम व व्यवसायात पाऊल टाकले. पण त्यांना इमेज व हुकमी ऑडियन्स ‘सोंगड्या’ने दिला. तो कायम ठेवण्यातील एक फंडा ‘आंधळा मारतो डोळा’चा!
दिलीप ठाकूर