खेळीयाड : एल्गार!

कतारमध्ये सुरू असलेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी इंग्लंड-इराण सामन्यातील ‘त्या’ घटनेने जगाचे लक्ष वेधले. इराणच्या फुटबॉल संघाने राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देत आपला असंतोष प्रकट केला आणि देशातील सरकारविरोधी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. हा इराणी ‘एल्गार’ कशासाठी होता? याचा घेतलेला हा आढावा.
fifa-football-world-cup
Published on: 
Updated on: 

इराणचे राष्ट्रगीत सुरू झाले, तेव्हा संघातील सर्वच खेळाडू एका रेषेत उभे होते... त्यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवले होते... त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती, पण तरीही ते शांत होते... एकाही फुटबॉलपटूच्या मुखी राष्ट्रगीत नव्हते... म्हणजेच खेळाडूंनी एकत्रितपणे घेतलेला हा निर्णय होता... हा एक निषेध होता.

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळाडूंकडून निषेध किंवा अभिवादन करणे हल्ली बऱ्याचदा घडते. ‘ब्लॅक लिव्हज मॅटर’ या चळवळीलाही अनेकांनी विधायक मार्गाने पाठिंबा दर्शवल्याचे दिसून आले आहे. परंतु जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असे बिरूद मिरवणाऱ्या फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेत म्हणजेच जागतिकपीठावर हा मूकनिषेध कशासाठी होता, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. काही वर्षांपूर्वी याच संघावर सत्ताधीशांची बाजू घेतल्याबद्दल चाहत्यांकडून टीका झाली होती.

या घटनेचे तात्कालिन कारण होते, ते म्हणजे १६ सप्टेंबरला कुर्दीश वंशाची २२ वर्षीय महिला माशा अमिनीचा कोठडीतील संशयास्पद मृत्यू. हिजाब चुकीच्या पद्धतीने परीधान केल्याचा ठपका ठेवून अमिनीला अटक झाली. इस्लामिक रिपब्लिकच्या महिलांसाठीच्या पोशाख कायद्याचा तिच्याकडून भंग झाला. अमिनीला तेहरानच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. कारण तुरुंगात तिला चक्कर आल्यापासून ती कोमात होती. तिला हृदयविकाराचा झटका बसल्याचाही दावा प्रशासनाकडून केला जात आहे. अमिनीसह ताब्यात घेतलेल्या महिला मात्र वेगळेच वास्तव मांडतात. अमिनीला अनेकदा जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे पोलिसांच्या क्रौर्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे या महिलांनी नमूद केले आहे. अर्थात इराणी पोलीस अधिकाऱ्यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला. वैद्यकीय अहवाल आणि स्वतंत्र निरीक्षकांनी अमिनीला मेंदूचा रक्तस्त्राव किंवा हृदयविकाराचा झटका यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

अमिनीचा मृत्यू झाला की हत्या? याबाबत संशय कायम राहिल्याने निषेध, मोर्चे यांचा देशभर उद्रेक सुरू आहे. २००९, २०१७ आणि २०१९ यापेक्षा मोठ्या प्रमाणात या आंदोलनाची व्याप्ती आहे, असा दावा ‘सीएनएन’ने केला आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’नेही गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठे आंदोलन असल्याचे म्हटले आहे. निषेध म्हणून काही महिलांनी हिजाब उतरवला, काहींनी जाळला, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी केशकर्तन केले. नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहात इराण मानवी हक्क आयोगाने दिलेल्या अहवालानुसार, देशभरातील निषेध करणाऱ्या किमान ३०४ नागरिकांना सुरक्षा दलाने ठार केले आहे. इराणच्या सुरक्षा दलाकडून आंदोलकांच्या जमावावर अंदाधुंद गोळीबार केला जातो, तर काही ठिकाणी स्वैर लाठीमार केला जातो, असा दावा ‘एम्नेस्टी इंटरनॅशनल’ने केला आहे. १९७९मध्ये इराणी क्रांतीनंतरच्या अशांततेचा हा सर्वात मोठ्या प्रमाणात झालेला उद्रेक आहे, असेही ताशेरे याबाबत ओढले जात आहेत.

