सामने ये कौन आया दिल में हुई हलचल’ (पार्श्वगायक किशोरकुमार) ‘नही नहीं कभी नहीं करो थोडा इंतजार’ (आशा भोसले आणि किशोरकुमार) ‘अगर साज छेडा तो तराने बनेंगे’ (आशा भोसले आणि किशोरकुमार), जा ने जा ढूंढता मै यहाँ (आशा भोसले आणि किशोरकुमार), यह जवानी है दीवानी (किशोरकुमार), अशा आजही सहज गुणगुणावीत एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांमुळे रसिकांच्या एका पिढीकडून पुढील पिढीत जात राहिलेल्या रोझ मुव्हीजच्या ‘जवानी दीवानी’ (प्रदर्शन १४ जुलै १९७२)च्या प्रदर्शनास यशस्वी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
रमेश बहेल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन नरेन्द्र बेदी यांचे आहे. तर गाणी आनंद बक्षी यांची असून ‘तरुण संगीत’ राहुल देव बर्मनचे आहे. यातील कोणत्याही गाण्याचा मुखडा जरी आठवला अथवा मधला म्युझिक पीस जरी ऐकला तरी हे राहुल देव बर्मनचे संगीत आहे हे वेगळे सांगावे लागत नाही.
काळ किती भरभर पुढे सरकतोय…. ही गाणी आजची वाटावीत अशी आहेत. पण जन्माला आली पन्नास वर्षांपूर्वी! ‘जवानी दीवानी’ म्हणजे म्युझिकल हिट प्रेमपट. नावातच सगळे काही आले. विशेष म्हणजे रणधीर कपूर आणि जया भादुरी अशी यात रोमॅन्टीक जोडी. वेगळी वाटते ना? (तोपर्यंत ती जया बच्चन झाली नव्हती.) दोघांच्याही कारकिर्दीतील हा सुरुवातीच्या काही चित्रपटातील एक.
राज कपूरचा मोठा मुलगा ही रणधीर कपूरची पहिली आणि मोठी ओळख. साहजिकच त्याच्यात अनेकांनी राज कपूर शोधला. पण त्याचा एकूणच रुपेरी पडद्यावरील वावर आणि अभिनय शैली ही त्याचे काका शम्मी कपूरसारखी होती. रणधीर कपूरचे तोपर्यंत ‘जीत’, ‘कल आज और कल’ असे चित्रपट रसिकांसमोर आले होते. विशेष म्हणजे आपल्या पहिल्या दिग्दर्शनात आपले आजोबा पृथ्वीराज कपूर आणि पिता राज कपूर यांना दिग्दर्शित केले. तर, चित्रपट निर्मितीवस्थेत असताना तो बबिताच्या प्रेमात पडला आणि मग त्यांचे लग्न झाले.
जया भादुरीने ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘गुड्डी’पासून अभिनय प्रवास सुरु करताना आपण पारंपरिक शैलीच्या अभिनेत्री आहोत याचा प्रत्यय दिला (त्या सुमारास हेमा मालिनी, रेखा, राखी अशा अभिनेत्रींमुळे ‘छान दिसणे’ हा घटक जास्त महत्वाचा होता. त्या तुलनेत जया भादुरी सॉफ्ट) आणि तिला ‘उपहार’, ‘पिया का घर’ ‘बावर्ची’ असे सामाजिक कौटुंबिक चित्रपट मिळाले होते. तरी आपण ग्लॅमरस लूकच्याही अभिनेत्री आहोत हे दाखवून द्यायचे तर तसा एकादा चित्रपट मिळायला हवा. तो ‘जवानी दीवानी’ होता.
रविकांत नगाईच दिग्दर्शित ‘द ट्रेन’ (१९७०) नंतरचा निर्माते रमेश बहेल यांचा चित्रपट ‘जवानी दीवानी’. तसेच, दिग्दर्शक नरेंद्र बेदी यांचा जी. पी. सिप्पी निर्मित ‘बंधन’(१९६९)च्या यशानंतरचा हा चित्रपट. म्हणजे निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोघांचाही पहिल्या यशानंतर आत्मविश्वास वाढलेला. गाण्याची तबकडी बाजारात उपलब्ध होऊ लागली की समजावे अमका तमका चित्रपट पूर्ण झाला आहे. मुद्रित माध्यमातून अशा आगामी चित्रपटाच्या बातम्या, फोटो येत. रस्त्यावर होर्डींग्स, पोस्टर लागत.
