कोरोनाच्या बंदीकाळानंतर मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ठळक दोन बदल हे लक्षवेधी ठरलेत. एखादी लाट किनाऱ्यावर धडकावी अशाच प्रकारचे हे बदल. जे साऱ्यांनाच थक्कही करून गेले. एक म्हणजे-एखाद दुसरा अपवाद वगळता सारी विनोदी नाटके एकसाथ हजर झालीत! आणि दुसरं म्हणजे-बहुतेक सर्वच नाटकातील प्रमुख, मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या ‘नायिका’ या ‘नाबाद पन्नास’ वयाने आहेत! मध्यवयीन किंवा वृद्धापकाळाकडे झुकलेल्या या भूमिका! एक वेगळाच ट्रेंड त्यातून बघायला मिळतोय. नाटकांकडे रसिकांना वळविण्याचा त्यातून प्रयत्न होतोय. जो काही प्रमाणात यशस्वीही ठरतोय.
‘संज्याछाया’ या नाटकातले ‘छाया आणि संज्या’ या वयोवृद्ध दाम्पत्याचं जीवन. यात निर्मिती सावंत या ‘विनोदाच्या महाराणी’ने तशी गंभीर भूमिका केलीय. आईच्या भूमिकेत निर्मिती सावंत शोभून दिसताहेत अर्थात त्या भूमिकेला असणारी मुश्किल छटा लज्जत वाढविते. कायम विनोदी भूमिकेत बघण्याची सवय झालेल्या रसिकांना ‘छायाआई’ची भूमिका वेगळ्या वळणावरली वाटेल, यात शंका नाही. गंगुबाई नॉन मॅट्रिकमधली गंगुबाई, किंवा जाऊबाई जोरातमधली नीशा काशीकर या गाजलेल्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवर ‘संध्या’ची भूमिका तशी वय वाढविणारी ठरलीय. प्रशांत दळवी याची संहिता आणि चंद्रकांत कुलकर्णी याचे दिग्दर्शन दृष्ट लागण्याजोगं.
वंदना गुप्ते यांचे ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ यातही तशी मध्यवर्ती भूमिका त्यांच्याकडे असल्यागत आहे. सोबत प्रतीक्षा लोणकर, राजन जोशी ही टिम. स्वरा मोकाशी याचे लेखन आणि चंद्रकांत कुलकर्णी याचे दिग्दर्शन. तसे हे कोरोनाकाळापूर्वीचे जरी नाटक असले तरी नव्या दमात रंगभूमीवर आलंय. ‘जिगीषा’ या संस्थेची दोन नाटके ही वयोवृद्धांच्या भावभावना प्रामुख्याने मांडतात. नायक-नायिकेभोवती कथानक न गुंफता ते आई-बाबा यांच्याभोवती फिरते आहे. हा बदल नोंद घेण्याजोगा वाटतो.
‘जिगीषा’चे तिसरे नाटक चारचौघी! जे ३१ वर्षापूर्वी रंगभूमीवर आले होते. आता यात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या आईच्या भूमिकेत दिसताहेत. ही आई जुन्या विचारांची नाही तर तीन मुलींना सांभाळणारी एकाकी पालकत्व पार पाडणारी. लग्न न करता मुलींना जन्म देणारी आणि आपल्या विचारांशी ठामपणे उभी आहे. तिच्यात असणारी बंडखोरी ही जगण्यासाठी तिने स्वीकारली आहे. एका आशयप्रधान नाट्यातील ‘आई’ ही ‘वय आणि भूमिका’ या दोन्हीतून रोहिणी हट्टंगडी यांच्यासारख्या समर्थ अभिनेत्रीने सादर केलीय. रंगभूमीवर त्यांच्या आईच्या भूमिकेचं स्वागत होतय. ऐन तारुण्यात त्यांनी वयोवृद्धाची भूमिका केली पण आज ‘वय भूमिका’ समान आहे!