१९७९ च्या क्रांतीनंतर महिन्याभरातच महिलांच्या पोशाखासंदर्भात अनिवार्य नियम लागू करण्यात आला. इराणचे पहिले राष्ट्राध्यक्ष रुहोल्ला मुसाही खोमेनी यांनी महिलांना कामाच्या ठिकाणी किंवा सरकारी कार्यालयात हिजाब (म्हणजेच डोके झाकणारे कापड) बंधनकारक केले. ते नसल्यास ‘नग्न’ असा ठपका ठेवण्याचे फर्मान काढण्यात आले. खोमेनी यांचे उत्तराधिकारी अली खोमेनी यांनीही हिजाब हा सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्यांना विरोध करीत नसल्याचे मांडत पाठराखण केली. १९८३मध्ये हिजाब नियमाला कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले. सार्वजनिक ठिकाणी हिजाबशिवाय वावरणाऱ्या महिलेला ७४ चाबकांचे फटके मारण्याची शिक्षा केली जायची. अनेक महिलांना या कायदेभंगामुळे तुरूंगवासही भोगावा लागला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम किंवा क्रीडा स्पर्धांमध्येही इराणच्या महिला हिजाबसह दिसून येतात. मात्र गेल्या काही वर्षांत इराणी समाजातील पोशाखांतही आमूलाग्र बदल झाले. तेथील आजच्या स्त्रीला हिजाबच्या जोखडातून मुक्त व्हायचे आहे. परंतु तेथील प्रशासन अशा महिलांना ताकीद देते, शिक्षा देते आणि हिजाबच्या सूचना देत कायदा पाळण्यासाठी धमकावते.

इतकेच नव्हे, तर हिजाबचे पालन करीन असे प्रतिज्ञापत्रावर लिहून घेतल्यावरच संबंधित स्त्रीला कुटुंबासमवेत जाण्याची परवानगी दिली जाते. महिलांकडून २०१९-२०मध्ये अनिवार्य हिजाबविरोधात महिलांकडून निषेधमोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढवत ताब्यात घेतलेल्या दोन महिलांची मुक्तता केली. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने हिजाबविरोधात आंदोलन केल्याच्या आरोपाखाली सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

इराण संघाचे प्रशिक्षक कार्लोस क्वेरोझ यांनी खेळाडूंना निषेध करण्यास परवानगी दिल्याचे सांगितले. सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार एहसान हजसाफीने आंदोलनात मृत्यू झालेल्यांसाठी श्रद्धांजली वाहिली. इतकेच कशाला, सप्टेंबरमध्ये सेनेगलविरुद्ध झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्याआधी काही खेळाडूंनी राष्ट्रगीत गायनास नकार दिला, तर काही खेळाडूंनी गणवेशावर काळ्या रंगाचे जॅकेट परीधान केले. इराणच्या कृतीचा मथिथार्थ जरी योग्य असला तरी यामुळे ‘फिफा’च्या नियमांचे उल्लंघन झाले का किंवा अन्य कोणता ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येईल, हे लवकरच स्पष्ट होईल. नोव्हेंबरच्या पूर्वार्धात इराणच्या वॉटरपोलो संघानेही आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यात राष्ट्रगीत गायनास नकार दर्शवला होता.

कतारबाबतचे निषेध

समलैंगिकतेविरोधातील धोरण आणि स्टेडियमच्या बांधकामासाठी स्थलांतरित मजुरांना दिलेली वागणूक याबाबत यजमान कतारची परदेशी चाहत्यांकडून निर्भत्सना केली जात आहे. या पडसाद काही सामन्यांमध्ये प्रेक्षागृहातही उमटत आहेत. जिब्राल्टरविरुद्धच्या विश्वचषक पात्रता सामन्यात नॉर्वेच्या संघाने ‘मानवी हक्क... मैदानावर आणि मैदानाबाहेर’ अशी वाक्ये रेखाटलेल्या जर्सी परीधान केल्या होत्या. जर्मनीच्या संघानेही आईसलँडविरुद्धच्या पात्रता सामन्यात अशाच प्रकारे निषेध नोंदवला होता. कतारकडून मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी डेन्मार्कच्या खेळाडूंनी ‘टोन-डाऊन’ हे शब्द असलेल्या जर्सी घातल्या होत्या. ऑस्ट्रेलियातूनही समलैंगितेच्या कतारच्या धोरणाविषयी टीका करणारी चित्रफित जारी केली आहे. फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी विश्वचषक सामन्यांचे प्रक्षेपण केले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

असाही निषेध

१९६०च्या दशकात अमेरिकेमध्ये सामर्थ्यशाली नागरी हक्क चळवळ उदयास आली. वांशिक भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी ‘द ब्लॅक पॉवर सॅल्यूट’ आंदोलन सरसावले. १९६८च्या ऑलिम्पिकमध्ये, पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत अमेरिकेच्या सुवर्णपदक विजेत्या टॉमी स्मिथ आणि कांस्यविजेत्या जॉन कार्लाेस यांना पदके प्रदान करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्रगीत वाजत असताना काळे हातमोजे घातलेल्या या दोन कृष्णवर्णीय खेळाडूंनी ‘ब्लॅक पॉवर सॅल्युट’मध्ये त्यांच्या मुठी उंचावल्या. त्यांच्यावर त्वरित कारवाई करून मायदेशी धाडण्यात आले.

प्रशांत केणी

prashantkeni@gmail.com