रेल्वे स्टेशनवर पोस्टर लागत. रेडिओ सिलोनवर बिनाका गीतमालामध्ये गाणे येई. गाणी हिट होताना इराणी हॉटेलमधील ज्युक बॉक्समध्ये चार आण्याचे नाणं टाकून गाणे ऐकले जाई. (हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत दूरदर्शनचे आगमन झाले नव्हते. ते १९७२ च्या दोन ऑक्टोबरला झाले.)
‘जवानी दीवानी’ची गाणी ‘ऐकता ऐकता’ लोकप्रिय झाली. वाद्यवृंदातून ती गायली जाऊ लागली आणि चित्रपट कधी बरे प्रदर्शित होतोय याकडे चित्रपट रसिकांचे लक्ष लागले. त्या काळात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत. एखादा हिंदी चित्रपट सर्वप्रथम मुंबईत रिलीज होऊन मग टप्प्याटप्प्याने दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार वगैरे वगैरे ठिकाणी प्रदर्शित होई.
तर एखादा चित्रपट उत्तर भारतात सर्वप्रथम प्रदर्शित होऊन मग मुंबईत येई. त्यात पुन्हा मेन थिएटरचा हुकमी फंडा होता. ‘जवानी दीवानी’ फस्ट डे फर्स्ट शोपासूनच रसिकांनी उचलून घेतला. याची दोन कारणं, सगळीच गाणी सुपर हिट आणि दुसरं म्हणजे सहकुटुंब पाहण्याजोगे मनोरंजन होते. चित्रपटात बलराज साहनी, निरुपा रॉय, इफ्तेखार, नरेंद्रनाथ, सत्येन कप्पू, ए. के. हनगल, पेंटर, जगदीश राज, विजू खोटे इत्यादींच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा इंदरराज आनंद यांची तर संवाद कादर खान यांचे आहेत. विशेष म्हणजे कादर खान यांनी संवाद लिहिलेला हा पहिला चित्रपट आहे. ‘जवानी दीवानी’ खूपच उशिरा कन्नड भाषेत ‘Aralida Hoovugalu’ या नावाने १९९१ साली रिमेक करण्यात आली.
यशानंतर नरेंद्र बेदीकडे एकदम तीन चित्रपट आले. रमेश बहल निर्मित ‘दिल दीवाना’ (यात ‘जवानी दीवानी’चीच टीम पुन्हा एकदा. म्हणजे रणधीर कपूर आणि जया भादुरी नायक नायिका, तर आनंद बक्षी यांच्या गीताना राहुल देव बर्मनचे संगीत.), रणजित वीर्क निर्मित ‘बेनाम’ (अमिताभ बच्चन, मौशमी चटर्जी), एन. डी. कोठारी निर्मित ‘खोटे सिक्के’ (फिरोझ खान, रणजित, डॅनी डेन्झोप्पा वगैरे वगैरे.) हे तीनही चित्रपट १९७४ साली प्रदर्शित झाले. पण ‘दिल दीवाना’ रसिकांनी पूर्णपणे नाकारला.
नरेंद्र बेदीने त्यानंतर रफू चक्कर (ऋषि कपूर व नीतू सिंग १९७५), महाचोर (राजेश खन्ना आणि नीतू सिंग १९७६), अदालत (वहिदा रहेमान, अमिताभ बच्चन आणि नीतू सिंग १९७६) वगैरे चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तो राजेश खन्नाचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जाई. तर, रमेश बहल यांनी काही वर्षांनी चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि कस्मे वादे (अमिताभ बच्चन, राखी, रणधीर कपूर, नीतू सिंग), हरजाई (रणधीर कपूर आणि टीना मुनिम), पुकार (अमिताभ बच्चन, झीनत अमान, परवीन बाबी, रणधीर कपूर) चित्रपटांचे दिग्दर्शन केले. रणधीर कपूर त्यांचा फेव्हरेट होता. ‘जवानी दीवानी’पासून त्यांची मैत्री जमली होती…
‘जवानी दीवानी’ आजही तारुण्यात आहे. राहुल देव बर्मनचे मादक संगीत आणि आशा भोसले-किशोरकुमार यांचे उत्फूर्त गायन यातून जे काही निर्माण झाले ते कायमचं जवानी दीवानी आहे.
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com