‘मी, स्वरा आणि ते दोघे’ या नाटकातील ‘मंजू’ची भूमिका. वय वर्षे पन्नाशी पार असलेली एक विधवा स्त्री. जी पूर्वी तारुण्यात कॉलेजात असलेल्या एका प्रियकराला घरी बोलाविते. त्याचीही पत्नी निधन पावली आहे. हे दोघेजण एकत्र जीवन जगण्याचा निर्णय घेतात. ‘लिव्ह इन’चा विषय यात खूबीने मांडलाय. मंजूच्या तरुण मुलीचंही प्रेमप्रकरण आहे पण मध्यवर्ती विषय किंवा निर्णायक ठरते ते आई मंजू! त्या भूमिकेत निवेदिता सराफ दिसतात. उभं नाटक त्यांनी अक्षरशः पेललं आहे. हे नाटक आदित्य मोडक यांचे असून नितीश पाटणकरचं दिग्दर्शन आहे.
एकदंत क्रिएशनचे चंद्रकांत लोकरे यांची ही निर्मिती आहे. यातली बिनधास्त मॉर्डन आई आहे. वैचारिक परिपक्वता तिच्यात आहे. संकटे आली म्हणून रडणारी किंवा हताश होणारी नाही. तिच्यात असलेला आत्मविश्वास लाख मोलाचा ठरतो. ‘३८ कृष्णव्हीला’ – हे नाटक. त्यातील ‘नंदीनी’ची मध्यवर्ती भूमिका. भूमिकेचं वय हे पन्नाशी पार. डॉ. श्वेता पेंडसे यांची संहिता आणि नंदीनीची भूमिका. या दोन्ही जबाबदाऱ्या पेलल्या आहेत.
दोनच पात्रे. डॉ. गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे. दिग्दर्शन विजय केंकरे यांचे. या कथानकात देवदत्त कामत हे मोठे साहित्यिक. त्यांच्या कादंबरीला सर्वोच्च पुरस्कार हा जाहीर झालेला. त्याच्या घरी नंदीनी पोहचते. पुरस्कार विजेती कादंबरी ही आपल्या नवऱ्याची असून त्यावर तुमचा हक्क नाही, असे देवदत्त यांना सूनावते. या वनलाईनवर पुढे उत्कंठा वाढत जाते. यात कोणताही ठोस पुरावा नसतानाही एकाकी लढाई देणारी नायिका नजरेत भरते. तसे हे संवादनाट्य पण त्याचे सादरीकरण सुंदरच. आपल्या नवऱ्यासाठी नंदीनी ज्या प्रकारे युक्तीवाद करते तो लक्षात राहतो.
लेखक दिग्दर्शक संतोष पवार याचे ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे भलेमोठे शीर्षक असलेले नाट्य. विनोदीनाट्य म्हणून गर्दी खेचतेय. त्यात शलाका पवार हिने लग्न झालेल्या वैनीची भूमिका केलीय. विनोदाचे पक्के अंग असल्याने ही वैनी दोन कुटुंबांना सांभाळत आहे. यात शारीरिक व्यंग असणारे सारेजण आहे. आपलं व्यंग, कमतरता ही लपविण्यासाठी साऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यात ‘एका लग्नाची गोष्ट’ गुंतली आहे सबकुछ संतोष स्टाईल! सागर कारंडे, रमेश वाणी, अजिंक्य दाते, सायली देशमुख ही टिम सोबत आहे, पण ‘विवाहित वैनी’ यात ‘मध्यवर्ती’ ठरते.
सर्वात कळस व कहर म्हणजे ‘आई आणि मुलगी’ या दोघीजणी एकाच वेळी बाळंतपण करतात! – यावर बेतलेले ‘कुर्रऽऽ’ हे नाटक. यात जसा हास्यदरबारच भरविण्यात आलाय. कॉमेडीक्वीन-विशाखा सुभेदार ‘चॅनल’मुळे घराघरात पोहचल्या आहेत. त्यांनी यात आईची भूमिका केलीय. प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, नम्रता संभेराव यांची सोबत आहे. तशी ही एक कुटुंबकथा. अक्षर-पूजा यांचे लग्न होऊन पाच वर्षे उलटली तरी पाळणा हालत नाही. अखेर पूजाची आई या दाम्पत्याच्या घरी पोहचते आणि सुरू होते हे कुर्रऽऽ! विशाखा सुभेदार यांची ‘आई’ यातलं आकर्षण ठरलंय. नाट्यनिर्मितीतही त्यांचा सहभाग आहे, हे विशेष!
एक चिरतरुण जोडगोळीचं ‘सारखं काहीतरी होतंय!’ हे नाटक. यात हिरो प्रशांत दामले आणि हिरोईन वर्षा उसगांवकर! आज दोघांचं वय पन्नास पूर्ण. पण ३६ वर्षांपूर्वी ‘ब्रह्मचारी’ या नाटकातून ही जोडी सुपरहिट बनलेली. वर्षा उसगांवकर यांनी आपलं वय ‘लॉक’ करून ३६ वर्षांपूर्वीसारखं केलं की काय अशी शंका येते! असो – कॉलेजमधील मैत्रीण इला (वर्षा) हिला केशव (प्रशांत) हा घरी बोलवितो आणि ‘नाटकात नाटक’ सुरू होतं. नवऱ्याला सोडचिठ्ठी दिलेली अशी इला. जिचं नाटकातल्या भूमिकेत वय नाबाद ५० असावे. तीच बाजी मारते.
प्रशांतच नाटक असल्याने सारी जुळवाजूळवी मस्तच. ‘वर्षा-प्रशांत’ ही हिरो-हिरॉईनची जोडगोळी आजही रसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करतेय. याची प्रचिती ‘हाऊसफुल्ल’ बुकींगवरून येते. या नाट्यातून स्वतःच्या पायावर उभी असलेली ‘मॅच्युअर स्त्री’ लक्षात राहाते.
निर्मिती सावंत, वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, निवेदिता सराफ, शलाका पवार, विशाखा सुभेदार, वर्षा उसगांवकर, मुक्ता बर्वे, लीना भागवत, प्रतिक्षा लोणकर या रंगभूमीवर परिचित असणाऱ्या अनुभवी नायिकांना प्रेक्षक अधिक पसंती देतात. त्यामुळे नव्या चेहऱ्यांची निवड ही करण्याचे धाडस निर्माते दाखवत नसावेत. घराघरात पोहचलेल्या मालिकांमध्येही ‘नायिका’ या आज आईच्या भूमिकेत आहेत, त्याचाही पडसाद असावा! रसिकांची त्याला पसंती मिळतेय.
यंदा सुरू असलेल्या नाटकात आणखीन काही नाटके याच वळणावरली आहेत. त्यात हरवलेल्या पत्त्यांचा बंगला यातल्या वंदना गुप्ते; आमने-सामने यातल्या लीना भागवत; धनंजय माने इथेच राहतात यातल्या प्रिया बेर्डे; व्हॅक्युम क्लीनर मधल्या निर्मिती सावंत (२२ वर्षानंतर पुन्हा ‘जाऊबाई’ येत आहेच!) यांचाही उल्लेख करावा लागेल.
साऱ्याजणी ‘आई’च्या आजीच्या भूमिकेत पोहचल्या आहेत. ‘बायकांची आणि त्यातही हिरोईनची वये कधीही विचारू नयेत. तसं विचारणं सभ्यतेला धरून होणार नाही,’ असं म्हटलं जायचं पण आज प्रत्यक्ष वय आणि भूमिकेचं वय हे जवळजवळ जवळपासच असल्याचं आजच्या नाटकांवरून दिसून येतंय. नायिका ‘वयात’ आल्यात, असंही म्हटलं तर ते गैर ठरणार नाही! कारण त्याभोवतीच कथानक फिरतंय! आणि या साऱ्याजणी टिपिकल रडणाऱ्या नाहीत तर झगडणाऱ्या, प्रेरणादायी आहेत!!
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com